Menu Close

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये ‘मंदिर सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवाद

डावीकडून महंत दीपक गोस्वामी, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्री. आनंद जाखोटिया, मदनमोहन  उपाध्याय आणि अधिवक्ता अभिषेक भगत

मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

रामनाथ देवस्थान – आज हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. तसेच त्यांच्या मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण मिळणे अत्यावश्यक झाले आहे आणि हे कार्य मंदिरांमधून अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे मंदिरे ही हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या द्वितीय दिवशी (१७.६.२०२३ या दिवशी) दुसर्‍या सत्रामध्ये ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी सद्गुरु नीलेश सिंगबाळ बोलत होते. या वेळी जयपूर (राजस्थान) येथील ‘ज्ञानम् फाऊंडेशन’चे संस्थापक आणि अध्यक्ष महंत दीपक गोस्वामी, नगर येथील श्री जगदंबा तुळजाभवानीदेवी मंदिराचे प्रमुख अधिवक्ता अभिषेक भगत, रायपूर (छत्तीसगड) येथील ‘मिशन सनातन’चे संस्थापक मदनमोहन उपाध्याय सहभागी झाले होते. या सत्राचे सूत्रनिवेदन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ पुढे म्हणाले, ‘‘देवालयांमध्ये (मंदिरांमध्ये) देवता वास करत असल्याने तेथे अधिक सात्त्विकता असते. अशा ठिकाणी प्रत्येक कृतीचे देवतेला अपेक्षित अशा पद्धतीने आदर्श व्यवस्थापन होणे अपेक्षित असते. मंदिराच्या माध्यमातून भगवद्सेवा, धर्महित आणि भक्तहित साध्य झाले पाहिजे. मंदिरांमध्ये भक्तांसाठी अन्नछत्र आणि धर्मशाळा असाव्या. पुजारी आणि विश्वस्त हे मंदिरांचे स्वामी नसून देव आणि भक्त यांना जोडणारा दुवा असतात. त्यामुळे त्यांच्यात सेवकभाव असला पाहिजे. मंदिरांचे व्यवस्थापन पहाण्यासाठी बुद्धी सात्त्विक असावी लागते. त्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापक भगवंताची भक्ती करणारे असावेत.’’

मंदिरांमध्ये वाद नाही, तर संवाद असला पाहिजे ! – अधिवक्ता अभिषेक भगत, प्रमुख, श्री जगदंबा तुळजाभवानीदेवी मंदिर, नगर

मंदिरांची व्यवस्था, परिसर आणि वातावरण प्रसन्न असावे. त्यामुळे तेथून सकारात्मक लहरी प्रक्षेपित होऊन भाविकांना लाभ होईल. हे लक्षात घेऊन आमचा मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. मंदिरांमध्ये वाद नाही, तर संवाद असायला हवा.

विश्वस्त, पुजारी आणि भक्त यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे ! – मदनमोहन  उपाध्याय, संस्थापक, मिशन सनातन, रायपूर, छत्तीसगड

पुजार्‍यांना योग्य मानधन मिळाले पाहिजे. तसेच त्यांना योग्य प्रशिक्षणही मिळणे आवश्यक आहे. तरच त्यांच्याकडून देवतांची योग्य प्रकारे सेवा होऊ शकते. पुजारी चांगले असतील, तर भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात येतील. त्यामुळे विश्वस्त, पुजारी आणि भक्त यांना प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.

मंदिरांमध्ये शस्त्र आणि शास्त्र यांच्या प्रशिक्षणाची सुविधा असावी ! – महंत दीपक गोस्वामी, संस्थापक आणि अध्यक्ष, ज्ञानम् फाऊंडेशन, जयपूर, राजस्थान

विश्वस्त आणि पुजारी हे जेवढा स्वार्थी त्यागतील, तेवढी मंदिरे चांगली चालतील. आम्ही भाविकांना चांगल्या दर्जाच्या प्रसादाचे वितरण चालू केले. त्यानंतर भाविकांची संख्या वाढली. यासमवेतच पैसे घेऊन ‘व्हीआयपी’ पास देण्याची संस्कृती बंद झाली पाहिजे. मंदिरांमध्ये शस्त्र आणि शास्त्र यांच्या शिक्षणाची सुविधा असायला हवी. त्यामुळे देशाचे रक्षण होऊ शकेल. धर्म बलवान झाला, तरच हिंदु राष्ट्र येईल, त्यासाठी सर्व मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले पाहिजे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *