Menu Close

‘द रेशनलिस्ट मर्डरर्स’ या पुस्तकाचे ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त लोकार्पण व मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

विद्याधीराज सभागृह – मागील काही वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील झालेल्या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपाखाली फसवून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. हे षड्यंत्र उघड करणारे ‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ हे डॉ. अमित थडानी लिखित पुस्तकाचे प्रकाशन वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात करण्यात आले. हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते. अमित थडानी हे मुंबई येथे रहाणारे असून सुप्रसिद्ध शल्यचिकिस्तक आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या खटल्यांतील १० सहस्र पानांची आरोपपत्रे, न्यायालयीन निर्णय, सरकारी कागदपत्रे यांचा सखोल अभ्यास करून डॉ. अमित थडानी यांनी या पुस्तकाचे लिखाण केले आहे.

नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागे षड्यंत्र ! – डॉ. अमित थडानी, शल्य चिकत्सक, समाजसेवक तथा लेखक

रामनाथ देवस्थान – सनातन संस्था लोकांना संघटित करते. त्यामुळे तिला नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये लक्ष्य करण्यात आले. या प्रकरणांमध्ये खरे मारेकरी शोधण्याचा प्रयत्न न करता अन्वेषण करण्यात आले. या सर्व प्रकरणांमध्ये कुठेही ठोस पुरावे मिळाले नसून केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी प्रयत्न झाला आहे. तत्कालीन सरकारने देशात ‘हिंदुत्वनिष्ठ हे आतंकवादी आहेत’, हे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) उभे करण्यासाठी या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. त्यामुळे पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागे एक मोठे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते, असे ठोस प्रतिपादन शल्य चिकत्सक, समाजसेवक तथा लेखक डॉ. अमित थडानी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ते बोलत होते.

नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागील षड्यंत्र उघड करणारे ‘रॅशनालिस्ट मर्डर्स’ हे पुस्तक डॉ. अमित थडानी यांनी लिहिले आहे.

रॅशनालिस्ट मर्डर्स’चे सत्य’ याविषयावरील चर्चासत्रात बोलतांना डॉ. अमित थडानी म्हणाले,

१. अन्वेषण यंत्रणेने दाभोलकर प्रकरणामध्ये हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक केली गेली. त्यांना ४० दिवसांहून अधिक काळ कारावासात ठेवण्यात आले. उद्या सरकारच्या विरोधात न्यायालयीन खटला लढल्या जाणार्‍या अधिवक्त्यांनाही अटक करण्यात येणार का ? प्रशांत भूषण यांसारखे अधिवक्ते गुन्हेगारांचे खटले लढतात; म्हणून त्यांनाही अटक करणार आहे का ?

२. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या सर्वांच्या हत्या प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये सतत आरोपी पालटण्यात आले. प्रत्येक वेळी संशयित आरोपींचे निरनिराळे रेखाचित्रे काढण्यात आली. यात अन्वेषण संस्थांनी कुठेही खर्‍या मारेकर्‍यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच कुठेही खर्‍या मारेकर्‍यापर्यंत जाणारे पुरावे मिळाले नाहीत. केवळ हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करणे, हेच अन्वेषण संस्थांचे ध्येय होते.

३. गौरी लंकेश प्रकरणात शीरस्त्राण घातलेल्या संशयितांचे रेखाचित्र काढण्यात आले. घटनेच्या वेळी त्या भागात वीजही नव्हती. मग ‘त्यांचे रेखाचित्र कसे बनवण्यात आले ?’, हे एक आश्‍चर्य आहे. गौरी लंकेश प्रकरणामध्ये विविध राज्यांतील १८ जणांना अटक करण्यात आली. त्यात १५ जणांच्या जबाबावर बळजोरीने त्यांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. अन्य तिघांचे तर विनास्वाक्षरी जबाब प्रविष्ट करण्यात आले. यावरून त्यात अन्वेषण यंत्रणांना अपेक्षित असा मजकूर नसेल कशावरून ?

४. डॉ. दाभोलकर प्रकरणामध्ये प्रारंभी २ आरोपींना पकण्यात आले; पण ते हिदुंत्वनिष्ठ नव्हते; म्हणून त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांना पकडण्यात आले. या प्रकरणात आधी आरोपी पकडून नंतर अन्वेषण करण्यात आले.

५. आरोपींनी म्हणे ज्या शस्त्राने हत्या केली, त्या शस्त्राचे तुकडे खाडीमध्ये फेकण्यात आल्याचे सांगण्यात आले. कालांतराने ६ कोटी रुपये व्यय करून ते समुद्रातून काढण्यात आले. तुकडे करून समुद्रात फेकलेले शस्त्र शाबूत अवस्थेत कसे मिळाले ? यावरून अन्वेषण यंत्रणांचे अन्वेषण संशयास्पद असल्याचे लक्षात येते. हे सर्व एक कथानक रचण्यासाठीच केले गेले होते.

६. नाक, कान, घसा तज्ञ डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना दाभोलकर प्रकरणात अटक करण्यात आली. त्यासाठी ५ वर्षांपूर्वीचा एक ‘इमेल’ शोधण्यात आला. नंतर त्यांना पानसरे प्रकरणात गोवण्यात आले. ते अद्यापही कारावासात आहेत. एका दूरभाषवरून समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली. कालांतराने त्यांना सोडण्यात आले. यावरून कोणत्याही लोकांच्या विरोधात ठोस आरोप नसतांनाही त्यांना लक्ष्य करण्यात आले. हा सर्व केवळ ‘नॅरेटिव्ह’ चालवण्याचा प्रयत्न आहे.

नक्षलवादी हेच साम्यवादी आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत, हे न सांगणे, हाच वैचारिक आतंकवाद ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

विद्याधिराज सभागृह – एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर ६३ लोकांनी ‘पुरस्कार वापसी’ केली. मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतर मधल्या काळात जणू काही कुणाची हत्या झाल्याच नाहीत आणि दाभोलकर, कलबुर्गी यांच्या हत्यांनंतर भयंकर काहीतरी झाल्याचे वातावरण निर्माण केले गेले. आम्हाला कुणाच्या हत्येचे समर्थन करायचे नाही. नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु ‘साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ?’, हा प्रश्‍न कुणी विचारेल का ? साम्यवाद्यांनी जगभरात हत्या केलेल्यांचा आकडा १० कोटींहून अधिक आहे. नक्षलवाद्यांनी भारतात केलेल्या हत्या १४ सहस्रांहून अधिक आहेत. नक्षलवाद्यांनी ज्यांच्या हत्या केल्या आहेत, त्यात आदिवासी, आमदार, मंत्री आहेत; परंतु हे आपणाला दाखवले जात नाही. तथाकथित बुद्धीवादी आपणाला दाखवतात, तेच आपण पहातो. साम्यवाद्यांनी भारतातील केलेल्या १४ सहस्र हत्यांपेक्षा आपल्याला ४ नास्तिकतावाद्यांच्या हत्या मोठ्या वाटतात. नक्षलवादी हेच साम्यवादी आहेत आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत; मात्र हे कुणी सांगत नाही. हाच वैचारिक आतंकवाद आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर साम्यवाद्यांनी कधी शोकसभा घेतली आहे का ? उलट नक्षलवादी कारवायांचे समर्थन केले आहे. भारतावर मोगलांनी केलेल्या आक्रमणांविषयी चर्चा होते, तेव्हा ‘हे ४०० वर्षांपूर्वीचे आहे’, असे सांगितले जाते; परंतु २ सहस्र वर्षांपूर्वीच्या आणि कुठेही लिखित स्वरूपात नसतांना ‘आर्यांनी द्रविडांवर अत्याचार केले’, असे आपल्याला सुनावले जाते. हाच वैचारिक आतंकवाद आहे. केवळ ४ नास्तिकवाद्यांच्या हत्यांविषयी नाही, तर साम्यवाद्यांनी आतापर्यंत केलेल्या सहस्रावधी हत्यांविषयी हिंदुत्वनिष्ठांनी प्रश्‍न उपस्थित करायला हवा, असे वक्तव्य हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.

साधनेच्या बळावर समाजातील नकारात्मकतेशी लढून हिंदु राष्ट्र आणू शकतो ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

विद्याधिराज सभागृह – मी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) विरोधात खटला लढत आहे. यापूर्वी हा खटला लढवणार्‍या अधिवक्त्यांनी या खटल्यातून माघार घेतली; कारण तेथे पी.एफ्.आय’चे कार्यकर्ते मैसुरू जिल्हा न्यायालयाच्या आवारात अधिवक्त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ काढत आणि त्यांना धमक्या देत असत. माझ्या संदर्भातही तेच केले; परंतु नामस्मरण करत असल्यामुळे मला त्याची भीती वाटली नाही. मला मिळत असलेल्या धमक्यांविष्यी न्यायाधिशांना कळल्यावर मला संरक्षण देण्यात आले, तरीही माझ्यावर आक्रमण झाले. नामस्मरण करत असल्याने मला आता कुठल्याच प्रकारची भीती वाटत नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ अधिवकत्यांनी प्रवास करतांना, आपली सुनावणी चालू होईपर्यंत जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा नामस्मरण करावे. येथे सनातन संस्था शिकवत असलेले स्वभावदोष निर्मूलन शिकून कृतीत आणा. त्याने समाजातील नकारात्मक शक्तींशी लढून आपण हिंदु राष्ट्र आणू शकतो, असे प्रतिपादन कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांनी केले. ते वैश्‍विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या ‘पी.एफ्.आय. : भविष्यकालीन संकट’ या विषयावर बोलत होते.

क्षणचित्रे

१. यावेळी ‘अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्याकडे पाहून काय वाटते ?’, असा सूक्ष्म प्रयोग उपस्थितांकरून करून घेण्यात आला. तेव्हा अनेकांना ‘अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्याकडे पाहून प्रसन्न वाटले’, ‘त्यांच्या चेहर्‍यावर साधनेचे तेज जाणवले’, असे सांगितले. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्याविषयी बोलतांना नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठ रवींद्र पाटील, यती मा चेतनानंद सरस्वती, प्रसन्न अय्यर, कुमार रेड्डी आदींनी त्यांना जाणवलेली सूत्रे सांगितली.
२. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रामानंद गौडा म्हणाले, ‘‘अधिवक्ता कृष्णमूर्ती धर्मनिष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांचा अखंड नामजप चालू असतो. प्रवासात ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतात. ‘प्रवास कसा पूर्ण झाला  ?’, हे कळत नाही, असे ते सांगतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी त्यांच्या मनात पुष्कळ भाव असून ते त्यांच्याविषयी कितीही वेळ बोलू शकतात. न्यायालयीन प्रकरणे आणि त्यासाठीचा प्रवास करतांना ते स्वतःचे धन खर्च करतात. एकदा ३-४ घंटे प्रवास करून एका खटल्यासाठी न्यायालयात पोहोचले होते; पण तेथे गेल्यावर न्यायाधीश सुट्टीवर असल्याचे कळले. दुसर्‍या अधीवक्त्याने त्यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी ‘ईश्‍वरइच्छा’, असे सांगितले. त्यांच्या मनात याविषयी कुठलाही विचार किंवा प्रतिक्रिया आली नव्हती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आक्रमण झाले तेव्हा ‘परमपूज्य गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे. मला अजून पुष्कळ कार्य करायचे आहे’, असे सांगितले. आता त्यांनी कर्नाटकातील अधिवक्त्यांचे संघटन करण्याचे दायित्व स्वीकारले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *