Menu Close

‘हिंदु हितासाठी न्यायालयीन सुधारणा’ या विषयावर ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या तिसऱ्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन

डावीकडून अधिवक्ता श्रीधर पोतराजू, अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय

धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा सनातन धर्म असलेला आत्मा पालटणार नाही ! – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

विद्याधिराज सभागृह – राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्‍या श्रीकृष्णाचे चित्र होते. त्या राज्यघटनेला त्या वेळेच्या संसदेने सर्वसंमतीने स्वीकारले होते. याचा अर्थ भारताचा आत्मा असलेल्या सनातन धर्मालाच मान्यता मिळाली होती. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा आत्मा पालटणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (डॉ.) एस्.सी. उपाध्याय यांनी केले.
भारत ‘हिंदु राष्ट्र’ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ध्येयवाक्य ‘यथो धर्म: ततो जय: ।’ असे लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणते, ‘जेथे धर्म आहे, तेथे सत्य आहे आणि जेथे सत्य आहे, तेथे विजय आहे.’

हिंदु जनजागृती फार चांगले कार्य करत आहे. अशाच प्रकारे हिंदूंना संघटित केले पाहिजे. भारताच्या गल्लीबोळांमध्ये जागृत हिंदू आहेत, त्यांना संघटित केले पाहिजे. धर्मांध शेकडोच्या संख्येने हिंदूंवर आक्रमण करत असतील, तर हिंदूंचेही सहस्रो स्वयंसेवक सिद्ध असायला हवेत.

हिंदूंची सर्व मंदिरे परत मिळवणे, हा आमचा प्रण आहे ! – अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय तथा संरक्षक, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय तथा संरक्षक, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

रामनाथ देवस्थान (गोवा) – आता श्रीराम मंदिर बनत आहे; पण धर्मांध आक्रमकांनी अतिक्रमण केलेली सर्व मंदिरे परत मिळवणे हा आमचा प्रण आहे. त्यांच्या कह्यातून मथुरा, काशी, धार (मध्यप्रदेश) आणि ताजमहल येथील हिंदूंची धार्मिक स्थळे मुक्त करण्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे संरक्षक अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन यांनी केले. येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तृतीय दिनी (१८.६.२०२३ या दिवशी) ते बोलत होते.

अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन पुढे म्हणाले,

‘‘कोणे एके काळी ‘सोने की चिडिया’ असणारा हिंदूंचा भारत आता इतिहास बनला आहे आणि हिंदूंना त्यांच्या अस्तित्वासाठी न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर लढाई लढावी लागत आहे. हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष करत असतांना आपण इतिहासामध्ये धर्मासाठी बलीदान देणार्‍या धर्मयोद्ध्यांना विसरत चाललो आहोत. अशा सहस्रो धर्मयोद्ध्यांची नावे घेतल्याविना आपण पुढे जाऊ शकत नाही. महाराणा प्रताप, शिख धर्मगुरु यांनी हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान केले; पण पराभव स्वीकारला नाही. आपल्याला त्यांच्याहून अधिक संघर्ष करून हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. तरच त्या धर्मयोद्ध्यांना शांती मिळेल. भारताच्या राज्यघटनेने निर्माण केलेल्या वर्तमान व्यवस्थेमध्ये कोणतेही सरकार आले, तरी ते या देशाला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाहीत. तसे झाले, तर त्याला आव्हान देण्यात येईल. त्यामुळे हिंदूंनाच संघटित होऊन हिंदु राष्ट्र मिळवणे आवश्यक आहे.’’

हिंदु संस्कृतीवरील आक्रमणांना विरोध करण्यासाठी अधिवक्त्यांनी हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास करावा ! – अधिवक्ता श्रीधर पोतराजू, सर्वोच्च न्यायालय, देहली

अधिवक्ता श्रीधर पोतराजू, सर्वोच्च न्यायालय, देहली

सध्या भारतात इंग्रजांनी आणलेले कायदे कार्यरत आहेत, जे भौतिकतेवर आधारित आहेत. याउलट हिंदु धर्मशास्त्रात वाद-विवादातून निष्कर्ष काढून अंतिम सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच आपल्या न्यायव्यवस्थेचे घोषवाक्य ‘सत्यमेव जयते’ आहे, असे मी मानतो. या वाक्यातून सत्याचा शोध घेण्यासाठी नैतिक लढा देण्याची प्रेरणा मिळते. रामजन्मभूमीचा लढा हा केवळ भूमीचा लढा नसून तो श्रीरामाच्या जन्माचे सत्य शोधण्याचा लढा होता.

स्वातंत्र्यापूर्वी भारतात न्यायालयीन कामकाजात वेद-शास्त्रे यांचा संदर्भ अभ्यासला आणि दिला जात होता; परंतु आता कायद्यांच्या पाश्‍चात्त्यीकरणामुळे तेथील संदर्भांचा वापर केला जात आहे. स्वातंत्र्यानंतर साम्यवाद्यांच्या बौद्धिक विकृतीने भारतात घट्ट आणि बळकट जाळे निर्माण केले. सध्या नव्याने येऊ पहाणारे समलैंगिक विवाहासारखे निर्णय हे हिंदूंची कौटुंबिक, सामाजिक आणि विवाह संस्था यांवरील आक्रमण आहे. अशा आक्रमणांना विरोध करण्यासाठी अधिवक्त्यांनी आपल्या धर्मग्रंथांचा आधार घ्यावा आणि त्यांचा अभ्यास करावा, असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांनी केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *