शिवरायांनी अनेक नवे किल्ले बांधले व काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली. त्यामुळे शिवरायांचे जलव्यवस्थापन प्रामुख्याने गडकिल्ल्यांशी संबंधित राहिले.
शिवनीती म्हणून प्रसिद्ध ‘आज्ञापत्र’ या ग्रंथात रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि तो स्थळ आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावर झराही आहे, जसे तसे पाणीही पुरते, म्हणून तितकियावरीच निश्चिती न मानावी निमित्य की, झुंजामध्ये भांडियाचे (तोफेच्या) आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणीयाचा खर्च विशेष लागतो. तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरियाचे (जादा साठ्याचे राखीव) म्हणून दोन-चार टाकी तळी बांधावी. त्यातील खर्च होऊन द्यावे. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.’ शिवकालात गडकिल्ल्यावर पाण्याची काळजी किती काटेकोरपणे घेतली जात असे यावर प्रकाश टाकण्यास वरील उतारा पुरेसा आहे.
शिवपूर्वकाळात विशेषतः सातवाहनांच्या काळात येथे पाणी मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी प्रथम सरळ खोदत जात असत. पुढे पुरेशी जागा तयार झाल्यावर आडवे खोदत. मात्र हे आडवे खोदकाम करताना वरचे छत कोसळू नये म्हणून अधूनमधून खांब सोडत. या पद्धतीमुळे पाण्याचा फारच थोडा पृष्ठभाग हवा-वारा व उन्हाच्या संपर्कात येत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होई व टाक्यांमध्ये फार काळ पाणी टिकून राहात असे.
तशी सातवाहन काळात खोदलेली पाण्याची टाकी आपणास शिवनेरी (गंगा-जमुना टाकी), प्रचितगड, सुमारगड, रसाळगड, महिमतगड या गडांवर पाहायला मिळतात. या पद्धतीने टाकी खोदण्यास फार वेळ लागत असल्याने शिवरायांनी ही खांबटाक्यांची खोदण्याची पद्धत बंद करून नवीन दगडी हौदाची पद्धत अंगिकारली. या पद्धतीत किल्ल्याच्या डोंगर उतारावरील कातळावर एकाखाली एक या पद्धतीने पाण्याची टाकी उघड्यावरच खोदली जात. पावसाळ्यात वरच्या कातळावर पडलेले पाणी पहिल्या टप्प्यात साठे. हे पहिले टाके पाण्याने भरल्यावर त्यातील जास्तीचे पाणी दुसर्या टाक्यात जाऊन पडत असे. या पद्धतीने बांधलेल्या टाक्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यावर बांबू व गवताच्या सहाय्याने केलेले झाकण लावत असत. अशा बांबूसाठी दगडात खोदलेली अडक आजही आपणास टाक्यांच्या डोक्यावर पाहायला मिळते.
शिवकालात टाक्यांशिवाय मोठ-मोठे तलावही खोदले जात. कारण त्याकाळी प्रत्येक गडावर कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त २००० लोकांची शिबंदी असे. या सर्व लोकांना वर्षभर पुरेल इतके पाणी गडावर असणे गरजेचे ठरे. विशेषतः शत्रू सैन्याने एखाद्या गडास वेढा टाकला तर तो वेढा सहा महिने-वर्षभर चालण्याची शक्यता असे. (नाशिकजवळील रामशेज या किल्ल्याला मोगलांनी टाकलेला वेढा साडेपाच वर्षे चालला) अशा परिस्थितीत धान्य, तोफेची दारू रातोरात आणणे शक्य होई; पण पाणी बाहेरून आणणे शक्य होत नसे. म्हणून शिवरायांनी मोठमोठ्या किल्ल्यांवर काळ्या कातळात तलाव खोदले. त्याच्या फक्त पुढच्या बाजूला दगडी भिंत बांधली जात असे. या भिंतीच्या डाव्या अंगाला पावसाळ्यात जास्तीचे झालेले पाणी वाहून नेण्यासाठी सांडवा काढला जात असे. असे जास्तीचे पाणी कोकणच्या बाजूला दरीत सोडून देण्यासाठी असे तलाव प्रामुख्याने गडाच्या पश्चिम अंगाला खोदले जात. या तलावाच्या पूर्व अंगाला असणारे ओढे-नाले यांचे पाणी मुद्दाम तलावात वळवून सोडले जाई. या मोठ्या तलावांचा दुसरा फायदा म्हणजे हा तलाव खोदताना काढलेले दगड गडाचा तट-बुरूज बांधण्याच्या कामी येत. बर्याच वेळेला गडावरील बांधकामे व दुरुस्तीसाठी दगड कमी पडल्यास आहे ती टाकी तलाव बाजूने आणखी खोदून तो दगड बांधकामासाठी वापरण्यात येई. असे शिवरायांनी बांधलेले तलाव आपणास रांगणा, राजगड (पद्मावती तलाव), रायगड (गंगासागर तलाव), सुधागड इ. किल्ल्यांवर आजही पाहायला मिळतात.
आज गडकिल्ल्यांच्या आसपास राहणारे लोक जलस्रोत आटले म्हणून पाण्यासाठी रानोमाळ फिरत असताना किल्ल्यांवरील टाक्यातील तळ्यातील पाणी आहे तसे आहे हे शिवछत्रपतींच्याच दूरदृष्टीचे द्योतक होय. विशेष उदाहरण म्हणजे रायगडावरील शिवसमाधीमुळे वर्षभर लाखो शिवप्रेमी या गडावर जात-येत असतात. या सर्व लोकांना व गडावरील कायमचे रहिवाशी असणार्या धनगर लोकांना गडावरील कोळीम तलाव, काळा हौद, बारा टाकी व गंगासागराचे पाणी वर्षभर पुरते. विशेषतः दरवर्षी ६ जून या शिवराज्याभिषेक दिनी पन्नास हजारहून अधिकतम शिवप्रेमी दोन दिवसांसाठी रायगडावर मुक्कामास येतात. या सर्व लोकांना अन्न शिजवण्यासाठी व पिण्यासाठी रायगडावरील गंगासागराचे पाणी वापरले जाते. तरीसुद्धा कधीही रायगडावरील गंगासागर तलाव आटला असे झालेले नाही.
२४ मे, १६७३ रोजी टॉमस निकल्स नावाचा इंग्रज वकील रायगडावर आला होता. हा किल्ला पाहून तो म्हणतो, “वाटेत पायर्या खोदल्या आहेत. जेथे टेकडीला निसर्गतः अभेद्यता नाही तेथे २४ फूट उंचीचा तट बांधला आहे. ४० फूटावर लगेच दुसरी भिंत बांधून हा किल्ला इतका दुर्भेद्य बनविला आहे की, अन्नधान्याचा भरपूर पुरवठा झाल्यास हा किल्ला अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढू शकेल. पाण्याकरिता मोठे तलाव असून ते पावसाळ्यात भरल्यावर पाणी पुरून उरेल इतके होते.” इ. स. १६७१-७२ मधील गगनबावडा दप्तरातील एका पत्रानुसार शिवरायांनी रायगडावरील घरे व तळ्यांसाठी ३५००० होनांची तरतूद केलेली आपणास आढळते. गडावर पाणी मुबलक आहे म्हणून त्याचा वापर कसाही केलेला शिवरायांना खपत नसे. गोड्या पाण्याचा योग्य तो व योग्य त्या ठिकाणी वापर करावा असे त्यांचे मत असे.
सिंधुदुर्गचे बांधकाम चालू असताना शिवराय आग्रा येथे कैदेत अडकून पडले. तेथून त्यांनी सिंधुदुर्गचे बांधकाम करणार्या हिरोजी इंदुलकरांना पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, “आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे. अवघे काम चखोट करणे… गोडे पाणी हाताशी बहुत. पाण्याच्या ठावापाशी टाक्या बांधोन त्यात वाळू साठविणे. गोड्या पाण्यामध्ये चार दोनदा भिजू देणे. खारटाण धुतले जाईल. ती धुतलेली वाळू वापरणे.” वरील पत्र वाचले की शिवरायांचे गड बांधताना किती बारीक-सारीक गोष्टीत लक्ष होते, पाण्याच्या टाकीबाबत ते किती जागरुक होते हेच आपल्या लक्षात येते.
पाणी साठवण्याचे सर्व प्रकार उदा. कातळ कोरीव टाकी, खांब टाकी, पाण्याची कुंडे, तलाव, पुष्करणी, विहिरी, त्यांच्या अनेक बांधकामविषयक पद्धती या सर्व गोष्टी अभ्यासायच्या झाल्या तर किल्ला ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्यावर वरील सर्व पाणी साठवण्याची ठिकाणे आपणास अभ्यासायला मिळतात. आज महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांवरील तलावातले पाणी पायथ्याच्या गावाला सायफन पद्धतीने पुरविले जाते. उदा. राजमाची किल्ल्यावरून पायथ्याच्या उढेवाडीला, विसापूर किल्ल्यावरून पायथ्याच्या गावाला पाणी पुरविले जाते. आजूबाजूची गावे दुष्काळाने होरपळत असताना शिवरायांच्या गडावरील पाण्याची टाकी व तलाव आजही भरलेले आहेत. या टाक्यातील खडकातून पाझरत पाणी येत असल्याने त्यात जमिनीतील क्षार मिसळलेले असतात. त्यामुळे ते चविष्ठ व थंडगार असते.
अशी या किल्ल्यावरील पाण्याची महती मोठी आहे. म्हणून तर आज संपूर्ण महाराष्ट्रात पाण्यासाठी जिकडे-तिकडे टँकर फिरत असताना गड किल्ल्यांवरील पाणी व ते कसे वापरावे हे सांगणार्या शिवरायांची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहात नाही. एैसा गडपति, जलपति राजा पुन्हा होणे नाही.
संदर्भ : पुढारी