Menu Close

‘धर्मपरिवर्तन आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

डावीकडून दुर्गेश परूळकर, पू. चित्तरंजन स्वामी महाराज, रवींद्र प्रभूदेसाई, हर्षद खानविलकर आणि सूत्रसंचालन करतांना सौ. क्षिप्रा जुवेकर

धर्मांतर रोखून सनातन धर्माचे रक्षण करू, अशी प्रतिज्ञा करा ! – पू. चित्तरंजन स्वामी महाराज, शांती काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा

पू. चित्तरंजन स्वामी महाराज, शांती काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा

विद्याधिराज सभागृह – त्रिपुराममधील धर्मांतराची स्थिती तेथे आल्यानंतरच लक्षात येऊ शकते. वर्ष १९८५-८६ पासून त्रिपुरामध्ये हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात होऊ लागले. माझे गुरु शांतीकाली महाराज यांच्यासह मीही धर्मांतर रोखण्याचे कार्य करू लागलो. माझ्या मोठ्या भावाचे अपहरण करून त्याला ‘तुझ्या भावाला (पू. चित्तरंजन स्वामी यांना) धर्मांतर रोखण्याचे काम थांबवायला सांग’, अशी धमकी दिली; परंतु गुरूंच्या कृपेने मी कार्य चालू ठेवले. नोकरी सोडून धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यात विश्‍व हिंदु परिषदेचे अशोक सिंघल, रा.स्व. संघाचे मोहन भागवत यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती पू. चित्तरंजन स्वामी महाराज यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी झालेल्या सत्रात दिली.

ते पुढे म्हणाले …

१. शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मप्रचारक अनेक राज्यांमध्ये घुसखोरी करतात. मणीपूर आणि नागालँड या राज्यांत मोठ्या प्रमाणत हिंदूंचे धर्मांतर होते. २५ पाद्री, नन, तसेच १ सहस्र प्रचारक त्रिपुरामध्ये येऊन धर्मांतराचे कार्य करत आहेत.

२. त्रिपुरामधील लोक भोळे आहेत. ते शिक्षणाला महत्त्व देतात. ख्रिस्त्यांनी तेथे मुलांसाठी शाळा काढल्या आहेत. शाळेत घातल्यानंतर २-३ वर्षांनी ख्रिस्ती धर्मप्रसारक त्या मुलांच्या पालकांना भेटतात. ‘तुमचे मूल हुशार आहे. त्याच्यात क्षमता आहे. त्याला बाप्तिस्मा द्या. (धर्मांतर करा) आम्ही त्याला चांगले शिक्षण देऊ’, असे सांगतात. भोळे हिंदू त्याला भुलतात आणि अशा प्रकारे कुटुंबाचे धर्मांतर केले जाते.

३. गुरूंच्या आशीर्वादाने धर्मांतराच्या विरोधात आम्ही लढा देत आहोत. पुढील २ वर्षांत मिझोराम आणि नागालँड येथून आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना आम्ही परत पाठवू.

४. त्रिपुरात मठ-मंदिरांमध्ये अनेक साधू-संत आहेत; परंतु तेथे येणार्‍या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने धर्मांतराची समस्या फोफावली आहे. हिंदु धर्म वाचला, तर मठ-मंदिरे टिकणार आहेत. त्यामुळे प्रथम हिंदु धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करा.

५. येथे देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी प्रतिज्ञा करावी की, आम्ही धर्मांतर रोखून सनातन धर्माचे, हिंदूंचे रक्षण करू आणि प्रसंगी धर्मासाठी प्राणत्यागही करू.

हिंदूंच्या प्रतीकांना आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ! – दुर्गेश परूळकर, लेखक आणि व्याख्याते, ठाणे

दुर्गेश परूळकर, लेखक आणि व्याख्याते, ठाणे

मोगलांतील एकाही बादशहाने कोणतेही मानवतेचे कार्य केलेले नाही. मोगल बादशहाची ओळख क्रूरतेसाठी आहे. उलट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी राष्ट्र-धर्म आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. ताजमहल हा तेजोमहल आहे, कुतुबमीनार हा विष्णुस्तंभ आहे, तर तथाकथित ज्ञानव्यापी मशीद हे भगवान शिवाचे मंदिर आहे. आक्रमकांनी दिलेली नावे, हे आक्रमकांचे उदात्तीकरण आहे. आपला इतिहास पराभवाचा नाही, तर विजयाचा आहे. शरद पवार यांना छत्रपती संभाजीनगरला ‘औरंगाबाद’ म्हणायचे असेल, तर त्यांनी अवश्य म्हणावे; परंतु माझ्यापुढे प्रश्‍न आहे की, ‘या राष्ट्राचा राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत कि औरंगजेब आहे ?’ ‘छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने हाल करून मारले, हे योग्य होते का ?’  ‘शरद पवार यांच्या मनात छत्रपती छंभाजी महाराज यांच्यापेक्षा औरंगजेब याच्याविषयी आदरभाव आहे का ?’ देश स्वतंत्र झाल्यानंतर आक्रमकांनी ठिकाणांना दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. औरंगजेब आपणाला प्रात:स्मरणीय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्यासाठी प्रात:स्मरणीय आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते. त्यामुळे आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे वक्तव्य ठाणे येथील लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी केले.

उद्योगपतींनी साधना केल्यास त्यांची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल ! – रवींद्र प्रभूदेसाई, संचालक, पितांबरी उद्योगसमूह

रवींद्र प्रभूदेसाई, संचालक, पितांबरी उद्योगसमूह

रामनाथ (फोंडा) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मार्गदर्शनामुळेच व्यवसाय करतांना धर्मसेवा करू शकतो. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला ‘उद्+योजक = उद्योजक’ अशी उद्योगाची व्याख्या सांगितली. ते म्हणाले होते की, ‘ज्याने ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होते, त्याला धर्म म्हणतात. आज कलियुगामध्ये अर्थशक्तीचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे अर्थशक्तीकडे दुर्लक्ष केल्यास आपली हानी होऊ शकते. तुमच्या आस्थापनातील कर्मचार्‍यांची ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे, ही तुमचे दायित्व आहे.’ आमचे ‘पितांबरी’ पावडर हे उत्पादन देवतांच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येते. त्यानंतर आम्ही पूजेच्या संबंधित विविध उत्पादनांची निर्मिती केली.

‘जो ईश्‍वराची माहिती समाजापर्यंत पोचवतो, तो देवाला अधिक आवडतो.’ ‘शनीची साडेसाती दूर करण्यासाठी शनीची उपासना केली जाते’, हे लक्षात घेऊन आम्ही ‘शनि उपासना’ या उदबत्तीच्या उत्पादनाची निर्मिती केली. त्याच्या वेष्टनावर ‘शनीची उपासना कशी करावी ?’, याविषयी माहिती दिली. आपणही आपल्या उत्पादनांच्या वेष्टनावर आनंदप्राप्ती करण्यासाठी कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगणारी माहिती देऊ शकता. त्यामुळे सहस्रो लोकांपर्यंत साधना पोचू शकेल. सध्या प्रत्येक जण व्यस्त असतो. त्यांना वाटते, ‘साधना करणे, हे म्हातारपणी करण्याचे काम आहे’ व्यावसायिकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, व्यवसाय करतांना अनेक अडचणी येतात. त्या सर्व अडचणी साधना केल्याने देवाच्या कृपेने सुटण्यास साहाय्य होऊ शकते. माझ्या आस्थापनातील सर्व १५ विभागांमध्ये कर्मचार्‍यांकडून प्रतिदिन वैश्‍विक प्रार्थना आणि मारुतिस्त्रोत्र म्हणवून घेतले जाते. यासह १ सहस्र ५०० कर्मचार्‍यांना सत्संग मिळण्याची नियोजन केले आहे. आपल्या आस्थापनातील कर्मचारी सात्त्विक असतील, तेथे भ्रष्टाचार होणार नाही. त्यांच्याकडून साधना करवून घेतल्यामुळे आपला नफा वाढतो, तसेच हिंदु धर्माची सेवा होते.

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे पुन्हा भगवा फडकाण्यासाठी संघर्ष चालूच रहाणार ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

विद्याधिराज सभागृह  महाराष्ट्रातील शौर्याचे प्रतीक असलेल्या गड-दुर्गांवरील आक्रमण म्हणजे लँड जिहादचा प्रकार आहे. गड-दुर्गांमुळे छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मरण होते. सध्याच्या स्थितीत तेथे मशीद, मजार, कबरी यांमुळे ‘ते मोगलांचे आहेत कि काय ?’, असे वाटते.  पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. हे महाराष्ट्रासह भारतातील सर्वच गड-दुर्गांच्या संदर्भात दिसून येते. ठाण्यातील दुर्गाडीवर दुर्गादेवीच्या मंदिर हे मशीद असल्याचा दावा करणे, रायगडमधील कुलाबा दुर्गावर पुरातत्व कार्यालयाजवळ बांधलेली मजार (मुसलमानाचे थडगे), मुंबईतील शिवडीगड, रायगड, सातार्‍यातील वंदनगड, जळगाव येथील पारोळा पेशवेकालीन दुर्ग यांवर झालेले इस्लामी अतिक्रमण हे हिंदूंमध्ये रूजलेल्या सेक्युलॅरिझमचा दुष्परिणाम आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशीच्या सत्रात केले.

ते पुढे म्हणाले की …

१. या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी कार्य केले. प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीभोवती उभारलेली मोठी वास्तू हटवण्यासाठी अनेक हिंदु संघटनांनी बराच काळ संघर्ष केला आणि अंतिमतः १० नोव्हेंबर २०२२ म्हणजे शिवप्रतापदिनीच तेथील अवैध काम उद्ध्वस्त करण्यात आले.

२. कोल्हापूरातील विशाळगडावरील बाजीप्रभु देशपाडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधी उपेक्षित, तर रेहमानबाबाचा दर्ग्यासाठी सरकारने ५ लाख रुपये दिले. ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’द्वारे याच्या विरोधात मोहीम चालू केली. हा दर्गा हटणार नाही, तोपर्यंत संघर्ष चालूच रहाणार आहे.

३. गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण रोखण्यासाठी मार्च २०२३ मध्ये ‘महाराष्ट्र गड-दुर्ग संवर्धन मोर्चा’ काढून गड-दुर्ग संवर्धन समिती स्थापन करण्याची मागणी केली. त्यावेळी १ सहस्र ५०० शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित राहून बैठकीचे आणि अतिक्रमण हटवण्याचे आश्‍वासन दिले.

४. गड-दुर्गांच्या रक्षणाची ही लढाई स्वाभिमान आणि इतिहास यांच्या रक्षणाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम पुढील पिढ्यांना दाखवण्यासाठी गडांचे रक्षण होणे आवश्यक आहे. गड-दुर्गांवरून केवळ ‘हर हर महादेव’च्या घोषणा दुमदुमायला हव्यात आणि तेथे पुन्हा भगवा फडकला पाहिजे. यासाठी आपल्याला संघर्ष चालू ठेवावा लागणार आहे.

तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे याचा सत्कार

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या ६ व्या दिवशी नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला, तसेच ‘गड-दुर्ग संवर्धन मोर्चा’ आणि आगामी चित्रपट ‘सुभेदार’ यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *