धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी आदिवासींच्या घरापर्यंत पोचायला हवे ! – महेंद्र राजपुरोहित, अग्निवीर, नवसारी, गुजरात
रामनाथी – आदिवसांचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्यांकडून षड्यंत्र चालू आहे. ख्रिस्ती मिशनरी आदिवासींना आर्थिक साहाय्य करून त्यांच्यामध्ये स्वतःविषयी सहानुभूती निर्माण करत आहेत. त्यातूनच धर्मांतर होते. आदिवासींच्या घरामध्ये जाऊन ख्रिस्ती त्यांना जवळ करतात. त्यांच्या समस्या सोडवतात. हिंदू संघटना मात्र आदिवासींपर्यंत पोचत नाही आणि ‘आदिवासी धर्मांतर करतात’, असे म्हणतात. प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या घरापुढे तुळस असते, कपाळाला तिलक असतो. प्रत्येकाच्या घरी गाय असते. असे असूनही ‘आदिवासी धर्मांतर का करतात ?’ यावर विचार करणे आवश्यक आहे. आदिवासींचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना तळागाळापर्यंत जाऊन आदिवासींना धर्माविषयी जागृत करावे लागेल. आदिवासींचे धर्मांतर रोखण्यासाठी आम्हीही आदिवासी कुटुंबियांपर्यंत पोचलो. आदिवासी युवक-युवतींचे सामूहिक विवाह लावून देणे, युवकांसाठी खेळांचे आयोजन करणे आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, यांसाठी आम्ही प्रयत्न केले. आतापर्यंत ९ सहस्र आदिवासी बंधू-भगिनींची आम्ही घरवापसी केली आहे. मुगल आणि इंग्रज यांनी आक्रमण करूनही आपल्या पूर्वजांनी हिंदु धर्म सोडला नाही, याचा आपण अभिमान बाळगायला हवा, असे उद्गार नवसारी (गुजरात) येथील ‘अग्निवीर’ संघटनेचे महेंद्र राजपुरोहित यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
धर्मांतरितांचे शुद्धीकरण केल्यानंतर कायदेशीर वैधता प्राप्त होण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी ! – अधिवक्ता नागेश जोशी, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा
रामनाथी – धर्मांतरितांची शुद्धीकरण प्रक्रिया (घरवापसी) या सर्व गोष्टी कायद्यांतर्गत येणारी कार्ये आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम २५ नुसार भारत एक धर्मनिरपेक्ष देश असल्याने कोणत्याही व्यक्तीला वेगळा धर्म स्वीकारण्याची मुभा आहे. तसेच त्याचा प्रसार-प्रचारही करता येतो. हे कलम ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासह हिंदूंनाही लागू आहे.
धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यासाठी धार्मिक विधींसह काही नियम बनवले पाहिजेत. ज्याची शुद्धीकरण प्रक्रिया राबवायची आहे, त्याचे ओळखपत्र, निवडणूकपत्र, रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे घ्यावी. त्यानंतर ‘माझे सनातन हिंदु धर्माविषयी आकर्षण असल्याने मी हा धर्म स्वीकारत आहे’, अशा पद्धतीचे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे. त्यानंतर शुद्धीकरणाचा विधी करावा. त्यानंतर ‘ॲफिडेविट’ (प्रतिज्ञापत्र) बनवावे. त्याने नवीन नाव धारण केल्यावर त्याला ‘गॅझेट पब्लिकेशन’ (हिंदु धर्म स्वीकारल्याच्या संदर्भात वर्तमानपत्रातून निवेदन देणे) करायला सांगितले पाहिजे. या सर्व प्रक्रियेमुळे कागदोपत्री माहिती एकत्रित होते. आतापर्यंत लक्षात आले आहे की, हिंदूंचे अन्य पंथात धर्मांतर झाल्याची कागदपत्रे मिळतात; पण हिंदु धर्मात ‘घरवापसी’ झाल्याची कागदपत्रे बहुदा मिळत नाहीत. त्यामुळे कागदोपत्री माहितीला जमा करण्याला महत्त्व आहे. या संदर्भातील कायदा करण्यासाठी ही माहिती कालांतराने सरकारला देता येते. एखाद्या सरकारने घरवापसी बंदीचा कायदा आणला, तर तो कायदा रहित होऊ नये, यासाठी या माहितीचा उपयोग होईल. त्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेचे दस्ताऐवजीकरण असणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता नागेश जोशी यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी (२२.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
अधिवक्ता नागेश जोशी पुढे म्हणाले,
१. शुद्धीकरण झाल्यावर त्या व्यक्तीला आपल्या न्यासाचे किंवा संघटनेचे एक प्रमाणपत्र देऊ शकतो.
२. हिंदु धर्मानुसार शुद्धीकरणाचे सर्व विधी केल्याने या गोष्टींचा त्याच्यावर धार्मिक संस्कार होतो. त्यामुळे तो आपल्याशी जोडलेला राहतो.
३. ज्याचे शुद्धीकरण केले, त्याची जन्मकुंडली, गोत्र, नाव आदी गोष्टी बनवल्या पाहिजे.
४. त्याचे नवीन आधार कार्ड, रहिवासी पुरावा, निवडणूक पत्र नव्याने बनवावे. हा ‘गॅझेट’ त्याच्या आणि आपल्या जवळ ठेवावा.
५. सार्वजनिक कार्यक्रमांना त्याला बोलावले पाहिजे. त्याच्याकडून थोडे शूल्क घ्या आणि त्याला पावती द्या. त्याचा रेकॉर्ड बनतो.
आपण आपल्या परंपरांच्या क्षेत्रात राहून काम केल्यास आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही.
हिंदु धर्माच्या रक्षणासाठी युवकांना प्रेरित करा ! – प्रकाश सिरवाणी, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख, भारतीय सिंधू सभा
रामनाथी – धर्माचे रक्षण करायचे असेल, तर प्रथम स्वत: धर्माचरण करायला हवे. हिंदु युवकांच्या कपाळाला तिलक दिसत नाही. आपल्या पूर्वजांनी जानवे, तिलक आणि शिखा यांच्या रक्षणासाठी प्राणांचा त्याग केला. हिंदु युवक मात्र कपाळाला तिलक लावत नाहीत. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी युवकांनी प्रेरित करायला हवे. उल्हासनगर येथील सिंधी बांधव दुपारनंतर दुकाने बंद करतात. दुपारनंतरच्या वेळेत ही दुकाने ख्रिस्त्यांनी भाड्याने घेऊन तेथे त्यांचे कार्य चालू केले आहे. येथील काही घरांमध्ये ख्रिस्त्यांनी प्रार्थना चालू केल्या. अशा सिंधी लोकांच्या नातेवाइकांच्या घरामध्ये आम्ही सत्संग चालू केले. हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार भारतीय सिंधू सभेचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख श्री. प्रकाश सिरवाणी यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
लव्ह जिहाद्याचे समर्थन करणार्या ‘सोनी टीव्ही’ला असा शिकवला धडा !
‘सोनी टीव्ही’चा हिंदुद्रोह कशा प्रकारे रोखला, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांचे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात अनुभवकथन !
‘सोनी टीव्ही’वरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत गुन्ह्यांशी संबंधित प्रसंग सविस्तरपणे नाट्यस्वरूपात चित्रित करून दाखवले जातात. ३० डिसेंबर २०२२ या दिवशी गाजलेल्या ‘श्रद्धा वालकर हत्या प्रकरणा’चा एक भाग प्रदर्शित करण्यात आला. हा भाग पाहून देशभरात संतापाची लाट उसळली. या भागामध्ये तपशिलांची मोडतोड करण्यात आली होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यात श्रद्धा वालकर हिचे नाव पालटून एना फर्नांडिस आणि लव्ह जिहादी नराधम आफताबचे नाव पालटून ‘मिहीर’ असे हिंदु मुलाचे पात्र दाखवण्यात आले. यामुळे एका हिंदु मुलाने ख्रिस्ती मुलीचे ३५ तुकडे केल्याचे दाखवण्यात आले. इतका खोटारडेपणा सोनी टीव्हीने केला. हे सर्व धर्मांध लव्ह जिहाद्याचे समर्थन करणारे होते.
याविषयी लोकांनी हिंदु जनजागृती समितीकडे तक्रारी केल्या. त्यामुळे या घटनेविषयी खडसावण्यासाठी २ जानेवारी २०२३ या दिवशी गुरुग्राम (हरियाणा) येथील सायबर सिटीमध्ये असलेल्या ‘सोनी पिक्चर नेटवर्क’च्या कार्यालयात निषेधाचे पत्र देण्यासाठी गेलो; मात्र सोनी टीव्हीच्या कार्यालयातील अधिकार्यांनी भेट देण्यास नकार दिला आणि मुंबईतील कार्यालयात पत्र नेऊन देण्यास सांगितले. यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या बोर्डसमोरच आम्ही एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्याच दिवशी ‘बॉयकॉट सोनी टीव्ही’ (#BoycottSonyTV) हा हॅशटॅग सामाजिक माध्यमांवर ट्रेण्ड (प्रसारित) झाला. या सर्वांचा परिणाम म्हणून अवघ्या ३० मिनिटांतच सोनी टीव्हीच्या कार्यालयातून आम्हाला फोन आला आणि त्यांनी आम्हाला विनंती केली, ‘‘तुम्ही या, आम्ही तुमचे निवेदन स्वीकारायला तयार आहोत.’’ आम्ही त्यांना सांगितले, ‘‘आता आम्ही येणार नाही. तुम्ही समस्त हिंदु समाजाची माफी मागा. जोवर तुम्ही माफी मागणार नाही, तोवर हिंदुत्वनिष्ठ सोनी टीव्हीवर बहिष्कार घालण्याची मागणी कायम ठेवू. आमचे पत्र आम्ही सामाजिक माध्यमे आणि पत्र्यव्यवहार करून तुम्हाला पाठवू !’’
त्यानंतर रात्री ८ वाजता सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत ‘सोशल मीडिया अकाऊंट’वर ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत दाखवण्यात आलेल्या भागातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही खेद व्यक्त करत आहोत’, अशा स्वरूपाची पोस्ट केली. तसेच त्यांच्या सर्व प्रकारच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून तो वादग्रस्त २१२ क्रमांकाचा भाग काढून टाकण्यात आला. अशा प्रकारे हिंदु धर्मावर आघात करणार्यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवल्याविना स्वस्थ बसू नका !’
– श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, देहली