श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ या ई पुस्तकाचे प्रकाशन !
रामनाथी (फोंडा) – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या शेवटच्या म्हणजे २२ जून या दिवशी अमरावती येथील श्री महाकालीमाता शक्तीपाठ प्रतिष्ठानचे श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ (खंड १) : ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर संभाजीनगर येथील संकल्प हिंदु राष्ट्र अभियानाचे अध्यक्ष श्री. कमलेश कटारिया, उत्तरप्रदेश येथील जांबाज हिंदुस्तानी सेवा समितीचे उपाध्यक्ष अधिवक्ता आलोक तिवारी आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रामानंद गौडा यांची वंदनीय उपस्थिती लाभली. हे पुस्तक विक्रीसाठी ‘अॅमेझॉन’वर उपलब्ध असणार आहे.
हिंदु राष्ट्राच्या या धर्मयुद्धात कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था
रामनाथी (फोंडा) – सर्व धर्माभिमानी हिंदु राष्ट्र स्थापनेचे धर्मयुद्ध लढत आहेत. त्यामुळे या कार्यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर विविध अडचणी येत असतात. तरीही भगवंताच्या कृपेने या अडचणींवर मात करून आम्ही सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करतच रहाणार आहोत, असे मत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या शेवटच्या दिवशी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले,
१. हे धर्मयुद्ध लढत असतांना विविध अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी साधना केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक बळ मिळते, तसेच आपल्या कार्यामागे भगवंताचे अधिष्ठान प्राप्त होते. त्यामुळे आपण आपले कार्य अधिक चांगले करू शकतो आणि नेहमी पुढे जात रहातो.
२. साधनेने आपल्या भोवती सूक्ष्म संरक्षण कवच निर्माण होते. त्यामुळे अनिष्ट शक्तींपासून आपले रक्षण होते.
३. प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.
४. सनातनच्या साधकांची भगवंतावर श्रद्धा असल्याने त्यांच्या मुखावर तेज असते. त्यामुळे त्यांचे अनिष्ट शक्तींपासूनही रक्षण होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे ! – श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज, श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान, अमरावती
रामनाथी (फोंडा) – मागील १३ वर्षे आम्ही गोरक्षणाचे काम करत आहोत. आतापर्यंत कसायांच्या तावडीतून आम्ही २ लाख गायींची सुटका केली आहे. गोमातेची तस्करी करतांना वाहनांमध्ये गायींना कोंबण्यात येते. त्यांच्या नाकात दोरी घालून त्यांची दुर्दशा केली जाते. सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय तत्परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याचा निर्णय तत्परतेने का होऊ शकत नाही ? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची विनंती आहे की, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे अन्यथा रस्त्यावर येऊन आम्ही आंदोलन करू. जन्मदात्या आईनंतर गाय आपली माता आहे. आपण गोमातेचे दूध पितो; परंतु तिचे रक्षण करण्यात आपण न्यून पडत आहोत. नांदेड येथे गोरक्षकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. गोरक्षकांना प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. गोमातेचे रक्षण करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवे, असे वक्तव्य अमरावती येथील श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानचे श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात केले.
प्रत्येक हिंदु कुटुंबाने २ गायी पाळल्या, तर भारतात गोशाळांची आवश्यकता भासणार नाही ! – अधिवक्ता आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश
रामनाथी – सरकार गोहत्या थांबवण्यासाठी काही करत नाही, असे अनेकांना वाटते. गायीने दूध देणे बंद केल्यावर आपले हिंदू तिला विकून टाकतात. प्रत्येक हिंदु कुटुंबाने स्वत: २ गायी पाळल्या, तर भारतात गोशाळांची आवश्यकता भासणार नाही, असे उद्गार उत्तरप्रदेशातील ‘जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती’चे उपाध्यक्ष अधिवक्ता आलोक तिवारी यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी (२२.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
जांबाज हिंदुस्थानी सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेले कार्य
१. प्रतापगड जिल्ह्यामध्ये क्रांतीकारक मंगल पांडे यांची प्रतिमा बसवण्यास विरोध होत होता. त्यानंतर आम्ही भाजपच्या आमदारांच्या साहाय्याने क्रांतीकारक मंगल पांडे यांच्या ४ प्रतिमा तेथे स्थापन केल्या.
२. आदिवासी समाज हा हिंदु धर्माचा कणा आहे. आम्ही त्यांची एक वसाहत दत्तक घेतली आहे. आता त्यांना हिंदुत्वाशी जोडून ठेवण्याचे काम करतो.
३. माघ मेळ्यामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शनही तेथे आयोजित केले होते.
४. हिंदु धर्माभिमानी आमदार श्री. राजासिंह हिंदुत्वनिष्ठांचे नेते आहेत. काही मासांपूर्वी त्यांना तेलंगाणा सरकारने अटक केली होती. तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी आमच्या संघटनेने प्रतापगड जिल्ह्यामध्ये निदर्शने केली. श्री. राजासिंह यांना अटक झाल्यावर देशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन प्रचंड विरोध करणे अपेक्षित होते; पण तसे दिसले नाही. ते हिंदूंचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्व हिंदूंनी उभे राहिले पाहिजे.
– अधिवक्ता आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश
पुढील अधिवेशनापूर्वी १ सहस्र गावांमध्ये हनुमान चालिसा चालू करणार ! – श्री. कमलेश कटारिया, अध्यक्ष, संकल्प हिंदु राष्ट्र अभियान, संभाजीनगर
रामनाथी (फोंडा) – हिंदूंची धर्माविषयीची आस्था न्यून झालेली नाही. श्रद्धावान हिंदू त्याच्या वेळेनुसार मंदिरात जातो. या सर्व हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी आम्ही ‘हनुमान चालिसापठण’ हा समानकृती कार्यक्रम निश्चित केला आहे. १४ गावांमध्ये आम्ही हनुमान चालिसाचे पठण चालू केले आहे. या वेळी ४ सहस्रांहून अधिक हिंदू एकत्र येतात. पुढील वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला येण्यापूर्वी १ सहस्र गावांमध्ये हनुमान चालिसा चालू करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात यावे, यासाठी प्रत्येक मासाला आम्ही ‘हिंदू कर्तव्यदिन’ साजरा करतो. यामध्ये प्रत्येक मासाच्या ४ आणि ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषि करावे’, अशी मागणी केली जाते. अशा प्रकारे पत्रांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. हिंदु धर्मावरील सर्व आघातांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा एकमेव उपाय आहे. ‘जागरूक आणि संघटित हिंदूच हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतील, असे वक्तव्य संभाजीनगर येथील संकल्प हिंदु राष्ट्र अभियानाचे अध्यक्ष श्री. कमलेश कटारिया यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या वेळी केले.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवरूपी आकाशगंगेतील एकमात्र सूर्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !
प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न हिंदुत्वनिष्ठाचे संघटन असलेल्या या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला आकाशगंगेची उपमा देता येईल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या आकाशगंगेला साधनेच्या ज्ञानाद्वारे प्रकाश देणारे एकमात्र स्वयंप्रकाशी सूर्य आहेत. मी त्यांच्या चरणी वंदन करतो. येथे उपस्थित संतगण आणि सद्गुरु हे या आकाशगंगेमध्ये सप्तर्षींच्या रूपाने एका वेगळ्या स्थानी आहेत. ज्याप्रकारे तेजस्वी ध्रुवतारा अचल राहून अंधार्या रात्री दिशादर्शनाचे करतो, त्याप्रमाणे या अधिवेशनाला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ हे संतगण या अधिवेशनाला आध्यात्मिक स्तरावर दिशादर्शन करत आहेत. चंद्राची शितलताही महत्त्वाची आहे. त्याप्रमाणे विनम्र स्वभाव आणि चारित्र्यसंपन्न असलेले हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक आणि सनातनचे साधक या महोत्सवाच्या प्रारंभीपासून भोजन, वाहन, निवास या व्यवस्था करत आहेत. चित्रीकरणाच्या माध्यमातून हा महोत्सव सर्व विश्वापर्यंत पोचवत आहेत. या सर्वांचे आपण अभिनंदन करूया. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या महोत्सवात वेगवेगळ्या प्रांतांतून येणारे हिंदुत्वनिष्ठ या आकाशगंगेतील चमचमणारे तारे आहेत !
– श्री. कमलेश कटारिया, अध्यक्ष, ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियान’, छत्रपती संभाजीनगर