Menu Close

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप

सत्ताधारी पंचायत मंडळातील सर्व मुसलमान

रुमडामळ पंचायत

मडगाव (गोवा)– रुमडामळ पंचायतीमध्ये अवैध बांधकामांना बहुमताच्या आधारावर अनुज्ञप्ती दिली जाते. पंचायत चालवतांना पंचायत राज कायदा बाजूला सारून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) कायद्यानुसार ती चालवली जाते, असा आरोप रुमडामळ पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर यांनी केला आहे. पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी प्राणघातक आक्रमण झाले आणि त्यामध्ये ते सुदैवाने वाचले होते. रुमडामळ येथील अनधिकृत मदरशाच्या विरोधात आवाज उठवल्याने हे आक्रमण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पंच विनायक वळवईकर यांनी हा आरोप केला.

रुमडामळ पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर

ते पुढे म्हणाले,

१. पंचायत निवडणुकीनंतर निवडून आलेल्या ५ मुसलमान सदस्यांनी एकत्र येऊन पंचायत मंडळ स्थापन केले. मी आणि विजय सुरमे यांच्यासह सोफीया शेख अन् मुर्तझा यांना पंचायत मंडळातून बाहेर ठेवण्यात आले. सत्ताधारी गट मुसलमान पंचसदस्यांना मंडळामध्ये समाविष्ट करण्यास सिद्ध होता; मात्र त्यांना मंडळात हिंदु पंचसदस्य नको होता. उर्वरित पंचसदस्यांकडून ही माहिती मला मिळाली.

(सौजन्य : RDXGOA GOA NEWS) 

२. नवीन पंचायत मंडळ स्थापन होऊन आता १० मासांचा अवधी उलटलेला आहे. रुमडामळ पंचायतीच्या सरपंच मुबिना फनीबंध यांनी या कालावधीत २०५ दिवस रजा (सुटी) काढलेली आहे. त्याखेरीज दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार आणि उत्सवाचा दिवस या दिवसांच्या सुट्ट्या आहेत. यामुळे प्रतिमास केवळ ५ ते ६ दिवस सरपंच पंचायतीत येतात आणि उर्वरित वेळी पंचायतीच्या कारभाराचे दायित्व उपसरपंचांकडे दिले जाते. यामुळे पंचायत क्षेत्रातील विकासकामे होत नाहीत.

३. अनधिकृत कत्ये आणि बांधकामे यांचा विषय काढल्यानेच माझ्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले अन् याला सैमुल्ला फनीबंध हेच उत्तरदायी आहेत. पंचायत क्षेत्रातील अनधिकृत कृत्ये आणि बांधकामे यांच्यावर सरकार अन् पंचायत संचालनालय यांनी लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

४. पूर्वीच्या पंचायत मंडळाने मदरशाला ‘ना हरकत’ दाखला दिला होता; मात्र मी सरपंच झाल्यावर लोकांच्या मागणीवरून तो दाखला रहित केला. अजूनही या मदरशाला अनुमती नाही; मात्र तरीही तेथे धार्मिक कृत्ये चालू आहेत. याविषयी लोकांच्या मनात भीती असल्यानेच सातत्याने हा विषय ग्रामसभेत उपस्थित केला जात आहे, तरीही पंचायत मंडळाने यासंबंधी काहीही केले नाही. कायद्यानुसार एखाद्याला ‘ना हरकत’ दाखला दिलेला असल्यास आणि त्यासंबंधी पुढे तक्रारी आल्यास किंवा त्याचा कुणालाही त्रास झाल्यास दिलेली अनुमती रहित करता येते अन् यासाठी संबंधितांना नोटीस पाठवण्याचा किंवा पत्र पाठवण्याचा संबंध येत नाही. स्थानिकांनी वर्षभराच्या काळात मदरशाच्या विरोधात ३ तक्रारी केल्या आहेत. पंचायतीच्या अनुमतीविना त्यांनी ईद आणि रमजान साजरी केली, असे वळवईकर यांनी सांगितले.

शुक्रवार असल्याने मशीद परिसरात कडक पोलीस बंदोबस्त

मडगाव (गोवा) – रुमडामळ येथे पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावरील प्राणघातक आक्रमणानंतर तेथील वातावरण हिंदू-मुसलमान वादावरून तणावाचे झालेले आहे. या पार्श्‍वभूमीवर २३ जून या दिवशी शुक्रवारी मशिदीमध्ये नमाज पढतांना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मशीद परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रुमडामळ परिसरात शांती प्रस्थापित होण्यासाठी या भागावर पोलिसांचे लक्ष आहे. पोलिसांनी २ दिवसांपूर्वी या ठिकाणी संचलन केले होते.

रुमडामळ येथील वादग्रस्त मदरसा

वादग्रस्त मदरसा बंद ठेवण्याची पंचायत सचिवांची सूचना

रुमडामळ येथील मदरशामुळे वाद निर्माण झाला होता आणि हा मदरसा तुर्तास बंद ठेवावा अन् त्याचे कुठल्याही प्रकारचे काम केले जाऊ नये, अशी सूचना पंचायतीच्या सचिवांनी केली आहे. रुमडामळ परिसरातील गोमांस (गाय वगळता इतर गोवंशियांचे मांस) विक्रेत्यांची २२ जून या दिवशी पहाणी करण्यात आली. या वेळी विक्रेत्यांनी गोमांस उघड्यावर ठेवून न विकता ते शितकपाटात ठेवून विकण्याची सूचना करण्यात आली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *