Menu Close

गोव्यातील पोर्तुगीज नावे पालटण्याच्या कामाला ‘वास्को’ नाव पालटण्यापासून प्रारंभ करा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’ संघ

गोव्यातील अनेक पंचायतींची नावे आजही पोर्तुगीज !

पणजी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पोर्तुगीज संस्कृतीच्या खुणा पुसून टाकण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचे राष्ट्र्रप्रेमी नागरिकांनी स्वागत केले, तर पोर्तुगीजधार्जिण्यांनी याला विरोध दर्शवला.

प्रा. सुभाष वेलिंगकर

पंचायत किंवा गाव यांची पोर्तुगिजांशी निगडित नावे पालटली पाहिजेत. ही मोहीम ‘वास्को’ शहराचे नाव पालटून चालू करावी, असे आवाहन ‘भारत माता की जय’ संघाचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यातील ख्रिस्ती पोर्तुगीजधार्जिणे आहेत’, असे मी म्हणत नाही. गोवा मुक्तीलढ्यात ख्रिस्ती स्वातंत्र्यसैनिकांनीही मोलाचे योगदान दिलेले आहे. काही जणांना अजूनही पोर्तुगिजांविषयी आत्मीयता आहे आणि ती नष्ट झाली पाहिजे. चर्च मोडून टाकावे, असे आम्ही म्हणत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोर्तुगीज संस्कृतीच्या खुणा पुसून टाकण्याविषयी केलेल्या आवाहनाचे मी स्वागत करतो. संपूर्ण देशात शहर किंवा एखादा परिसर यांची नावे पालटण्याच्या मोहिमेला प्रारंभ झालेला आहे. ‘बाम्बे’चे नाव मुंबई, ‘बेंगलोर’चा उल्लेख ‘बेंगळुरू’, मद्रासचे नाव ‘चेन्नई’ असा करण्यात आले आहे. गोव्यातही नामांतराची ही मोहीम राबवली पाहिजे. वास्को शहरात असलेल्या पालिकेचे नाव ‘मुरगाव नगरपालिका’ असे आहे. शहरातील बंदराचे नावही ‘मुरगाव बंदर’ असे आहे, तर मग ‘वास्को’ हे नाव कसे काय आले ? पुष्कळ वर्षांपूर्वी मुरगाव नगरपालिकेने शहराचे ‘वास्को’ हे नाव पालटण्याची प्रक्रिया चालू केली होती; मात्र कालांतराने पुढे ती थंडावली. देशाची संस्कृती, अस्मिता आणि गोव्याचे वैशिष्ट्य यांचे जतन करण्यासाठी पोर्तुगिजांच्या खुणा पुसून टाकण्यात काहीच गैर नाही.’’

गोव्याच्या स्वातंत्र्याला ६२ वर्षे पूर्ण होऊनही पोर्तुगिजांच्या खुणा अजूनही दृष्टीस पडतात !

१९ डिसेंबर १९६१ या दिवशी गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाला. गोवा स्वतंत्र होऊन आता ६२ वर्षे पूर्ण झालेली आहेत. राज्यात पोर्तुगीज संस्कृती आणि पोर्तुगीज खाद्यपदार्थ यांच्या खुणा अजूनही आहेत. अजूनही कोकणी बोलतांना अनेक जण ‘वालोर’, ‘एंप्रेगात’, ‘आप्रेगात’ हे पोर्तुगीज शब्द वापरतात. गोव्यात काही गावे आणि पंचायती यांची नावेही पोर्तुगीज आहेत. सांता क्रूझ, गोवा वेल्हा, सांत इस्तेव, सेंट लॉरेन्स, साव माथायस, सांत आंद्रे, सां जुजे दि आरीयल, माकाझन, आर्पाेरा, मोयरा, पेन्ह द फ्रान्स, रेईश मागूश, साल्वादोर द मुंद आदी पंचायतींची नावे अजूनही पोर्तुगीज भाषेत आहेत. कुठ्ठाळी गावाचा उल्लेख इंग्रजीत ‘कोर्तालीम’ आणि आगशीचा उल्लेख ‘आगासीम’ असा केला जातो.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *