Menu Close

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. किरण दुसे, श्री. दीपक देसाई, श्री. आनंदराव पवळ, बोलताना श्री. सुनील घनवट, श्री. मनोहर सोरप, श्री. आशिष लोखंडे, श्री. पराग फडणीस आणि श्री. शिवानंद स्वामी

कोल्हापूर – वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धमिर्यांचीही धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लॅण्ड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली.

ते समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कोल्हापूर येथे बोलत होते. या प्रसंगी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

श्री. आशिष लोखंडे म्हणाले, ‘‘आज ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’वर दावा सांगणारा वक्फ बोर्ड उद्या विशाळगडावरील असलेल्या दर्ग्यावर दावा सांगतील आणि अख्खा विशाळगड आमचा आहे, असे सांगण्यासही मागे-पुढे पहाणार नाही.’’ श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘ही मूळ जागा छत्रपती शाहू महाराज यांची असल्याने या प्रकरणी छत्रपती शाहू महाराज यांनी लक्ष घालावे अशी आमची विनंती आहे. वक्फ बोर्डाने ही सोसायटी ताब्यात घेण्यापेक्षा हा सर्व ट्रस्ट त्यांनीच ताब्यात घ्यावा, असे आम्हाला वाटते.’’

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘शाहू महाराजांनी सदर भूमी ही मुसलमानांसह अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचे साधन मिळावे, म्हणून दिली होती. ती केवळ मुसलमानांसाठी वा धार्मिक प्रयोजनासाठी दिलेली नव्हती. असे असतांना वक्फ कायद्याचा दुरुपयोग करून त्यांची भूमी बळकावून मागास समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. ‘‘महाराष्ट्रात आणि कोल्हापूर जिल्ह्यातही वक्फ बोर्डाने हिंदूंच्या जमिनी कह्यात घेण्यास प्रारंभ केला आहे. अशाच प्रकारे तामिळनाडूतील एक संपूर्ण गाव आणि त्या गावातील 1500 वर्षांपूर्वीचे श्रीचंद्रशेखर स्वामींचे मंदिरही वक्फ बोर्डाने बळकावून ती ‘वक्फ बोर्डा’ची संपत्ती असल्याचे घोषित केले आहे. जो धर्मच मुळी 1400 वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आला, तो 1500 वर्षांपूर्वीच्या हिंदु मंदिराचा मालक कसा काय होऊ शकतो ? वक्फ कायद्यामुळे गुजरातमधील हिंदूंचे द्वारका बेट, सुरत महानगरपालिका, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील चंद्रशेखर आझाद पार्क, ज्ञानवापी, मथुरा आदी अनेक जागा वक्फची संपत्ती घोषित करण्याचा सपाटा चालू आहे. हे थांबायला हवे.’’

वर्ष 2009 मध्ये 4 लाख एकर भूमी असलेल्या ‘वक्फ बोर्डा’कडे वर्ष 2023 मध्ये 8 लाख एकर भूमी कशी काय आली ? इतक्या मोठ्या प्रमाणात वक्फ बोर्ड भूमी अधिग्रहित करत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का?’’ या पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाविषयी केंद्रीय स्तरावर तपास व्हायला हवा, ‘वक्फ बोर्डा’ची संपूर्ण चौकशी करून बेकायदेशीरपणे लाटलेली सर्व भूमी संबंधितांना परत केली पाहिजे, तसेच दोषी आढळणार्‍यांना कठोर कारवाई केली पाहिजे, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *