Menu Close

बॉलीवूड जिहाद : हिंदूंच्‍या विरोधातील भयावह षड्‍यंत्र !

१. हिंदी चित्रपटांचा समाजावर सकारात्‍मक आणि नकारात्‍मक परिणाम

‘हिंदी चित्रपट हा आपल्‍या आयुष्‍याचा अविभाज्‍य भाग बनला आहे. गेल्‍या जवळपास ७० वर्षांहून अधिक काळ चित्रपट आपल्‍यावर प्रभाव टाकत आहे. आपल्‍या समाजातील लोकांना पूर्वीपासून आजपर्यंत चित्रपट पहाण्‍याची आवड आहे. या चित्रपटांनी आपले मनोरंजन केले. मनोरंजनासमवेत काही चित्रपटांनी समाजाला ज्ञान आणि चांगला संदेशही दिला. दुसरीकडे जुन्‍या काळात बनलेल्‍या धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांनी आपल्‍या सार्वजनिक मनावर पुष्‍कळ प्रभाव टाकला. आजही त्‍या चांगल्‍या चित्रपटांचे उदाहरण दिले जाते. कलाकारांचा उत्‍कृष्‍ट अभिनय, वास्‍तवाशी जवळीक आणि दिग्‍दर्शकांचे उत्‍कंठावर्धक दिग्‍दर्शन यांमुळे प्रेक्षकांवर मोठी छाप पडली. चित्रपटसृष्‍टीने एका नव्‍या वातावरणाला, अनेक कलाकारांना रोजगार उपलब्‍ध करून दिला. उत्तम संगीतकार, अभिनेते, लेखक, नर्तक, गायक, वादक, दिग्‍दर्शक, वेशभूषा निर्मिती, छायाचित्रकार इत्‍यादींना वाव मिळाला. चित्रपटांच्‍या आगमनामुळे आपल्‍या समाजात बरेच परिवर्तन झाले. सकारात्‍मक पालटांसमवेतच अनेक नकारात्‍मक परिणामही समाजात दिसून आले.

२. हिंदी चित्रपटांच्‍या माध्‍यमातून कथित धर्मनिरपेक्षता आणि जिहादी यांचे उदात्तीकरण

श्री. सचिन सिझारिया

चित्रपटाने भारतीय लोकांचे पुष्‍कळ मनोरंजन केले; पण आपल्‍या समाजात हळूहळू सौम्‍य विषही पसरवले. या विषाचाही एक प्रकारचा जिहादशी संबंध आहे. या हिंदी चित्रपटसृष्‍टीतील  अनेक अभिनेते, दिग्‍दर्शक आदी मुसलमान समाजातील होते आणि आजही आहेत. एकाच समाजातील अनेक लोक या भागात आहेत. कोणत्‍याही प्रकारचे संगीत, नृत्‍य आणि अभिनय करण्‍यास मनाई असलेल्‍या इस्‍लाममधील लोक यात आहेत अन् नव्‍याने भरती होत आहेत. या चित्रपटसृष्‍टीने धर्मनिरपेक्षता डोळ्‍यांसमोर ठेवून अनेक चित्रपट बनवले. हिंदु-मुसलमान बंधुत्‍व दाखवण्‍यात आले आणि जिहादी हे अतिशय सौम्‍य अन् मानवी गुणांनी परिपूर्ण असल्‍याचे दाखवण्‍यात आले.

३. हिंदी चित्रपटांतून हिंदूंना अत्‍याचारी आणि पठाणांना मानवतेचे पुजारी दाखवण्‍याचा प्रयत्न

जसजसा काळ लोटत गेला, तसतसा बंधुभाव दाखवण्‍याच्‍या स्‍पर्धेत हिंंदू आणि त्‍यांच्‍या धार्मिक चालीरिती अल्‍प दाखवल्‍या जात होत्‍या. फाळणीनंतरचा हिंदूंचा नरसंहार चित्रपटसृष्‍टीने नेहमीच लपवला. नुसता लपवूनच ठेवला नाही, तर अत्‍याचार करणार्‍या जिहादींचा गौरव करण्‍यात आला. हिंदूंंवर अत्‍याचार करणार्‍या पठाणांना मानवतेचा ‘मसिहा’ (अवतार) म्‍हटले गेले. हिंदु मूल्‍यांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्‍यात आले. हिंदूंना नेहमीच अत्‍याचारी दाखवण्‍याचा प्रयत्न केला गेला आहे. आपले ब्राह्मण आणि तिलकधारी यांना दलितविरोधी, क्षत्रिय किंवा ठाकूर यांना अत्‍याचारी जमीनदार आणि वैश्‍य समुदायाच्‍या लोकांना लोभी, कंजूस आणि धूर्त दाखवण्‍यात आले. मुसलमान वातावरणावर अनेक चित्रपट बनवले गेले. ज्‍यामध्‍ये मुसलमान पात्राचा गौरव करून सादरीकरण करण्‍यात आले. फाळणीच्‍या काळात मुसलमानांनी हिंदूंवर प्रचंड अत्‍याचार केले. या अत्‍याचारांमुळे प्रचंड संताप निर्माण झाला होता. हा रोष अल्‍प करण्‍यासाठी एका षड्‍यंत्राखाली या चित्रपटांमध्‍ये मुसलमानांचे अतिशय सभ्‍य आणि उच्‍च आदर्श असलेले वर्णन करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला. त्‍या काळी बनवलेले ‘पठाण’, ‘काबुलीवाला’ वगैरे हिंदी चित्रपट त्‍याची उदाहरणे आहेत.

४. फाळणीच्‍या वेळी पाकिस्‍तानमधून आलेल्‍या हिंदु कलाकारांचे मुंबईत बस्‍तान

हिंदी चित्रपटसृष्‍टीत प्रारंभीपासून अनेक मुसलमान अभिनेते, दिग्‍दर्शक, निर्माते, संगीतकार, गायक, छायाचित्रकार इत्‍यादी होते. प्रारंभी बहुतेक मुसलमान अभिनेत्‍यांनी हिंदु नावे धारण केली आणि हिंदु पात्रे पुष्‍कळ चांगली साकारली. बरेच दिवस लोक त्‍यांना हिंदु समजत होते. फाळणीनंतरही अनेक मुसलमान कलाकार पाकिस्‍तानमध्‍ये गेले, तर काही भारतातच राहिले. अनेक हिंदु कलाकार पाकिस्‍तानमधून आले आणि त्‍यांनी मुंबईत त्‍यांचे बस्‍तान बसवले. हिंदु कलाकार बहुतेक पंजाबी आणि सिंधी होते. त्‍यांनी स्‍वतः फाळणीच्‍या वेदना सहन केल्‍या; पण ते दुःख कधी पडद्यावर आणले नाही. आज त्‍यांची तिसरी पिढीही सिद्ध आहे, जी पूर्णपणे व्‍यावसायिक आहे.

५. चित्रपटासाठी मुसलमान लेखक आणि गीतकार यांच्‍याकडून उर्दू भाषा अनिवार्य

१९४० च्‍या दशकापासून मुसलमान समाजावर अनेक चित्रपट बनले. हिंदी चित्रपटसृष्‍टीमध्‍ये प्रेम आणि प्रणय या विषयांवर सर्वाधिक चित्रपट बनले आहेत. हे विषय दाखवण्‍यासाठी शेरोशायरी, गझल, कव्‍वाली, मुशायरा, तराना इत्‍यादींचा पुष्‍कळ वापर केला गेला. संवाद आणि गाणी यांमध्‍ये उर्दू भाषेचा अधिकाधिक वापर केला गेला. हिंदी चित्रपटसृष्‍टीमध्‍ये नियोजनबद्ध पद्धतीने उर्दू भाषा अनिवार्य करण्‍यात आली. मुसलमान लेखक आणि गीतकार उर्दूखेरीज कोणतेही चित्रपटगीत लिहिता येणार नाही, असा आग्रह धरायचे; मात्र नंतरच्‍या काळात हिंदु गीतकारांनी हा समज मोडून काढला.

६. मुसलमान संस्‍कृतीचे उदात्तीकरण करण्‍यासाठी खोट्या आणि काल्‍पनिक कथांची रचना

बहुतेक पटकथाकार मुसलमान आहेत. त्‍यामुळे हिंदी चित्रपटांमध्‍ये उर्दूचा कल पुष्‍कळ वाढला आहे. चित्रपटांमध्‍ये दाखवले जाणारे नृत्‍यही उर्दूने भरलेल्‍या गाण्‍यांवर केले जाते. हिंदी चित्रपटसृष्‍टीने आपल्‍या नृत्‍य कथ्‍थकाला वेश्‍यांच्‍या कोठ्यांमधील नृत्‍य म्‍हणून अधिक प्रमाणात प्रदर्शित केले. मुसलमान निर्मात्‍यांकडून मुसलमान वातावरणावर अनेक चित्रपट बनवले गेले. या चित्रपटांमध्‍ये मोगल आणि नवाब यांच्‍याविषयी बरेच काही दाखवले गेले आणि काही ठिकाणी त्‍यांना चांगले दाखवण्‍याचा प्रयत्न केला गेला. या चित्रपटांमध्‍ये रानटी आणि अत्‍याचारी असलेल्‍या मुसलमान संस्‍कृतीचा गौरव करण्‍यात आला आहे. ज्‍या काही कथा सिद्ध केल्‍या गेल्‍या, त्‍या बहुतेक खोट्या आणि काल्‍पनिक होत्‍या.

प्रेमावर बनवलेल्‍या बहुतेक चित्रपटांमध्‍ये लैला-मजनू, शिरीन-फरहाद, हीर-रांझा, सोनी- महिवाल, मिर्झा-साहिबान, सलीम-अनारकली, जहांगीर-नूरजहां, शाहजहां-मुमताज इत्‍यादी मुसलमान देशांतील आदर्श घेण्‍यात आले. मुसलमान पार्श्‍वभूमीवर बनलेल्‍या बहुतांश चित्रपटांमध्‍ये सुधारणा, आधुनिक युगाशी ताळमेळ आणि देशभक्‍ती यांचा अभाव दिसून आला. मुसलमान पार्श्‍वभूमीवर पुढील चित्रपट बनवले गेले उदाहरणार्थ मिर्झा गालिब, अनारकली, बरसात की रात, मिर्झा साहिबां, हीर-रांझा, सोनी महिवाल, सलीम-अनारकली, जहांगीर, नूरजहां, मेरे महबूब, बहू बेगम, हातिमताई, चौदहवीं का चांद, पाकीजा, हिना, उमराव जान, कुली, ताजमहल, आलम आरा, नेक परवीन, सनम बेवफा, इत्‍यादी अनेक चित्रपट बनले आणि प्रसिद्धही झाले. या सगळ्‍या चित्रपटात कुठेही सुधारणा किंवा परिवर्तन झाल्‍याची चर्चा नव्‍हती. हे सर्व चित्रपट एका प्रेमकथेभोवती फिरणारे आणि मुसलमान संस्‍कृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. या चित्रपटांमध्‍ये इस्‍लामी रितीरिवाजांना अतिशयोक्‍तीपूर्ण दाखवण्‍यात आले. त्‍यात निकाह (लग्‍न), तलाक (घटस्‍फोट) आदी दाखवण्‍यात आले होते; पण हलाला (हलाला म्‍हणजे पहिल्‍या पतीने तलाक दिल्‍यावर परत त्‍याच्‍याशीच विवाह करायचा असेल, तर महिलेने अन्‍य कुणाशी तरी विवाह करून त्‍याच्‍याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर त्‍याने तलाक दिल्‍यावर परत पहिल्‍या पतीशी विवाह करण्‍याची प्रथा.), इद्दत (मुसलमान धर्मानुसार पती वारल्‍यानंतर विधवेला दुसरा विवाह लगेच करता येत नाही. एका विशिष्‍ट समयमर्यादेनंतरच तिला विवाह करता येतो याला इद्दत म्‍हणतात.) ४ बायका इत्‍यादी गोष्‍टी लपवून ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या.

७. १९७० च्‍या दशकापासून हिंदी चित्रपटसृष्‍टीमध्‍ये तस्‍करांची घुसखोरी

१९७० च्‍या दशकापासून हिंदी चित्रपटांमध्‍ये हिंदु मूल्‍यांची घसरण दिसून आली. याचे एक कारण राजकीय आहे. त्‍या वेळी बांगलादेशची निर्मिती झाली आणि पाकिस्‍तानचा पराभव झाला. पाकिस्‍तान भारताशी थेट युद्ध कधीही जिंकू शकत नव्‍हते; म्‍हणून त्‍याने भारताला हानी पोचवण्‍यासाठी इतर पद्धतींचा अवलंब केला. ज्‍यामध्‍ये आतंकवाद, शस्‍त्रास्‍त्रे, अमली पदार्थ, सोने, चांदी, हिरे, रत्ने आदींची तस्‍करी चालू झाली आणि हळूहळू हिंदी चित्रपटसृष्‍टीतही घुसखोरी होऊ लागली.

८. हिंदु देवतांची खिल्ली आणि मुसलमान अंधश्रद्धांचे उदात्तीकरण

या दशकात सलीम खान आणि जावेद अख्‍तर यांचाही उदय झाला. या दशकात पारंपरिक विषयांखेरीज आधुनिक विषयांवर चित्रपट बनू लागले. विदेशी संगीताचा प्रभाव असणारी गाणी येऊ लागली. या दशकात शोले आणि दिवार यांसारखे चित्रपट बनले. या दशकानंतर असे चित्रपट बनवले गेले, ज्‍यात हिंदूंची समाजसुधारणा आणि जुन्‍या वाईट प्रथा यांवर आघात होतांना दिसले. तसेच असे चित्रपटही बनवले गेले, ज्‍यात हिंदु मूल्‍यांची खिल्ली उडवली गेली. या चित्रपटांमध्‍ये शुद्ध हिंदी भाषिकांना विनोदी कलाकार दाखवण्‍यात आले होते.

शोलेसारख्‍या चित्रपटात हिंदु देवतांच्‍या आडून किंवा कलाकारांकडून देवतांची खिल्ली उडवणे चालू झाले. पीर फकीर, साईबाबा, ७८६ अंक (इस्‍लाममधील पवित्र आकडा. या आकड्याचे स्‍मरण केल्‍यास कार्यामध्‍ये यश मिळते, अशी श्रद्धा.), रोजा (उपवास), नमाज यांच्‍याविषयीच्‍या अंधश्रद्धेचे उदात्तीकरण करण्‍यात येऊ लागले. हिंदु नायकही पाद्य्राकडे जाऊन अपराध मान्‍य करू लागला. ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात किशनलालची मुले मुसलमान आणि ख्रिस्‍ती बनली.

गुंड आणि टोळके साधूसंतांचा वेश धारण करून चोरी, तस्‍करी इत्‍यादी गुन्‍हे करू लागले. गुन्‍हेगारांना लाल टिळा लावलेले, शिखा ठेवलेले, माळा धारण केलेले इत्‍यादी हिंदु प्रतिकांमध्‍ये दाखवण्‍यात आले. हिंदु क्षत्रिय पात्रांना अत्‍याचारी आणि वासनांध दाखवण्‍यात आले. हिंदु व्‍यापारी हा लोभी, पैसे घेणारा आणि दुष्‍ट हेतूने दाखवण्‍यात आला. हे सर्व लढणार्‍या धर्मनिरपेक्ष नायकाला जर कुणी पाठिंबा दिला असेल, तर तो पठाणभाई किंवा अब्‍दुलचाचा होता.

९. ‘बॉलीवूड जिहाद’ समजून घेऊन त्‍याच्‍याशी लढणे आवश्‍यक !

समाजवादाच्‍या आधारे मालक-कामगारांचा संघर्ष दाखवला गेला. या काळात पाश्‍चिमात्‍य सभ्‍यतेचा प्रभाव चित्रपटांमध्‍ये दिसू लागला. तुटपुंज्‍या कपड्यांमध्‍ये दिसणार्‍या महिला कलाकार आणि त्‍यांचे अश्‍लील नृत्‍य यांचा ‘ट्रेंड’ वाढू लागला. पब, कॅसिनो, हॉटेल्‍स इत्‍यादींमध्‍ये तुटपुंजे कपडे घातलेल्‍या स्‍त्रिया अश्‍लील नृत्‍य करतांना दाखवल्‍या जात होत्‍या. त्‍याच वेळी धर्मनिरपेक्षतेच्‍या नावाखाली हिंदु तरुणींना परधर्मियांशी लग्‍न करतांना दाखवण्‍यात आले. समाजात गुन्‍हेगारी आणि अश्‍लीलता पसरवण्‍याचे युग येथून चालू झाले. धार्मिक चित्रपट बनणे अल्‍प झाले. १९९० च्‍या दशकात तर त्‍यांची निर्मितीच थांबली. बाबरी विद़्‍ध्‍वंस आणि काश्‍मीरमधून हिंदूंचे पलायन यानंतर चित्रपटांच्‍या पटकथांमध्‍ये परिवर्तन दिसून आले. खलनायकांच्‍या पात्रांना प्राधान्‍य देण्‍यात आले. १९९० च्‍या दशकामध्‍ये आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे ३ मुसलमान कलाकार उदयास आले. ज्‍यांनी गेली ३५ वर्षे त्‍यांचा प्रभाव कायम ठेवला. ‘टी-सिरीज’चे मालक गुलशन कुमार यांच्‍या हत्‍येनंतर चित्रपटांतील भजन, आरती आदी धार्मिक गाण्‍यांचा ‘ट्रेंड’ संपला. ‘अंडरवर्ल्‍ड’चा प्रभाव हिंदी चित्रपटसृष्‍टीवर दिसू लागला. हिंदु नायकांना पूर्णपणे धर्मनिरपेक्ष दाखवण्‍यात आले. आजची परिस्‍थिती आणखी वाईट आहे. आता आतंकवादाचा पैसा चित्रपटांमध्‍ये गुंतवला जात आहे आणि हिंदूंची अधर्मी पिढी आपल्‍याच धर्माची खिल्ली उडवतांना दिसत आहे.

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्‍सॉर बोर्ड) पूर्णपणे विकले गेले आहे, अशी शंका येते. त्‍यात काम करणारे अधिकारी पैसे घेऊन दृश्‍य संमत आणि रहित करत आहेत, असे कुणाला वाटल्‍यास आश्‍चर्य ते काय ? ‘बॉलीवूड जिहाद’ समजून घेणे आणि रणनीतीने त्‍याच्‍याशी लढणे अतिशय महत्‍वाचे आहे; कारण यामुळे आपली झालेली हानी थांबवणे अतिशय महत्त्वाचे आहे.’

– श्री. सचिन सिझारिया, पुणे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *