Menu Close

देवगड (सिंधुदुर्ग) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

भाविकांनी सहकार्य करण्याचे देवस्थान समितीचे आवाहन

  • मंदिरात वस्त्रसंहिता लागू केल्याविषयी कुणकेश्वर देवस्थान समितीचे अभिनंदन ! – संपादक 
श्री देव कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत असल्याचा फलक

देवगड – हिंदु संस्कृतीचे रक्षण व्हावे आणि मंदिराचे पावित्र्य जपले जावे, यासाठी श्री देव कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत असल्याचे देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांनी २१ ऑगस्ट २०२३ या दिवशी सांगितले. ‘भाविकांनी समितीच्या प्रयत्नांना सहकार्य करावे’, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

वस्त्रसंहितेविषयी माहिती देतांना डावीकडून सर्वश्री अजय नाणेरकर, दिनेश धुवाळी आणि संजय आचरेकर

श्रावण मासातील सोमवारी शिवमंदिरात भाविक मोठ्या संख्येने जात असतात. यावर्षी २१ ऑगस्ट या दिवशी श्रावण मासातील पहिला सोमवार आला. या पार्श्वभूमीवर माहिती देतांना माजी सरपंच गोविंद घाडी, संजय आचरेकर, संतोष गणेश वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम, सुधाकर नानेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी देवस्थान समितीचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी म्हणाले, ‘‘श्री देव कुणकेश्वर देवस्थान समितीच्या वतीने वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे. मंदिरात येणार्‍या भाविकांनी फाटलेले कपडे, उत्तेजक कपडे परिधान करू नयेत. आपली हिंदु संस्कृती जपली गेली पाहिजे. भाविकांनी हिंदु धर्माचे पालन करावे. याविषयी मंदिराच्या ठिकाणी फलक लावण्यात आले असून विविध स्तरावर प्रबोधन करण्यात येणार आहे.

(सौजन्य : Sindhudurg 24 taas)

मंदिरात येणार्‍या सर्वांनाच वस्त्रसंहितेविषयी ठाऊक असेल, असे नाही. त्यामुळे देवदर्शनासाठी आले आणि भाविक माघारी गेले, असे होऊ नये, यासाठी देवस्थान समितीकडून भाविकांसाठी पंचा, उपरणे, शाल आदी कपड्यांची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. हिंदु संस्कृती आणि देवस्थानचे पावित्र्य टिकवण्यासाठी भाविकांनी या निर्णयाचे स्वागत करून प्रशासनास सहकार्य करावे. श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे, तसेच ४ सप्टेंबर या दिवशी कुणकेश्वर येथील भक्तनिवासात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.’’

श्री देव कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत असल्याचे ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *