Menu Close

मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्‍या लाचार हिंदूंमुळेच भारताला उशिरा स्वातंत्र्य मिळाले ! – पू. भिडेगुरुजी

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याशी चर्चा करतांना धारकरी

मडगाव – मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्‍या लाचार हिंदूंमुळेच भारत देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हिंदूंची मानसिकता अशी आहे की, पैसे फेकले की, ते कशालाही सिद्ध होतात. येथे कुणीही यावे, व्यापार करावा आणि येथे स्थायिक व्हावे. या मानसिकतेमुळेच मोगल आणि इंग्रज यांनी येथे राज्यसत्ता स्थापन केली, असे घणाघाती विचार पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी दवर्ली, मडगाव येथील स्वामी समर्थ सभागृहात अखिल गोमंतकीय हिंदु धर्मसभेत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘हिंदु समाज समुद्रातील रेतीसम आहे. चिकटून रहाणारा नाही. केवळ स्वत:पुरता विचार करणारा संकुचित विचारसरणीचा आहे. त्यामुळेच मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आदींनी आमचा लाभ उठवला. ते राजे आणि आपण दास (गुलाम) झालो. अशा काळात शिवबाचा (छत्रपती शिवाजी महाराजांचा) जन्म झाला. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांनी २८९ लढाया केल्या. सतत ३६ वर्षे क्षणभरही विसावा न घेता झटले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांच्या देशभक्त मावळ्यांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी जे जे पराक्रम गाजवले, ज्या यातना झेलल्या, ते केवळ रयतेचे कल्याण आणि हिंदवी स्वराज्यासाठीच ! महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली. या बातम्या सर्वप्रथम इंग्लंडमध्ये छापून आल्या. एवढे त्यांचे महाराजांकडे लक्ष होते.

महाराष्ट्रात ब्रिटिशांनी लष्करी शिक्षणाची शाळा उघडली. मराठा रेजिमेंटमध्ये (तुकडीमध्ये) लाखो तरुण सहभागी झाले. ते शेवटी ब्रिटीश सरकारचे नोकर झाले. त्या वेळी त्यांनी राष्ट्राचा विचार केला असता, तर आपण त्यांचे दास झालोच नसतो. मोहनदास गांधी यांनी, ‘आपण निशस्त्र लढा दिला, तरच स्वतंत्र होणार. अहिंसात्मक लढाच आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणार. शस्त्राने, हिंसेने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केल्यास ब्रिटीश सरकारसमवेतचे आपले संबंध ताणले जातील’, असे विचार लोकांच्या मनावर बिंबवले. त्यामुळेच स्वातंत्र्य उशिरा मिळाले. यातही गांधींना दोष देण्यापेक्षा आपण आत्मचिंतन करायला हवे; कारण आपण क्षत्रियत्व तेव्हाही विसरलो होतो आणि आजही आम्हा हिंदूंची तीच मानसिकता आहे; म्हणूनच आपण संघटित नाही.’’

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे दोडामार्ग येथे स्वागत

दोडामार्ग – गोवा राज्यात असलेल्या एका नियोजित कार्यक्रमासाठी जातांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी काही वेळ दोडामार्ग शहरात थांबले होते. येथील श्री पिंपळेश्वर मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. या वेळी उपस्थित धारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भारतमाता की जय संघटनेचे गणेश गावडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मंगेश पाटील आदी उपस्थित होते.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *