Menu Close

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांवर एकमेव उपाय, म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा सकल हिंदु समाज, रत्नागिरीच्या वतीने जाहीर सत्कार !

श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार करतांना  उद्योजक श्री. तुषार देवळेकर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ
रत्नागिरी – आज जगात जेवढी राष्ट्रे आहेत, ती सर्व धर्माच्या आधारावरील आहेत. केवळ भारत देश ‘सेक्युलर’ आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर त्यांचा ‘इस्लामी रिपब्लिक’ म्हणून उदय झाला, मग भारत ‘हिंदु रिपब्लिक’ का झाला नाही ? खरे पाहिले, तर जगातील कुठलीही राज्यघटना ही त्या देशातील बहुसंख्य लोकांसाठी असते, अल्पसंख्यांकांसाठी नाही. भारत जगातील एकमेव देश आहे, जेथे सर्व अधिकार अल्पसंख्यांकांना दिले आहेत, बहुसंख्यांकांसाठी काही नाही. बहुसंख्यांकांना कुणी विचारतही नाही. याच परिस्थितीचा लाभ उठवत हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा आदींवर घाला घालण्यात येत आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘हलाल जिहाद’ आदी अनेक जिहादांच्या माध्यमांतून हिंदूंवर आघात केले जात आहेत. या सर्व आघातांवर एकमेव उपाय, म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हा आहे. यामुळे आपण हिंदुहिताची राज्यघटना सिद्ध करू शकतो, असा विश्‍वास हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केला.

शहरातील जयेश मंगल पार्क या ठिकाणी सकल हिंदु समाज, रत्नागिरीच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी ‘हिंदु धर्मावरील सर्व आघातांवरील उपाय हिंदु राष्ट्र’ या विषयावर श्री. शिंदे बोलत होते.

श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार प्रमुख पाहुणे उद्योजक श्री. तुषार देवळेकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ढाल-तलवारीची प्रतिमा भेट देऊन केला. या वेळी व्यासपिठावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. राकेश नलावडे, जनजागृती संघाचे श्री. केशव भट आणि राष्ट्रीय सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष, तसेच सागरी सुरक्षा मंचचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पावरी हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.  श्री. चंद्रकांत राऊळ यांनी श्री. रमेश शिंदे यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मिथिला वाडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्वश्री अभय दळी, ओंकार रहाटे, अमर कीर, दीपक देवल, प्रभाकर खानविलकर, तेजस साळवी, शुभम जोशी, विनोद गादीकर, संजय जोशी आदींसह २५० जण उपस्थित होते.

हा सत्कार सर्वांचा आहे ! – रमेश शिंदे

सत्काराला उत्तर देतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले की, डॉ. झाकीर नाईक यांना भारताबाहेर काढल्याविषयी आणि म.फि. हुसेन यांच्या विरोधी आंदोलन केल्याविषयी मला सत्कार मिळेल, असे मला कधी वाटले नव्हते. हे कार्य माझ्या एकट्याचे नाही. यामागे अनेकांच्या प्रेरणा आणि अनेकांची साथ आहे. हा सत्कार त्या सर्वांचा आहे.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की,

१. मी त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिशा, बंगाल आणि झारखंड या राज्यांत फिरलो. तेथे हिंदु धर्म आणि हिंदुत्व या संकल्पनाही लोकांना ठाऊक नाहीत. मला या भागांतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांना दाद द्यावीशी वाटते; कारण ते त्यांचा जीव धोक्यात घालून कार्य करत आहेत. समाजाला राष्ट्रीयतेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. आज अनेक प्रकारचे ‘जिहाद’ चालू आहेत. यांतील एक ‘हलाल जिहाद’ आहे. हलाल हे मांसांशी संबंधित आहे. आपण बाजारातून जे खाद्यपदार्थ घेतो, त्यावर ‘ते खाद्यपदार्थ १०० टक्के शाकाहारी आहेत’, हे समजण्यासाठी हिरवा शिक्का असतो. तो कशासाठी आहे ?, असा  प्रश्‍न आपल्याला पडत नाही. केवळ खाद्यपदार्थच नाही, तर ज्यांचा खाण्याशी कसलाही संबंध नाही, अशा अनेक वस्तू आज ‘हलाल’ प्रमाणिकीकरण झालेल्या आहेत. ‘हलाल जिहाद’ हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील आघात आहे. आपण हे समजून घेऊन देशाची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी सतर्कतेने खरेदी करायला हवी.

३. आज ‘जमियत ए उलेमान’ ही संघटना २०२८ पर्यंत सव्वा कोटी मुसलमानांची फौज सिद्ध करण्याचे ध्येय घेऊन कार्यरत आहे. यांना पैसा कुठून येतो ? याही पुढे जाऊन ‘इस्लामिक कॉइन’ काढण्यात आले आहेत. ‘हलाल शेअर मार्केट’ चालू आहे.

४. यासह ‘लव्ह जिहाद’चे संकटही आपल्यापुढे उभे आहे. ज्या देशात छत्रपती संभाजी महाराजांनी हालहाल सहन करून प्राणत्याग केला; पण धर्म पालटला नाही, राणी पद्मिनीने, १ सहस्र ६०० महिलांसह जौहार केला. असे जौहार त्या वेळी अनेक ठिकाणी झाले; पण त्यांनी धर्म पालटला नाही. ज्या माता-भगिनींनी धर्मासाठी प्राणत्याग केला, त्याच माता भगिनींचा आज सलमान खान आवडता कसा असू शकतो ? आपल्या माता-भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विषयी जाणून घेऊन त्याविषयी जागृत रहाणे आवश्यक आहे.

५. या सर्व समस्या अशाच संपणार नाहीत. त्यांना सामोरे जावे लागेल. आपल्याकडे लढण्याची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीकारक सर्वांनी लढा हा दिलाच आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *