Menu Close

कार्यान्वित न झालेली 45 ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने सुरू करा ! – ‘सुराज्य अभियाना’द्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रस्ते अपघातात जखमींना त्वरीत उपाचार मिळावेत, म्हणून राज्यात अनेक ठिकाणी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू करण्यात आली आहेत; मात्र वर्ष 2021 आणि 2022 मध्ये 60 हजार रस्ते अपघातात 27 हजार जणांचा मृत्यू झालेला आहे. ही संख्या दरवर्षी वाढतच आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात एकूण 108 ‘ट्रॉमा केअर सेंटर’ मंजूर झालेले असतांना त्यापैकी केवळ 63 कार्यान्वित आहेत, तर तब्बल 45 ‘ट्रॉमा केअर सेंटर्स’ कार्यान्वितच नसल्याचे ‘माहिती अधिकारा’तून उघड झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढते, असा अनुभव आहे. या दृष्टीने भाविकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अपघातात प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना तातडीने उपाचार मिळायला हवेत, म्हणून शासनाने अद्याप कार्यान्वित न झालेली उर्वरित 45 ‘ट्रॉमा केअर सेंटर्स’ त्वरीत चालू करावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.

‘सुराज्य अभियान’च्या वतीने केलेल्या माहिती अधिकारात राज्यातील 45 ‘ट्रॉमा केअर सेंटर्स’ कार्यान्वित झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यात पालघर जिल्ह्यात एकही ‘ट्रॉमा केअर युनिट’ कार्यान्वित नाही, तर सांगली जिल्ह्यात हायवेच्या जवळ असणार्‍या इस्लामपूरमध्ये युनिट मंजूर झाले आहे; पण त्याची प्राथमिक स्तरावरील प्रक्रिया चालू झालेली नाही. मुंबई ते गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्‍या माणगांवातही ट्रॉमा केअर सेंटर चालू झालेले नाही. अशाच प्रकारे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील सातार्‍यातील खंडाळा येथील आहे. ‘ट्रॉमा केअर सेंटर’ हा राज्यातील जनतेच्या जीविताशी निगडीत अत्यंत संवेदनशील विषय आहे. विद्यमान सरकार हे जनतेच्या समस्या जाणून त्यावर त्वरीत कृती करणारे आहे. या दृष्टीने मा. मुख्यमंत्री महोदय निश्चितच या विषयात लक्ष घालून हा विषय मार्गी लावतील, अशी आम्हाला आशा आहे, असेही श्री. मुरुकटे यांनी म्हटले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *