Menu Close

तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्‍पना राबवून गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवा !

हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

महापालिकेच्‍या आयुक्‍त के. मंजूलक्ष्मी (उजवीकडे) यांच्‍याशी चर्चा करतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

कोल्‍हापूर (महाराष्ट्र) – गणेशोत्‍सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या अशास्‍त्रीय संकल्‍पना राबवून श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबण्‍यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने कोल्‍हापूर महापालिका आयुक्‍त के. मंजूलक्ष्मी यांना देण्‍यात आले. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई, ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे जिल्‍हाप्रमुख श्री. मनोहर सोरप आणि श्री. नंदकुमार घोरपडे, शिवसेना उपजिल्‍हाप्रमुख श्री. उदय भोसले, बजरंग दलाचे श्री. प्रथमेश मोरे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. अवधूत चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, शिवानंद स्‍वामी, बाबासाहेब भोपळे, मधुकर नाझरे उपस्‍थित होते.

कोल्‍हापूर महापालिकेच्‍या आयुक्‍त के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

या वेळी करण्‍यात आलेल्‍या मागण्‍या

१. प्रशासनाने वा अन्‍य अशासकीय संस्‍थांनी गणेशभक्‍तांकडून ‘मूर्तीदान’ घेऊ नये.

२. लाखो-कोट्यवधी रुपये व्‍यय करून कृत्रिम तलाव सिद्ध करण्‍यात येऊ नयेत.

३. गेल्‍या काही वर्षांपासून प्रशासन पंचगंगा नदीवर बॅरिकेट्‌स लावून मूर्तीविसर्जन करण्‍यास बंदी करते. ज्‍या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करायचे आहे, त्‍यांना ते करू द्यावे.

४. श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्‍त्राचा कोणताही आधार नसणार्‍या ‘यांत्रिक पद्धती’ची (कन्‍व्‍हेअर बेल्‍ट) व्‍यवस्‍था करू नये.

असे करण्‍याऐवजी महापालिकेने इराणी खण येथे विसर्जनासाठी घाट पद्धतीने पायर्‍यांचे बांधकाम केल्‍यास भाविकांना थेट आत उतरून विसर्जन करणे शक्‍य होईल, तसेच घाट पद्धतीचे बांधकाम केल्‍याने भाविकांना आरती करणे शक्‍य होईल.

५. गतवर्षी भाविकांकडून दान म्‍हणून घेतलेल्‍या श्री गणेशमूर्ती इराणी खण येथे फेकून देतांनाचा ‘व्‍हिडिओ’ समोर आला होता. असे करणे हा भाविकांनी ज्‍या श्रद्धेने श्री गणेशमूर्ती दिल्‍या, त्‍या धर्मभावनांचा हा अवमान आहे. तरी गणेशोत्‍सव मंडळांना, तसेच गणेशभक्‍तांना पूर्वापार चालत आलेल्‍या धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्तीविसर्जन करण्‍यास अनुमती दिल्‍यास असे प्रकार आपोआपच टळतील.

गणेशभक्‍तांनो, श्री गणेशमूर्ती फेकून देऊन गणेशाची अवकृपा ओढवून घेण्‍यापेक्षा मूर्तीविसर्जन करून त्‍याची कृपा संपादन करा !

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *