मुंबई – मागील काही कालावधीत हिंदुत्वनिष्ठांवर ‘हेटस्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. सर्वाेच्च न्यायालयानेही ‘हेटस्पीट’च्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणारे उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयाने स्वत:हून खटला प्रविष्ट करून कारवाई करावी आणि त्यांच्यावर ‘हेटस्पीच’ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. आनंद जाखोटिया यांनी केली. ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवर ‘उदयनिधी बोलला, अजेंडा उघडा पडला’ या ‘लक्षवेधी’ चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रामध्ये भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आणि काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी हे सहभागी झाले होते. प्रसाद काथे यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.
या वेळी आनंद जाखोटिया म्हणाले, ‘‘हिंदु समाज अशा प्रकारचे वक्तव्य खपवून घेणार नाही. मोगल, इंग्रज यांच्या आक्रमणांनंतरही हा पुरातन सनातन धर्म टिकून आहे. आद्यशंकराचार्य, स्वामी विवेकानंद आदी थोरपुरुषांनी विश्वाला तत्त्वज्ञान सांगितले. अशा महान धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्या उदयनिधी यांना हिंदू जागा दाखवून देतील. हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र जागतिक पातळीवर चालू असून भारतातही असे प्रकार चालू आहेत. ‘जवान’ चित्रपटाच्या वितरणामध्ये उदयनिधी यांच्या आस्थापनाचा सहभाग आहे. त्यामुळे या चित्रपटावर बहिष्कार घालून हिंदु समाज त्यांचा विरोध दाखवून देईल.’’
या वेळी भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर यांनी म्हटले, ‘उदयनिधी हे तमिळनाडू सरकारमधील एक मंत्री आहेत. घटनात्मक पदावर बसणार्या व्यक्तीने हिंदु धर्माची अपकीर्ती करणे, हे निषेधार्ह आहे. उदयनिधी यांचे वक्तव्य म्हणजे तेथील सरकारची प्रतिक्रिया आहे.’
काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, ‘‘उदयनिधी हे इंडिया आघाडीमध्ये असले, तरी ते आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत. इंडिया आघाडीमध्ये आम्ही केवळ समान कार्यक्रमाच्या आधारे देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. उदयनिधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. त्यांच्या वक्तव्याविषयी आम्ही असंतोष व्यक्त केला आहे.’’
सूत्रसंचालक महेश काथे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी ‘सहिष्णुतेचे पांघरूण घेऊन हिंदू आणखी किती दिवस असे प्रकार सहन करणार ?’, असा प्रश्न उपस्थित केला.