Menu Close

गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !

  • बायणा, वास्को येथे ‘स्कूल जिहाद’चे आणखी एक प्रकरण उघडकीस

  • प्राचार्यांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषद आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना

वास्को (गोवा) – दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालय या सरकारी अनुदानित शाळेच्या हिंदु विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे इस्लामी कार्यशाळेसाठी पाठवण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतांनाच बायणा, वास्को येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना इस्लामी कार्यशाळेच्या नावाखाली मशिदीत पाठवून त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी १२ सप्टेंबरला बायणा, वास्को येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांना या प्रकरणी खडसावले. प्राचार्यांनी ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ या बंदी घातलेल्या संघटनेशी संलग्नित ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेच्या आवाहनाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवले. यासाठी शिक्षण खात्याची अनुमती घेतली नाही, तसेच संघटनेची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. या प्रकरणी विद्यालयाच्या प्राचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषद आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली आहे.

विश्व हिंदु परिषदेचे संजू कोरगावकर म्हणाले, ‘‘बायणा, वास्को येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी मशिदीत अशाच प्रकारे पाठवल्याची स्वीकृती प्राचार्यांनी दिली आहे. विद्यालयाच्या प्राचार्यांनी या प्रकरणी पूर्णपणे निष्काळजीपणा केला असून त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी.

(सौजन्य : In Goa 24×7) 

विश्व हिंदु परिषदेचे अन्य कार्यकर्ते म्हणाले, ‘‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला ‘तुर्कीस युथ फाऊंडेशन’ या आतंकवादी संघटनेकडून निधी मिळतो. विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद करून त्यांना आतंकवादी बनवण्याचे हे एक षड्यंत्र आहे. ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’चे कार्यालय मिरामार येथे कार्यरत आहे. त्या ठिकाणी पूर्वी ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘सिमी’ या बंदी असलेल्या आतंकवादी संघटनांची कार्यालये कार्यरत होती. पोलिसांनी यावर कारवाई करावी.’’

‘आमचा उद्देश धार्मिक सलोखा टिकवून  ठेवण्याचा ! – ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’

‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’च्या पदाधिकार्‍यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले…

१. आमचा उद्देश धार्मिक सलोखा टिकवून ठेवणे आणि एकोपा निर्माण करणे हा होता.

२. विद्यार्थ्यांच्या अनुमतीविना आमची संघटना कोणतीच कृती करणार नाही.

(सौजन्य : Goan Reporter News)

३. दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर यांचे निलंबन संबंधित शिक्षण संस्थेने मागे घ्यावे. (निलंबन नव्हे, तर त्यांना बडतर्फ करून हिंदूंची क्षमा मागायला भाग पाडले पाहिजे ! – संपादक)

४. गोमंतकियांनी नागरिकांची दिशाभूल करणार्‍या संघटनांच्या कृतींना बळी पडू नये.

५. आम्ही अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी इस्लामिक कार्यशाळेचे आयोजन करण्याची कृती मागील १० वर्षांपासून करत आहोत.’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *