हांसी (हरियाणा) – आज हिंदु समाज जातीयवादाच्या भोवर्यात अडकलेला आहे. आपण स्वतःची ओळख करून देतांना गुज्जर, वाल्मीकि, राजपूत अशी देतो; पण नूंह (मेवात)मध्ये दंगल झाली, तेव्हा धर्मांधांनी ‘तुम्ही (हिंदू) कोणत्या जातीचे आहात ?’, हे पाहिले नाही. केवळ हिंदु म्हणूनच वाहने, दुकाने जाळली आणि गोळ्या चालवल्या. म्हणून आपण लक्षात घेतले पाहिजे की, आता जातीयवाद सोडून आपल्याला हिंदु म्हणून धर्मरक्षणाच्या कार्यासाठी एकत्रित येणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे उद़्गार तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी काढले. हांसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये आयोजित विराट हिंदु धर्मजागृती सभेत ते हिंदूंना संबोधित करत होते. या सभेला ५ सहस्र हिंदूंची उपस्थिती होती. ‘विश्व हिंदु परिषद’ आणि ‘बजरंग दल’ यांच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम अन् धर्मजागृती सभा यांचे आयोजन ‘सकल हिंदू समाज, गाव बडसी’ तथा सर्व धर्माभिमानी हिंदूंकडून करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी आमदार टी. राजा सिंह यांची भेट घेतली.
आमदार टी. राजा सिंह पुढे म्हणाले की, राजकारण आणि धर्मरक्षण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांना जर एकत्र आणले, तर दुधामध्ये मीठ टाकले की, ते खराब होते, तसेच राजकारण आणि धर्मरक्षण एकत्र आले, तर काय होईल, हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
टी. राजा सिंह यांनी उपस्थित हिंदूंकडून करवून घेतलेली प्रतिज्ञा
भगवान श्रीकृष्णाला साक्षी ठेवून आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया की, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी माझा धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी सक्रीय राहीन. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी जातीयवादाच्या भोवर्यात न अडकता देव, देश, समाज आणि धर्म यांच्या रक्षणासाठी माझ्या प्राणाचाही त्याग करीन !
स्रोत: दैनिक सनातन प्रभात