Menu Close

औरंगाबाद जिल्हा झाला ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशिव’ !

सरकारचे राजपत्र प्रकाशित !

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) – ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ या जयघोषाच्या निनादात ‘छत्रपती संभाजीनगर’ महसुली विभाग आणि ‘धाराशिव’ जिल्हा नामकरण फलक यांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १६ सप्टेंबर या दिवशी करण्यात आले. ‘औरंगाबाद’ शहराचे नाव पालटल्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्याचेही नावही ‘छत्रपती संभाजीनगर’ जिल्हा असे करण्यात आले आहे.

‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना’च्या आदल्या दिवशी, तसेच छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी राज्यशासनाच्या वतीने राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. ‘उस्मानाबाद’ शहरानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्याचेही नाव ‘धाराशिव’ करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यांची नावे पालटण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी शिवसेना आणि भाजप यांच्या वतीने अनेकदा आंदोलनेही करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात मनसेनेही आंदोलन केले होते; मात्र एम्.आय.एम्. आणि काँग्रेस यांच्या काही नेत्यांनी या नामांतराला विरोध केला होता.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाने या शहराचे नाव पालटण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक या नामांतराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी चालू होती. त्या वेळी राज्यशासनाच्या वतीने आक्षेपांची पडताळणी झाली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे एवढ्या लवकर राज्य सरकार असा निर्णय घेणार नसल्याचे वाटत होते; मात्र आता राज्यशासनाच्या वतीने राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे.

यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र यामध्ये औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव, तसेच उस्मानाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांचे नाव पालटण्यात आले नव्हते. ते आता राजपत्र प्रकाशित करून पालटण्यात आले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *