इंटरनेटचा वापर करणार्यांना कोणताही विषय अथवा व्यक्ती यांविषयी माहिती हवी असेल, तर ते विकीपीडिया या संकेतस्थळाचा उपयोग करतात. विकीपीडिया हे संकेतस्थळ एखाद्या विश्वकोशासारखे (एनसायक्लोपीडियासारखे) आहे. यावरील माहिती इतर संकेतस्थळांच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह असल्याचे मानण्यात येते, तसेच हे संकेतस्थळ विचारधारांच्या पलीकडे जाऊन सर्वांगाने विचार करून विषय मांडते, असा सर्वसाधारण समज आहे; परंतु हे खरंच आहे की एका विशिष्ट विचारधारेला चिकटून संकेतस्थळावर विषय मांडला जातो, याचा वेध घेणारा सदर लेख ओपीइंडिया या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातील निवडक सूत्रे वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत. हा लेख प्रहरी या टोपण नावाने एका लेखकाने लिहिला आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात
१. विकीपीडिया आणि अन्य संकेतस्थळांमधील मूलभूत अंतर !
विकीपीडिया हे संकेतस्थळ एखाद्या विश्वकोशासारखे (एनसायक्लोपीडियासारखे) आहे; मात्र भेद एवढाच की, या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीत वेळोवेळी आनुषंगिक पालट केले जातात, तसेच एखाद्या विषयातील तज्ञ व्यक्तींना या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीविषयी काही शंका असतील, तर त्या शंकांचे निरसन आणि आवश्यक असल्यास माहितीत पालटही करण्यात येतात. एकूणच विकीपीडिया या संकेतस्थळावरील माहिती इतर संकेतस्थळांच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह असल्याचे मानण्यात येते. तसेच इतर संकेतस्थळांवरील माहिती थोड्या काळाने काढण्यात येते; परंतु विकीपीडिया या संकेतस्थळावरील माहिती दीर्घकालीन उपलब्ध असते.
२. विकीपीडियावर माहिती प्रसारित करण्याची पद्धत !
विकीपीडिया संकेतस्थळ हे संपूर्णपणे स्वतंत्र आहे, त्याचे कोणतीही विचारसरणी, राजकीय पक्ष, व्यक्ती यांच्याशी काहीही हितसंबंध गुंतलेले नाहीत, असा संकेतस्थळाचा दावा आहे. या संकेतस्थळाच्या मांडणीसाठी त्या-त्या विषयाच्या तज्ञांचे साहाय्य घेतले जाते. हे तज्ञ त्यांच्याशी संबंधित माहितीची सत्यता पडताळून पहातात आणि नंतरच ती प्रकाशित करण्यास हिरवा कंदील दाखवतात.
३. हिंदुत्वाविषयी आकस !
काही हिंदु धर्माभिमान्यांनी या संकेतस्थळावर हिंदु धर्म, परंपरा, प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांसंदर्भात माहिती शोधतांना असे आढळून आले आहे कि, विकीपीडियाला हिंदुत्वाविषयी आकस आहे.
उदाहरणदाखल, हिंदुत्व या विषयावर माहिती देण्यासाठी आणि ती वेळोवेळी पडताळण्यासाठी जो तज्ञ गट कार्यरत आहे, त्यात हिंदुद्वेष्टे आणि साम्यवादी यांचा भरणा आहे, असे धर्माभिमान्यांच्या लक्षात आले आहे. एखादा चित्रपट अथवा संगीत अशा वादग्रस्त नसलेल्या विषयांवर काही लेख दिले, तर ते न तपासता संकेतस्थळाकडून स्वीकारले जातात; मात्र हिंदु धर्म, परंपरा, प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांवरील लेखांची बारकाईने तपासणी केली जाते आणि हे लेख हिंदुविरोधी तज्ञ गटाच्या धोरणांच्या विरोधात असतील, तर ते स्वीकारले जात नाहीत किंबहुना संकेतस्थळ त्यांची दखलही घेत नाहीत. परिणामी या संकेतस्थळावर हिंदुत्व विषयावरील लेखांत अनेक विकृती आढळून आल्या आहेत. यांपैकी काही लेखांचे विषय खालीलप्रमाणे आहेत.
अ. सनातन हिंदु धर्मातील प्रख्यात विचारवंत, संत, तत्त्वज्ञ
आ. सनातन धर्माचे तत्त्वज्ञान
इ. जैन, बौद्ध आणि शीख धर्मावरील अशी पाने की ज्यात हिंदु धर्माशी असलेली मतभिन्नता दिसून येते
ई. दलित पुढार्यांनी हिंदु धर्मावर केलेल्या टीकांचा तपशील
उ. हिंदु धर्मातील धर्मग्रंथ, उत्सव आणि परंपरा
ऊ. काश्मीर आणि जिहादी आतंकवाद
४. हिंदु धर्माशी संबंधित विषय पडताळणारे हिंदुद्वेष्टे असणे !
विशेष म्हणजे, वरील विषयांवर मांडणी करणारे अथवा तपासणारे बहुतेक तज्ञ विदेशी आहेत आणि जे थोडे भारतीय आहेत त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. यात जवाहरलाल नेहरू विद्यापिठासारख्या शैक्षणिक संस्थेत संशोधन केलेल्या अथवा करत असलेल्या साम्यवाद्यांचा समावेश आहे. सिंधू संस्कृतीच्या इतिहासावर संशोधन करणारे पाश्चात्त्य एकतर नास्तिक आहेत अथवा ख्रिस्ती आहेत. ते हिंदुत्वावर आलेल्या लेखांची बारीक तपासणी करतात, संपादित करतात आणि वाचकांच्या सूचनांवर तीक्ष्ण दृष्टी ठेवतात.
विकीपीडिया या संकेतस्थळात अजून एक सुविधा दिली आहे. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही विषयावर (उदा. हिंदुत्वाच्या विषयावर) संकेतस्थळाशी प्रत्यक्ष बोलायचे असेल, तर तो संपर्क करू शकतो. या वेळी विकीपीडियाकडून लागोपाठ दोन जण त्या व्यक्तीला संपर्क करतात आणि त्याची उलटतपासणी करतात. अशा वेळी त्या व्यक्तीची स्थिती दोन लांडग्यांच्या तावडीत सापडल्यासारखी होते आणि तो नंतर अशा भानगडीत पडत नाहीत.
एकूणच विकीपीडिया या संकेतस्थळावरील हिंदुत्व विषयावरील माहिती एकांगी, विकृत आणि पूर्वग्रहदूषित असते. त्याचा विपरित परिणाम नवीन पिढीवर होऊन ती जगातील सर्वोत्तम तत्त्वज्ञानास मुकते किंबहुना हाच उद्देश ठेवून विकीपीडिया या संकेतस्थळावरील माहितीचे संकलन करण्यात आले असावे, अशी शंका घेण्यास फार मोठा वाव आहे.
ही सर्व परिस्थिती पहाता, विकीपीडिया हे कदापि तटस्थ नसून ते पाश्चात्त्य आणि मार्क्सवाद्यांच्या हातचे बाहुले झाले आहे, याचा प्रसार करणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात