Menu Close

प्रखर हिंदुत्वनिष्ठ यूट्यूब चॅनल ‘स्ट्रिंग रिव्हील्स’वर अन्याय्य बंदी !

  • चॅनलने नियमांचे गंभीररित्या उल्लंघन केल्याचा यूट्यूबने ठेवला ठपका !

  • १४ लाखांहून अधिक होते फॉलाअर्स (अनुयायी) !

  • अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी सामाजिक माध्यमे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची खाती मात्र बंद करून त्यांचा आवाज दाबतात. या दुटप्पीपणाच्या विरोधात आता हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवून त्यांच्यावर बहिष्काराचे अस्त्र उगारणे आवश्यक आहे !
  • बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांचाच आवाज दाबला जातो, यापेक्षा लज्जास्पद गोष्ट ती कोणती ? माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने यावर यूट्यूबला जाब विचारणे अपेक्षित आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनीसुद्धा यासंदर्भात अमेरिकी आस्थापन असणार्‍या यूट्यूबच्या विरोधात अमेरिकी सरकारशी चर्चा करावी, असेच भारतियांना वाटते ! -संपादक

मुंबई – हिंदु आणि भारतविरोधी शक्तींच्या षड्यंत्रांचा सोदाहरण भांडाफोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबने तडकाफडकी बंदी लादली आहे. यामागे कारण देतांना यूट्यूबने सांगितले की, या चॅनलने त्यांच्या नियमांचे गंभीररित्या उल्लंघन केले आहे.

स्ट्रिंग रिव्हील्सने ही माहिती ‘एक्स’द्वारे पोस्ट करून दिली आहे. यामध्ये ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ने सांगितले की, यूट्यूबने आतापर्यंत कधीच अशा प्रकारे त्यांना एखाद्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या विरोधात चेतावणी दिली नाही; थेट त्यांच्यावर प्रतिबंध लादण्याची अन्याय्य कारवाई केली. ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ने पुढे म्हटले आहे की, यूट्यूबने कुणाचे मन राखण्यासाठी ही कारवाई केली, हे त्याने स्पष्ट करावे. आम्ही तुमच्या विरोधात पुष्कळ दूरपर्यंत जाऊन लढू शकतो, हे तुम्ही विसरू नका. तसेच अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी केवळ यूट्यूब हे एकच माध्यम नाही, हेसुद्धा ध्यानात असू द्या ! स्ट्रिंग रिव्हील्सवरील या कारवाईच्या विरोधात ‘एक्स’वरून हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ‘आम्ही ‘स्ट्रिंग रिव्हील्स’सोबत असल्याचे आणि त्यांच्यासाठी लढा देण्यासाठी सज्ज आहे’, असे म्हटले आहे.

‘स्ट्रिंग रिव्हील्स’ने हिंदु आणि राष्ट्र हित यांसाठी केलेले कार्य !

‘यूट्यूब’वर १४ लाखांहूनही अधिक फॉलोअर्स असणार्‍या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ने आतापर्यंत साधारण २५० अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवले आहेत. यांपैकी काही व्हिडिओजना कोट्यवधी दर्शकसंख्या लाभली आहे. ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ भारत, तसेच हिंदु धर्म यांच्या विरोधात कार्य करणार्‍यांचा भांडाफोड करण्यासाठी प्रसिद्ध आहे. चॅनलच्या नावानुसार ते कोणत्याही घटनेमागील षड्यंत्राचा ‘धागा उलगडून’ व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर ठेवते. भारतात घडणार्‍या महत्त्वाच्या घटनांमागे भारतविरोधी शक्ती कशा प्रकारे कार्यरत आहेत, यासंदर्भातील संपूर्ण वस्तूनिष्ठ माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाते. यामध्ये २ वर्षांपूर्वी झालेल्या देहलीतील कथित शेतकरी आंदोलन असो अथवा कर्नाटकातील हिजाबविरोधी आंदोलन असो अथवा नुकताच झालेला मणीपूर आणि नूंह (हरियाणा) येथील हिंसाचार असो, या सर्व घटनांमागील आंतरराष्ट्रीय राजकारण, धर्मनिरेपक्षतावादी शक्तींचा सहभाग, हिंदूंवरील आरिष्ट आदी सर्व गोष्टी अत्यंत प्रखर आणि स्पष्टपणे मांडल्या गेल्या आहेत.

एवढेच नव्हे, तर ईश्‍वरी अधिष्ठान घेऊन कार्य करण्याच्या सूत्रावरही या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी दिशादर्शन केले जाते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *