सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !
सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तामिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्यासह महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’चा (द्वेषपूर्ण वक्तव्याचा) गुन्हा नोंदवा, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली आहे. हिंदुत्वनिष्ठांनी दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याविषयी लिखित पोलीस तक्रार केली आहे.
सनातन धर्माची ‘डेंग्यू’, ‘मलेरिया’, ‘कोरोना’, ‘एड्स’ आणि ‘कुष्ठरोग’ आदी रोगांशी तुलना करून सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा द्रमुक पक्षाचे तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, काँग्रेस पक्षाचे कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तामिळनाडूचे द्रमुक पक्षाचे खासदार ए. राजा यांनी केली होती. त्याचप्रमाणे पत्रकार निखिल वागळे यांनीही नुकतीच ‘फेसबुक’द्वारे ‘‘उदयनिधी स्टॅलिनशी मी सहमत आहे. सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखा आहे…’’, अशी द्वेषपूर्ण पोस्ट केली आहे; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ‘सनातन धर्म म्हणजे देशाला लागलेली कीड आहे’, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. कोणत्याही धर्माविषयी अशोभनीय, निंदा करणारे वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावणे, तसेच द्वेष पसरवणे, घृणा निर्माण करणे हा भा.दं. संहिता कलम 153 (अ), 153 (ब), 295 (अ), 298, 505, तसेच ‘माहिती तंत्रज्ञान कायद्यां’तर्गत गुन्हा असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. यावर दादर येथील शिवाजी पार्क पोलिसांनी घटनेची खात्री करून पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले. पोलिसांकडून योग्य ती कारवाई झाली नाही, तर या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी याचिका प्रविष्ठ करण्यात येईल, अशी चेतावणीही तक्रारीत देण्यात आली आहे.
ही तक्रार हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते चंद्रकांत भर्दिके, तसेच हिंदुत्वनिष्ट कार्यकर्ते सर्वश्री प्रभाकर भोसले, प्रसन्न देवरूखकर, हितेंद्र पागधरे, राहूल भुजबळ, अशोक सोनावणे, आशिष पांडेय, दिनेश खानविलकर, सागर चोपदार, अधिवक्ता सुरभी सावंत आदी 27 जणांनी दिली आहे. ‘हेट स्पीच’विषयी सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम्. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना यांनी 28 एप्रिल 2023 या दिवशी ‘समाजात कुणीही द्वेष पसरवणारे वक्तव्य करून समाजात वाद निर्माण करणार्यांच्या विरोधात कुणी तक्रार नोंदवण्याची वाट न पहाता सरकारने स्वत:च गुन्हा नोंदवावा, असे आदेश दिले आहेत. असे करण्यास विलंब झाला, तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानला जाईल, असेही म्हटले आहे.