-
अचलपूर येथे शौर्य जागरण यात्रा उत्साहात !
-
अयोध्येनंतर काशी आणि मथुरा यांवर ‘भगवा झेंडा’ फडकवायचा असल्याचे प्रतिपादन
अचलपूर (जिल्हा अमरावती) – आज देशात काही लोक आणि काही राजकीय पक्ष हिंदु सनातन धर्माला अपकीर्त करत आहेत. हिंदुविरोधी कटकारस्थान रचले जात असून ते हाणून पाडायला हवे. अशा लोकांना वेळीच त्यांची जागा दाखवा, असे आवाहन महंत राजनाथ योगी महाराज यांनी केले. विश्व हिंदु परिषद अचलपूर जिल्हा आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रे’च्या समारोपप्रसंगी नेहरू मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अंजनगाव सुर्जी येथून महंत जितेंद्रनाथ महाराज यांनी झेंडा दाखवत यात्रेला प्रारंभ केला. परतवाडा शहरात यात्रा पोचल्यावर असंख्य हिंदुत्वनिष्ठ महिला, युवक-युवती, दिंडी, लेझीम आणि आदिवासी नृत्य करून यात्रेचे स्वागत करण्यात आले.
शहर भ्रमणानंतर आयोजित सभेस संबोधतांना महंत राजनाथ योगी महाराज म्हणाले, ‘‘देशात हिंदु तरुणींना ‘लव्ह जिहाद’च्या फासात अडकवले जात आहे. आई-वडिलांनी बालपणातच सनातन धर्माचे ज्ञान आणि संस्कार मुला-मुलींना देणे आवश्यक आहे; अन्यथा सर्वस्व जाण्याची शक्यता आहे. सनातनी हिंदूंनी जागृत होण्याची वेळ आली आहे. काही नेते उठसूठ सनातन धर्म आणि संत समुदाय यांवर अभद्र टीका करतात. अशांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. पहिले अयोध्या, नंतर काशी आणि मथुरा यांवर ‘भगवा झेंडा’ फडकवायचा आहे.’’
उपस्थित मान्यवर :
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बंटी केजरीवाल, प्रमुख मार्गदर्शक महंत स्वामी रामनाथ योगी महाराज, संत विजय रामदास महाराज, निर्मल वाजपेयी, रोहित सिंह, संघटन मंत्री शेखर बघेल, विनोदसिंह बैस, विजय वडनेरकर, अभय माथने, नेहा वाजपेयी, आकांक्षा अकोलकर, सदानंद पाटील, अभय बाजपेय, भारद्वाज जिलोनकर, मनोज भुजाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पंडित गजानन महाराज शर्मा यांनी केले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात