Menu Close

हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली अटक करण्यात आलेले गोरक्षक वैभव राऊत यांना जामीन संमत

श्री. वैभव राऊत

मुंबई – हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेले ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे कार्यकर्ते श्री. वैभव राऊत यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने जामीन संमत केला. या वेळी न्यायालयाने ‘श्री. वैभव राऊत यांच्याकडून जेथे बॉम्ब मिळाल्याचा दावा आतंकवादविरोधी पथकाने केला आहे, त्या जागेचे मालक श्री. वैभव राऊत नाहीत’, असे निरीक्षणही नोंदवले. ‘एकूण ४१७ साक्षीदारांपैकी केवळ ४ साक्षीदारांची साक्ष झाली आहे. अशा प्रकारे विलंब होणे अयोग्य आहे’, अशा शब्दांत न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेच्या कारभाराविषयी असंतोष व्यक्त केला. यासह न्यायालयाने जामीन संमत करतांना ‘वैभव राऊत यांनी ‘सनबर्न’चा कार्यक्रम उधळून लावण्याचा कट आखला होता’, असे पोलिसांचे म्हणणे असले, तरी त्याला पुष्टी देणारे कुठलेच पुरावे पोलिसांनी सादर केलेले नाहीत. ‘हे बाँम्ब श्री. वैभव राऊत यांनी स्वत:हून दाखवून दिले’, असेही आतंकवादविरोधी पथकाचे म्हणणे नाही’, असेही स्पष्ट केले.

पोलिसांचे कथन संशयास्पद मानून न्यायालयाने यापूर्वीही तिघा जणांना केला आहे जामीन संमत !

या प्रकरणात यापूर्वीही खटल्याच्या विलंबामुळेच ऑगस्ट २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने श्री. अविनाश पवार यांना जामीन संमत केला होता. मार्च २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने श्री. प्रताप हाजरा आणि लिलाधर लोधी यांनाही जामीन संमत केला. गुन्ह्याच्या वेळी श्री. प्रताप हाजरा हे पुणे येथे असल्याचे, तर श्री. लिलाधर लोधी यांच्या घरी बाँब सापडल्याचे पोलिसांचे कथन संशयास्पद मानून न्यायालयाने या दोघांचा जामीन संमत केला होता.

हिंदुत्वनिष्ठांच्या अटकेचा थोडक्यात घटनाक्रम !

१. ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना अटक केली होती. श्री. वैभव राऊत यांच्या निवासस्थानी कथित स्फोटके सापडल्याचा आरोप आंतकवादविरोधी पथकाकडून करण्यात आला होता. या प्रकरणी खोटे आरोपी दाखवून दिशाभूल केल्याचा आरोप करत मुंबईतील पत्रकारांनी आतंकवाद विरोधी पथकाच्या त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेवर बहिष्कारही घातला होता.

२. कथित शस्त्रसाठ्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने श्री. वैभव राऊत यांच्यासह श्री. सुधन्वा गोंधळेकर आणि श्री. शरद कळसकर यांनाही अटक केली. यानंतर या प्रकरणात चौथा आरोपी म्हणून जालना येथून श्री. श्रीकांत पांगारकर यांना अटक करण्यात आली. हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली यांना अटक करण्यात आली.

३. आतंकवादविरोधी पथकाने नालासोपारा, पुणे आणि सोलापूर येथे धाडी घातल्या होत्या. ‘ज्या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता, तो सनबर्न कार्यक्रम उधळून लावण्याचा त्यांनी कट रचला होता’, असा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम संपल्यानंतर ७ मासांनी आतंकवादविरोधी पथकाने हा आरोप या हिंदुत्वनिष्ठांवर केला.

वैभव राऊत यांना षड्यंत्रपूर्वक अडकवले गेले ! – दीप्तेश पाटील, हिंदु गोवंश रक्षा समिती

दीप्तेश पाटील

श्री. वैभव राऊत हे ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, वसई आदी परिसरांत होणार्‍या गोहत्यांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने लढा देत आहेत. अटकेच्या पूर्वी श्री. वैभव राऊत यांच्या विरोधात गोस्करांकडून खोट्या तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या. आंतकवादविरोधी पथकाकडून वैभव राऊत यांना या प्रकरणात षड्यंत्रपूर्वक अडकवण्यात आले, अशी प्रतिक्रिया हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *