पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची चेतावणी !
धारवाड (कर्नाटक) – सनातन धर्माला विरोध करणे योग्य नाही. एकदा अग्नी चेतला, तर शांत व्हायला वेळ लागेल. मणीपूर राज्य हे याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. सनातनला डिवचले, तर राज्यात मणीपूरसारखी अवस्था होईल, अशी चेतावणी पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांनी येथे दिली. शिवमोग्गातील रागिगुड्ड येथे झालेल्या दंगलीच्या संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.
श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांनी मांडलेली सूत्रे
सरकारने कारवाई करावी !
घरोघरांवर दगडफेक करणे आणि तलवारीने मारणे, या घटना क्षुल्लक आहेत का ? त्या कुणीही क्षुल्लक समजू नये. दंगली मुळापासून रोखल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई केली पाहिजे.
सर्व आपलेच आहेत, अशी भावना हवी !
राजकारणी एका पक्षापुरते सीमित नसावेत. समाजातील सर्वांच्या सुख-शांतीसाठी योग्य ती सूत्रे योजिली पाहिजेत. सर्व समान आहेत. सर्व आपलेच आहेत, अशी भावना असली पाहिजे. सर्वांची सुखवृद्धी करणारे कार्य झाले पाहिजे. आपल्या संतोषाच्या प्रयत्नात इतरांना दुःख होऊ नये. सर्वांनी समाधानाने रहावे.
सर्वांनी सुख, समाधानाने रहाण्यासाठी वापरलेली नीती आणि नियम, म्हणजेच सनातन धर्म !
धर्म म्हणजे समाजाला निरंतर पुढे घेऊन जाणारे जीवनाचे सूत्र आहे. सर्वांनी सुखी आणि समाधानाने रहाण्यासाठी वापरलेली नीती अन् नियम, म्हणजेच सनातन धर्म आहे. सर्वांना सुख प्राप्त व्हावे; म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. पाऊस पडल्यावर तो संपूर्ण गावात पडतो. त्याचप्रमाणे सुख सर्वांना समाधानाने जगू देते. आपण दुसर्याच्या सुखाची कामना केली, तरच आपणही सुखी होऊ.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात