Menu Close

आपण सनातन धर्मासाठी एकत्र यायला सिद्ध आहोत, हे दाखवून देण्याची वेळ – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या अंतर्गत रत्नागिरी येथे व्याख्यान

श्री. रमेश शिंदे

रत्नागिरी (महाराष्ट्र) – ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब असल्याची) शिकवण देणारा एकमेव धर्म तो म्हणजे ‘सनातन धर्म’ होय. हा ‘सनातन धर्म’ नष्ट करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. अशा परिस्थितीत धर्माच्या बाजूने उभे रहाणे, हेच आपले कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपल्याच लोकांशी लढावे लागले होते. ‘सनातन धर्म’ नष्ट करणे, हे वामपंथी लोकांचे षड्यंत्र आता समाजाला, तसेच आपल्या पुढील पिढीला समजायला हवे. याविषयी आज जागृती केली नाही, तर उद्या देशाचे भविष्य ज्यांच्या हातात आहे, ती आपलीच पुढील पिढी ‘जे.एन्.यू.’मध्ये जाऊन ‘भारत तेरे तुकडे होंगे !’ यांसारख्या घोषणा देईल. भविष्यातील हे चित्र पालटण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवे. सनातन धर्मासाठी आपण एकत्र येण्यास सिद्ध आहोत, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

समितीच्या वतीने ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील अंबर सभागृहात आयोजित व्याख्यानात श्री. रमेश शिंदे बोलत होते.  सूत्रसंचालन श्री. महेश लाड यांनी केले. या कार्यक्रमाला २५० धर्मप्रेमी उपस्थित होते.

उपस्थित धर्मप्रेमी

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की

१. शंभर कोटी हिंदूंच्या देशात ‘सनातन धर्म’ नष्ट करणार्‍यांच्या विरोधात आपण किमान कायद्याचा वापर करून विरोध प्रगट करायला हवा. जर सर्वाेच्च न्यायालयाने सांगितले की, हे चूक आहे, तर आपण गुन्हा तरी नोंदवायला हवा. या दृष्टीकोनातून आपण लवकरच एकत्रित येण्याचे नियोजन करत आहोत.

२. निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्म नष्ट करण्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. त्या विरोधात त्यांच्यावर तक्रार प्रविष्ट झाली पाहिजे. ही तक्रार प्रविष्ट करण्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने पोलीसठाण्यासमोर एकत्र यायला हवे, जेणेकरून पोलिसांना वाटले पाहिजे की, आता गुन्हा नोंदवायलाच पाहिजे.

३. हिंदुत्वाचे तुकडे करून ते नष्ट करण्यासाठी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या नावाने एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘हिंदु धर्म कसा संपवायचा ?’ याविषयी सांगितले. सुदैवाने हिंदु समाज जागा होता, त्यामुळे विरोध चालू झाला. तेव्हा या लोकांनी ‘आम्ही हिंदु धर्माविषयी बोलत नसून संघ, भाजप आणि सावरकर यांच्या हिंदुत्वाविषयी बोलत आहोत. आम्ही हिंदु धर्माच्या नाही, तर हिंदुत्वाच्या विरोधात आहोत.’ असे सांगितले. आपण लक्षात घेऊया ‘जेथे माता आहे तेथे मातृत्व’, ‘पिता आहे तेथे पितृत्व’, ‘दाता आहे तेथे दातृत्व आहे’, मग ‘हिंदू आहे तेथे हिंदुत्व’ येणारच. ते वेगळे कसे असणार ?

उपस्थित धर्मप्रेमी

४. आपल्याकडे भक्त प्रल्हादासाठी भगवंताने अवतार घेतला. केवळ एका व्यक्तीसाठीही अवतार घेणार्‍या देवाचा धर्म नष्ट करणारे हे कोण ? काळाची पावले ओळखत आपण सर्वांनी सनातन धर्मरक्षक बनले पाहिजे.

५. साम्यवादी लोकांचा जो चेहरा समोर आला आहे, त्यातून लक्षात येते की, जे समोर दिसतात ते आणि तेवढेच शत्रू नसतात. त्यांच्या पाठीमागे असलेली विखारी विचारसरणी देणारे लोक हे खरे सनातन धर्माच्या विरोधात कार्य करत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *