इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलच्या शत्रूंना ठणकावले !
तेल अविव – हे युद्ध आम्हाला नको होते; पण अत्यंत क्रूर आणि हिंसक मार्गांनी हे युद्ध आमच्यावर लादण्यात आले आहे. युद्ध आम्ही चालू केले नसले, तरी या युद्धाचा अंत आम्हीच करू. एकेकाळी ज्यू लोक राज्यहीन होते. काही काळासाठी ज्यू लोक निराधार होते; पण यापुढे असे चालणार नाही, असे वक्तव्य बाणेदार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘एक्स’वर (पूर्वीच्या ट्विटरवरून) केले.
नेतान्याहू पुढे म्हणाले, ‘‘हमासने आमच्यावर आक्रमण करून ऐतिहासिक चूक केली आहे, हे त्याला आता समजेल. हमाससह इस्रायलच्या अन्य शत्रूंच्या पुढील अनेक पिढ्या अनेक दशके लक्षात ठेवतील, अशी किंमत आम्ही निश्चित वसूल करू. इस्रायल केवळ स्वत:च्या लोकांसाठीच नाही, तर बर्बरतेच्या विरोधात उभ्या असलेल्या प्रत्येक देशासाठी लढत आहे.’’
नेतान्याहू पुढे म्हणाले की, हमासने निर्दोष इस्रायलींवर केलेली क्रूर आक्रमणे मनाला चटका लावणारी आहेत. कुटुंबांची त्यांच्या घरात घुसून हत्या करणे, भर कार्यक्रमात शेकडो तरुणांची हत्या करणे, स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांचे अपहरण करणे, अगदी ‘होलोकॉस्ट’मधून (हिटलरने ज्यू लोकांना मारण्यासाठी राबवलेल्या मोहीमेतून) वाचलेल्यांचे अपहरण करणे, या गोष्टी मनाला चटका लावणार्या आहेत. हमासच्या आतंकवाद्यांनी लहान मुलांना बांधले, जाळले आणि मारले. ते रानटी आहेत. हमास म्हणजेच इस्लामिक स्टेट आहे, अशा शब्दांत बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
जेव्हा इस्रायल हे युद्ध जिंकेल, तेव्हा संपूर्ण जग जिंकेल ! – नेतान्याहू
नेतान्याहू पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे इस्लामिक स्टेटला पराभूत करण्यासाठी जगातील शक्तींनी एकजूट केली, त्याचप्रमाणे जगातील विविध देशांनी हमासचा पराभव करण्यासाठी इस्रायलला साथ दिली पाहिजे. इस्रायलला दिलेल्या समर्थनासाठी मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाडेन यांच्यासह जगभरातील नेत्यांचे आभार मानतो. इस्रायल केवळ स्वतःच्या लोकांसाठी हमासशी लढत नाही, तर हिंसक वृत्तीच्या विरोधात उभ्या असलेल्या प्रत्येक देशासाठी इस्रायल लढत आहे. हे युद्ध इस्रायल जिंकेल आणि जेव्हा इस्रायल जिंकेल, तेव्हा संपूर्ण जग जिंकेल.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात