अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशनचे आयोजन
उज्जैन : येथील सिंहस्थपर्वात अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशन यांच्या वतीने भरवलेल्या शिबिरात गायत्री यज्ञासह कथाव्यास श्रद्धेयप्रवर पू. त्र्यंबकेश्वरचैतन्यजी महाराज यांच्या भागवतकथेचा भक्तांनी लाभ घेतला. दिशा दूरचित्रवाहिनीवर झालेल्या थेट प्रसारणातून ठिकठिकाणच्या भक्तांनी या कथेचे श्रवण केले. सायंकाळच्या सत्रात १६ संस्कार आणि गोरक्षा यांविषयी संत आणि मान्यवर यांनी उपस्थितांचे उद्बोधन केले. विशेष म्हणजे १६ संस्कारावरील लोकांच्या प्रश्नांचे समाधानही श्रद्धेयप्रवर पू. डॉ. गुणप्रकाश महाराज यांनी केले.
या शिबिराच्या २१ मे या दिवशी झालेल्या सांगता समारंभात संपूर्ण शिबिराच्या आयोजनात सहभाग घेणार्यांचा फेटा आणि रूद्राक्ष माळा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर श्रद्धेयप्रवर पू. त्र्यंबकेश्वरचैतन्यजी महाराज आणि बीकानेर (राजस्थान) येथील पू. श्रीधर महाराज उपस्थित होते. या वेळी भागवतकथेचे यजमानपद भूषवणारे नवी देहली येथील उद्योगपती श्री. अनिल भारद्वाज यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आज मी जे काही आहे, ते माझ्या गुरूंमुळे आहे आणि माझे पुढील आयुष्यही गुरूंसाठी आहे.
क्षणचित्रे
१. श्रद्धेयप्रवर पू. त्र्यंबकेश्वरचैतन्य महाराज यांनी संकलित केलेल्या शिवपुराणपीयूष या ग्रंथाचे या वेळी व्यासपिठावरून विमोचन करण्यात आले.
२. या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने देवालय दर्शन, आचारधर्म, गोरक्षा आणि हिन्दु राष्ट्र या विषयावरील फ्लेक्स फलकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
३. या वेळी सनातन संस्थेच्या कु. पूनम चौधरी आणि श्री. आनंद जाखोटिया यांचा सत्कार करतांना पू. डॉ. गुणप्रकाश महाराज म्हणाले, गोवा येथील सनातन आश्रमात वास्तव्य करणारे परात्पर गुरू डॉ. जयंत आठवले यांच्या आज्ञेने पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनचे साधक येथे सेवा करत आहेत. अत्यंत अल्प वेळेत त्यांनी दिवसरात्र सेवा करून सर्वांचे मन जिंकले. त्याविषयी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात