भारतात राहूनही हिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येत नाही, हा त्यांचा कर्मदरिद्रीपणाच होय !
स्पेनच्या मारियाने वर्ष २०१३ चा प्रयाग कुंभ पाहून, तर स्पेनच्याच फातिमा नावाच्या स्थापत्यविशारद महिलेने नुकताच पार पडलेला उज्जैन सिंहस्थपर्व पाहून हिंदु धर्माची दीक्षा घेतली !
प्रयाग (अलाहाबाद)/उज्जैन : युरोपीय देश स्पेन येथील मारिया नावाची एक २६ वर्षीय युवती वर्ष २०१३ मध्ये झालेला प्रयाग कुंभमेळा पहायला आली होती. त्या वेळी तिने कुंभमेळ्यात सहभागी साधूसंतांची तपश्चर्या पाहिली. यावर ती एवढी प्रभावित झाली की तिने सर्वस्व त्यागून सनातन हिंदु धर्म स्वीकारला. संन्यास घेतल्यानंतर तिचे नामकरण पार्वती मारिया गिरी करण्यात आले असून जुना आखाड्याचे महंत रमेश गिरी हे तिचे गुरु आहेत.
महंत रमेश गिरी या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना म्हणाले, वर्ष २०१३ मध्ये मारियाने हिंदु धर्म स्वीकारला. आता उज्जैन येथील सिंहस्थपर्वात ती पूर्णत: संन्याशीण झाली आहे. संन्यास घेतल्यानंतर पार्वती मारिया गिरी यांनी हिंदु धर्मशास्त्र, वेद आणि अन्य ग्रंथ वाचण्यासाठी हिंदी आणि संस्कृत भाषा शिकून घेतल्या.
दुसरीकडे स्पेनचीच स्थापत्यविशारद (आर्किटेक्ट) फातिमा ही काही मासांपूर्वी मध्यप्रदेशात कामानिमित्त आली होती. त्या वेळी तिला उज्जैन सिंहस्थपर्वासाठी बांबूझोपडी बनवण्याचे काम मिळाले. फातिमाला विना सीमेंटचे बांधकाम करण्याचे कौशल्य प्राप्त असून ती बांबू आणि मातीने इमारती बांधते. उज्जैन येथे काम मिळाल्यावर स्थानिक अधिकार्यांसोबत कामाची चर्चा करता-करता तिला उज्जैन सिंहस्थपर्वाचे महत्त्व कळाले. कोणत्याही निमंत्रणाविना कोट्यवधी हिंदू या पर्वाला उपस्थित रहातात, हे सूत्र तिला खूप भावले. तिच्यात असलेल्या तीव्र जिज्ञासेने आणि या सगळ्यातून प्रभावित होऊन तिने हिंदु धर्माची दीक्षा घेतली. तिला दत्त आखाड्याचे पुजारी आनंद पुरी गुरु म्हणून लाभले आहेत. तिचे नामकरण मां क्षिप्रा पुरी करण्यात आले आहे. त्या आता नामजप, ध्यानधारणादि साधना करतात, तसेच आरतीच्या वेळी टाळही वाजवतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात