मनातील प्रश्नांची उत्तरे भारतात सापडल्याने १४ वर्षांपासून भारतात वास्तव्य !
कोईंबतूर (तामिळनाडू) – लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. येथील ख्रिस्तींची लोकसंख्या ३२ टक्के आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात पुजारी बनली आहे.
कोइम्बतूर येथे या महिलेला ‘भैरागिनी माँ हनीन’ असे संबोधले जाते. भारतात येण्यापूर्वी ती आरामदायी जीवन जगत होती. भारतात येण्यापूर्वी ती एका जाहिरात आस्थापनात ‘क्रिएटिव्ह आर्ट डायरेक्टर’ म्हणून काम करत होती. वर्ष २००९ मध्ये ती स्वयंसेवक म्हणून भारतात आली आणि गेल्या १४ वर्षांपासून येथे रहात आहे. अध्यात्म आणि सनातन यांच्याशी जोडण्यासाठी तिने उच्च पगाराची नोकरी सोडली आहे.
मनातील प्रश्नांची उत्तरे भारतात सापडली !
माँ हनीन म्हणाली, ‘‘माझ्याकडे सर्व काही होते; परंतु मी एका गोष्टीसाठी तळमळत होते, जी मला माहीत नव्हती. या कालावधीत दुर्दैवाने माझ्या सर्वांत जवळच्या मित्राच्या मृत्यूने मला फार वाईट वाटले आणि तेव्हाच माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. मी उत्तरे शोधू लागले. त्याचे उत्तर मला भारतात मिळाले. मी माझ्या कुटुंबामुळे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे येथे आहे. माझ्यात झालेला पालट पाहून त्यांना कुतूहल वाटू लागले. ‘जी मुलगी (मी) प्रत्येक गोष्टीवर रागवायची आणि चिडचिड करायची, ती आता फार शांत आणि धीरगंभीर झाली आहे’, असे माझ्या कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांना माझ्यात कमालीचा पालट दिसला आणि त्यामुळे ते मला पाठिंबा देतात.’’
स्रोत: दैनिक सनातन प्रभात