मडगाव (गोवा) – गोव्यातील व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन देऊन इस्रायलऐवजी इजिप्तमध्ये नेण्यात आले आणि त्या ठिकाणी ‘मुसलमान धर्म स्वीकारल्यास दुसर्या देशात ये-जा करणे सोपे होईल’, असे सांगून २ संशयितांनी पीडित व्यक्तीवर दबाव टाकला. ही माहिती मुख्य संशयित जेराल्ड डिसोझा याचा अटकपूर्व जामीन फेटाळतांना न्यायालयाकडून देण्यात आलेल्या कारणांमधून स्पष्ट झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, एका व्यक्तीला नोकरीसाठी इस्रायलला नेण्याचे आश्वासन देत इजिप्तला नेण्यात आले आणि त्या ठिकाणी त्याची रहाण्याची कोणतीही सोय केली नाही. मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात आला. फसवणूक झाल्यावर पीडित व्यक्तीने मासाभरात पैशांची जुळवाजुळव करून गोवा गाठला. यानंतर आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली. तक्रारीनंतर मुख्य संशयित जेराल्ड डिसोझा याच्यासह आंतानिओ, मेलविन, सय्यद आणि फरहाज या ५ संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. या ५ संशयितांपैकी तिघे अजूनही विदेशात आहेत. मडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण करत मुख्य संशयित जेराल्ड डिसोझा याचा शोध घेतला आणि त्याला पोलीस ठाण्यात उपस्थित रहाण्याची नोटीस पाठवली. यानंतर संशयित जेराल्ड डिसोझा याने दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने संशयित जेराल्ड डिसोझा याचा जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्ज फेटाळतांना न्यायालयाने या प्रकरणी केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर २ संशयितांकडून धर्मांतराचा प्रयत्नही झाल्याचा म्हटले आहे, तसेच संशयित अनेकांना पैसे देणे शिल्लक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. संशयितांनी अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. संशयितांनी शैलेश नाईक याच्याकडून ५ लाख ५० सहस्र रुपये, जॉन एडविन फुर्तादो याच्याकडून ७ लाख ६० सहस्र रुपये आणि आंतानिओ कार्दाेज याच्याकडून ४ लाख ७० सहस्र रुपये घेतले; मात्र त्यांना पुष्कळ अल्प रक्कम परत करण्यात आली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात