शिवराजेश्वर मंदिराला मिळणार्या निधीत वाढ करण्यासह जिल्ह्यातील अमली पदार्थ व्यवसायाच्या विरोधात कृती करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याचे आश्वासन
कुडाळ (महाराष्ट्र) – येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील आणि श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या वेळी समितीच्या वतीने धर्मांतर, अमली पदार्थ व्यवसाय, ‘हेटस्पीच’ करणार्यांवर कारवाई करावी, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरासाठी निधी वाढवून मिळावा, प्रदूषणकारी फटाक्यांवर बंदी घालावी यांसह अन्य विषयांची निवेदने देण्यात आली. या वेळ मंत्री चव्हाण यांनी सर्व विषय लक्षपूर्वक समजून घेतले आणि ‘संबंधितांना सांगून योग्य ती कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले.
१. पालकमंत्री चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांत जाणीवपूर्वक नास्तिकतावादाचा प्रसार करणार्या अंनिसच्या उपक्रमांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाला निर्देश द्यावेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील धर्मांतर रोखण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत, जिल्ह्यात ख्रिस्ती मिशनर्यांकडून चालू असलेल्या धर्मांतरावर पायबंद घालावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कॉन्व्हेंट शाळांतून भारतीय सण, उत्सव साजरे करण्यास शिक्षण विभागाला निर्देश द्यावेत’, ‘सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला मिळणार्या निधीत वाढ करावी, या विषयांवरील निवेदनेही देण्यात आली. ‘यातील काही विषयांचा अभ्यास करून नंतर कार्यवाहीविषयी निर्णय घेऊ’, असे मंत्री चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
२. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अमली पदार्थांचे जाळे निर्माण करणार्यांवर कारवाई करण्याविषयी मंत्री चव्हाण यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना ‘जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री होणार्या ठिकाणांची माहिती काढा, तसेच पोलिसांनाही सांगा. यावर कारवाई त्वरित कारवाई करण्यास सांगतो’, असे सांगितले.
३. ‘हेटस्पीच’ करणार्यांवर कारवाई करण्याविषयी मंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करा. प्रसंगी न्यायालयात खासगी तक्रार नोंद करू. आवश्यकता वाटल्यास कायदेशीर साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.’’ माजी आमदार राजन तेली याविषयी म्हणाले, ‘‘जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून यावर कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करूया.’’
४. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला मिळणार्या निधीत वाढ करण्याविषयी पालकमंत्री म्हणाले, ‘‘तेथे असलेल्या सेवेकर्यांना नेमक्या काय अडचणी आहेत, त्या जाणून घ्याव्या लागतील. त्या अनुषंगाने चर्चा झाल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या (डी.पी.डी.सी.च्या) निधीतून या मंदिरासाठी कायमस्वरूपी वाढीव निधी उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.’’