Menu Close

पंडित धीरेंद्र शास्त्रींना विरोध करणार्‍या अंनिसवाल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा !

छत्रपती संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद !

डावीकडून श्री. सुभाष मोकरिया, कु. प्रियांका लोणे, श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. कमलेश कटारिया

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) – छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे, तसेच त्यांच्यावर अनेक बिनबुडाचे खोटे आरोपही केले आहेत. हिंदु संतांना नाहक त्रास देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या अंनिसवाल्यांचा हिंदु जनजागृती समिती जाहीर निषेध करते. बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात अंनिसवाल्यांनी गोंधळ घातल्यास वा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास हिंदु समाज हे कदापि सहन करणार नाही. त्यामुळे हिंदु संतांच्या कार्यक्रमात अडथळे आणणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला विरोध करणारे हिंदु विरोधक यांवर या कार्यक्रमाच्या काळात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली.

या वेळी श्री. जुवेकर म्हणाले की, यापूर्वीही पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या नागपूर येथील कार्यक्रमाला अशाच प्रकारे तीव्र विरोध केला होता; मात्र पोलीस चौकशीत पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून कोणताही अपराध घडला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांना आता विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. पंडित धीरेंद्र शास्त्री हे ख्रिस्त्यांच्या ‘चंगाई सभां’प्रमाणे कोणतेही चमत्कार दाखवत नाहीत. ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या ‘आंधळ्याला दिसू लागेल, लंगडा चालू लागेल’, असे खोटे दावे करून ते कुणालाही लुबाडत नाहीत. तरीही अंनिसवाले ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या चंगाई सभांना विरोध करत नाहीत, तसेच भररस्त्यात स्वतःच्या अंगावर शस्त्रांनी फटके मारत रक्तबंबाळ होत ‘मातम’ करणार्‍यांना कधी आव्हान देत नाहीत. यातून ते केवळ हिंदु संतांनाच लक्ष्य करतात, हेच सिद्ध होते.

या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीच्या मराठवाडा संघटक कु. प्रियांका लोणे, संकल्प हिंदु राष्ट्र अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री. कमलेश कटारिया आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे देवगिरी प्रांताचे अध्यक्ष श्री. सुभाष मोकरिया हेही उपस्थित होते.

कु. प्रियांका या वेळी म्हणाल्या की, सध्या राज्यातील सामाजिक शांतता धोक्यात कशी येईल ? यासाठी अंनिसवाल्यांचे हे षड्यंत्र तर नाही ना, अशी शंका येते. वर्तमानात महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यातील कोणत्याही कलमानुसार गुन्हा नोंद होईल, अशी कोणतीही कृती या कार्यक्रमात होत नाही. आम्ही या कायद्याला विरोध केला होता, तेव्हा आम्ही व्यक्त केलेली भीती आज खरी ठरत आहे. जादूटोणा कायद्याद्वारे हिंदु संतांना नाहक अडकवणे, हिंदूंच्या धर्माचरणावर गदा आणणे, हेच अंनिसवाल्यांना करायचे होते. आम्ही या गोष्टींना विरोध केल्याने या कायद्यातील २७ पैकी १५ कलमे वगळली होती. आजही या कायद्याचे भय दाखवले जात आहे. त्यामुळे ‘हिंदूंवर अन्याय करणारा हा कायदाच रहित करावा’, अशीही मागणी आम्ही करत आहोत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *