पुणे येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’च्या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचे सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते प्रकाशन !
केडगाव (जिल्हा पुणे) – स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदु राष्ट्र विषयक विचारांचा प्रसार गेली २३ वर्षे करत आहे आणि ‘स्वयंभू’ दिवाळी अंक हे या विचारांच्या प्रसाराचे माध्यम म्हणून गेली २० वर्षे प्रकाशित करत आहे. या २० व्या अंकाचे प्रकाशन सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये यांचे शुभहस्ते होत आहे, हे या मंचाचे भाग्य होय. या अंकामध्ये हिंदु राष्ट्र निर्मितीस उपयुक्त असणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार छापलेले आहेत. ते आजही उपयुक्त आहेत, तसेच सनातन संस्थेचे आध्यात्मिक दृष्टीकोन देणार्या, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्यास प्रेरणा देणार्या लेखांचाही समावेश आहे. वाचकांनी याचा लाभ घेऊन हिंदु राष्ट्र निर्मितीतील आपला वाटा उचलावा, असे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी केले. ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’च्या वतीने ८ नोव्हेंबर या दिवशी त्यांच्या २० व्या स्वयंभू दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. त्यांनी अंकाची वैशिष्ट्येही सांगितली.
या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सद़्गुरु कु. स्वाती खाडये, पू. (सौ.) मनीषा पाठक, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर आणि भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. वासुदेव (नाना) काळे हे उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते स्वयंभू दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला १२५ हून अधिक जणांची उपस्थिती होती. प्रारंभी सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.
हिंदूंंमधील धर्माभिमान जागृत करणे आवश्यक ! – वासुदेव (नाना) काळे, पुणे जिल्हा अध्यक्ष, भाजप
हिंदु धर्म संकटात आहे. त्यासाठी हिंदूंमधील धर्माभिमान जागृत करणे आवश्यक आहे. वर्ष २०१४ पूर्वीच्या शासनकाळात हिंदूंची स्थिती दयनीय होती; परंतु २०१४ नंतर पालटलेल्या शासनाने राबवलेल्या विविध चांगल्या योजनांमुळे भारतीय नागरिक सजग होत आहेत, तसेच हिंदुत्वाच्या कार्यासाठी पूरक वातावरण निर्माण होत आहे.
भारताला हिंदु राष्ट्र बनवणे हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना खरी आदरांजली ! – कु. क्रांती पेटकर
आज स्वा. सावरकर आपल्यात असते, तर त्यांनी ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा’, असे म्हटले असते; परंतु दुर्दैवाने आज त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्याविषयी जाणीवपूर्वक खोटे भ्रम पसरवले जात आहेत. सावरकरांनी वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या कुलदेवीसमोर शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ घेतली आणि त्यासाठी बळ देण्याची प्रार्थनाही केली. त्यामुळे भारताला हिंदु राष्ट्र बनवणे ही स्वा. सावरकरांना खरी आदरांजली असणार आहे. त्यासाठी सर्वांनी प्रतिदिन किमान १ घंटा तरी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी देण्याचा दृढसंकल्प करूया, तसेच यंदाची दिवाळी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करूया.
स्वतःतील धर्माभिमान जागृत करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श घेणे आवश्यक ! – सद़्गुरु स्वाती खाडये
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि आपल्यातील धर्माभिमान जागृत करण्यासाठी आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. ते म्हणायचे ‘अहिंदु म्हणून मला प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले, तरी ते लाथाडून मी शेवटचा हिंदु म्हणून मरेन.’ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘स्वतःला हिंदु म्हणवण्यात कमीपणा समजू नका’, असे हिंदूंना नेहमीच सांगितले होते. आज हिंदूंना मातृभाषेचा अभिमान उरलेला नाही. बहुतांश हिंदु पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात; पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमीच हिंदूंना मातृभाषेत बोलण्याची आणि मातृभाषेचा अभिमान बाळगण्याची शिकवण दिली आहे.