ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील ऐतिहासिक शरद व्याख्यानमालेत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे व्याख्यान
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – सनातन धर्माची शिकवण आणि अध्यात्म एकच आहे. सनातन धर्मात केवळ मानवाच्याच नव्हे, तर चराचर सृष्टीच्या प्रत्येक कणाकणाच्या उद्धाराचा विचार करण्यात आला आहे. सनातन धर्माच्या प्रत्येक सिद्धांतामध्ये विज्ञान आहे. आज आपण पुनर्जन्म सिद्धांत, कर्मसिद्धांत इत्यादी संकल्पना समजून घेणे आणि आपल्या भावी पिढ्यांना सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे वैयक्तिक जीवनासमवेत समाजजीवन आणि राष्ट्रजीवनही आनंदमय होईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील शरद व्याख्यानमालेत केले. या कार्यक्रमाला अनेक मराठी भाषिक आणि व्याख्यानमालेचे सर्व सन्माननीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. वर्ष १९३२ मध्ये येथे चालू झालेल्या शरद व्याख्यानमालेचे हे ९२ वे वर्ष होते. या वर्षीच्या व्याख्यानमालेच्या समारोपाचे शेवटचे पुष्प सद़्गुरु डॉ. पिंगळे यांनी अर्पण केले. दीपप्रज्वलन आणि सरस्वतीदेवीला पुष्पहार अर्पण करून व्याख्यानाला प्रारंभ झाला.
सद़्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘आज ‘अध्यात्म म्हणजे निवृत्तीनंतर करायची गोष्ट आहे’, असा अपसमज पसरला आहे. याउलट अध्यात्म आणि धर्माचरण करणे या गोष्टी आपण लहानपणापासूनच मुलांना घरीच शिकवल्या पाहिजेत. सध्या हिंदू बहुसंख्य असूनही हिंदु धर्म आणि संस्कृती न्यून होत चालली आहे; कारण गेल्या ७६ वर्षांत हिंदूंना धर्मशिक्षण मिळालेले नाही. आज बहुसंख्य हिंदू केवळ जन्माने हिंदु आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कर्माने हिंदु होणे आवश्यक आहे.’’
शरद व्याख्यानमालेच्या उपाध्यक्षा सुश्री कुंदा जोगळेकर यांनी आभार व्यक्त केले, तर सूत्रसंचालन श्री. मेघदूत परचुरे यांनी केले. शरद व्याख्यानमालाच्या वतीने लहान मुलांसाठी श्लोक पठण स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेतील विजेत्या मुलांचा गौरव सद़्गुरु डॉ. पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
0 Comments