देहली येथे २ दिवसांचे हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !
नवी देहली – अर्जुन संभ्रमात असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या धार्मिक कर्तव्याची जाणीव करून दिली. आज हिंदूंची अवस्थाही अर्जुनसारखी झाली आहे. जर आज हिंदूंना आत्मभान नसेल, तर त्यांच्यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्या माध्यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, यासाठीच हे हिंदु राष्ट्र अधिवेशन आहे. आता प्रभु श्रीराम आणि रामराज्य स्थापनेचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करावे लागेल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देशाची राजधानी देहली येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या २ दिवसांच्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ते बोलत होते. १८ आणि १९ नोव्हेंबर या दिवशी आयोजित या अधिवेशनात जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा, देहली, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांतील ३३ संघटनांचे १३२ पदाधिकारी उपस्थित होते. यात विचारवंत आणि अधिवक्ते सहभागी झाले होते. धर्मावर आधारित रामराज्य व्यवस्थेच्या बाजूने सर्व धर्मियांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात हातभार लावण्याची प्रतिज्ञा या वेळी करण्यात आली. याखेरीज इंग्रजी ‘सनातन अँड्रॉइड पंचाग २०२४’चे संतांच्या आशीर्वादाने प्रकाशन करण्यात आले.
‘इंडिया’ला गाडा आणि ‘भारता’ला प्रत्येक घरापर्यंत पोचवा ! – आर्.एस्.एन्. सिंह, संरक्षणतज्ञ
जे अवैज्ञानिक आहे, ते शाश्वत असू शकत नाही. हिंदूंनी सनातन, संस्कृती, संस्कृत आणि संगीत यांचा त्याग केला, तर ते निर्जीव होतील. मग गझनी, ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि आपल्यात काय भेद रहाणार ? इतिहास पाहिला, तर खर्या देशभक्ताला अज्ञातवास आणि अपकीर्ती मिळाली.
आज ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यात वाद चालू आहे. ‘इंडिया’ हमाससमवेत आहे आणि ‘भारत’ इस्रायलसमवेत आहे. त्यामुळे ‘इंडिया’ला गाडून टाका आणि ‘भारता’ला प्रत्येक घरापर्यंत पोचवा.
जो आश्रय देतो, तो निर्वासित होतो ! – विनोद बन्सल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद
श्रावण मासात नूंह (हरियाणा) येथे झालेल्या दंगलीविषयी विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. विनोद बन्सल म्हणाले की, नूंह दंगल ही हिंदूंसाठी चेतावणी आहे. आताही हिंदू जागृत आणि संघटित झाले नाहीत, तर येणार्या काळात त्यांनी मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवावी.
नूंह हे श्रीकृष्णाचे क्रीडांगण आहे, ती ब्रजभूमी आहे. ज्या हिंदूंनी तिथल्या लोकांना आश्रय दिला, त्यांनीच आज हिंदूंना निर्वासित बनवले. इतकेच नाही, तर हिंदूंची संस्कृतीही नष्ट केली. जिथे जिथे हिंदू झोपले, तिथे त्यांनी (मुसलमानांनी) वर्चस्व गाजवले. आपण आपल्या घरी सत्संग करत नाही. घरोघरी हनुमान चालिसाचे पठण करावे, तसेच शरीर शुद्ध होण्यासाठी मनही शुद्ध करावे.
अधर्मियांकडून चौथ्या पिढीचे युद्ध चालू ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
जोसेफ स्टॅलिन याने रशियामध्ये अनुमाने २ कोटी लोकांना मारले. आता भारतात उदयनिधी स्टॅलिन ‘हिंदु धर्म नष्ट करू’ असे म्हणत आहेत. जोसेफ स्टॅलिन म्हणाला होता, ‘एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, ही शोकांतिका आहे; पण लाखो लोकांचा मृत्यू, हा आकडा आहे.’ ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरून उच्चाटन) यांसारखे कार्यक्रम आयोजित करून हिंदूंना नष्ट करण्याची चर्चा केली जात आहे.
‘शहरी नक्षलवादा’चा प्रभाव भारतात झपाट्याने वाढत आहे. सनातन धर्म नष्ट करण्याचा ते सतत प्रयत्न करत आहेत. आज ‘फोर्थ जनरेशन वॉरफेअर’ (चौथ्या पिढीचे युद्ध) चालू झाले आहे. यामध्ये बाहेरून आक्रमण करण्याची आवश्यकता नाही, तर आतून संस्कृती नष्ट होत आहे.
अभ्यास आणि धर्माच्या आचरणातून हिंदू सशक्त बनतील ! – सुरेश चव्हाणके
‘सुदर्शन’ वाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी अधिवेशनात सांगितले की, आम्ही धर्म शिकवला नाही, त्यामुळेच आज हिंदूंचे धर्मांतर करू पहाणारे मानसशास्त्राचा आधार घेऊन हिंदूंना गोंधळात टाकत आहेत.
त्यामुळे धर्म समजून घेऊन त्यानुसार त्याचे प्रतिदिन आचरण करणे आवश्यक आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विविध संघटना एकत्र येऊन चर्चा करत आहेत, यातून धर्म बळकट होईल.
‘द्रौपदी ड्रीम ट्रस्ट’च्या अध्यक्षा सुश्री नीरा मिश्रा यांनी देहली हेच खरे इंद्रप्रस्थ असल्याचे पुराव्यासह सांगितले. या अधिवेशनात ‘इस्रायल-हमास युद्धाची भारताला चेतावणी’ या विषयावर चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते.