शिक्षण विभागाकडून चौकशी चालू !
शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील कम्माची गावातील सरकारी शाळेत एका ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनाच्या वेळी अंडे खाण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि साहाय्यक शिक्षक यांच्या विरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. यासह शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा, शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, उप संचालक आणि स्थानिक आमदार यांनाही याविषयी माहिती दिली. प्राथमिक चौकशीनंतर प्रशासनाने माध्यान्ह भोजनात अंडे देण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला; मात्र ते खाण्यासाठी बाध्य केल्याचा आरोप नाकारला.
या सरकारी शाळेच्या इयत्ता दुसरीत २६ मुले शिकतात. यात १० शाकाहारी मुले आहेत. मुलीचे वडील व्ही. श्रीकांत हेही याच शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर शिक्षणाधिकारी आणि माध्यान्ह भोजन परिचारिका यांनी शाळेचा दौराही केला.
स्रोत : सनातन प्रभात