मोशी (पुणे) येथील पशूप्रदर्शनाचे उद्घाटन !
पिंपरी (जिल्हा पुणे) – भारत महाशक्ती झाला पाहिजे, असे म्हटले जाते. त्यासाठी गोशक्ती सक्षम झाली पाहिजे. गोमूत्राला जुनागड विद्यापिठाने ‘लिक्विड गोल्ड’ नाव दिले. गायीचे शेणही मौल्यवान आहे. ‘गायीचे रक्षण केलीयाचे पुण्य बहुत आहे…’ , असे छत्रपती शिवरायांचे वचन आहे; मात्र तरीही महाराष्ट्रात गोहत्या होणे चिंताजनक आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे आणि सहकारी यांनी ‘गोहत्यामुक्त महाराष्ट्र’निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघा’चे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या मैदानावर देशी गोवंश आणि अश्व पशूप्रदर्शन अन् आरोग्य शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मिलिंद एकबोटे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे जिल्हाप्रमुख संजय जठार, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
एकबोटे म्हणाले, ‘‘आमदार लांडगे यांनी गोसंवर्धन आणि प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली. हिंदुत्वासाठी त्यांची आक्रमक भूमिका हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते, नागरिक यांना प्रेरणादायी आहे. त्यामुळे यंदाचा ‘हिंदुत्व शौर्य’ पुरस्कार त्यांना घोषित करतो. डिसेंबर २०२३ मध्ये पुणे येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना, संत-महात्मे यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमामध्ये त्यांना हा पुरस्कार आणि सोन्याचे कडे देऊन गौरवण्यात येईल.’’
या वेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी पशूसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले, पुणे पशूसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. संतोष पंचभोर, विलास मडिगेरी आदी उपस्थित होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात