Menu Close

हिंदु पुनरुत्थानाच्या ध्येयाने प्रेरित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

गेल्या ७०-७५ वर्षांत भारतियांना त्यांच्यावर झालेला ऐतिहासिक अन्याय विसरायला शिकवले ! – आनंद रंगनाथन्, सल्लागार संपादक, स्वराज्य

बँकॉक (थायलंड) – भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडण होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार संपादक श्री. आनंद रंगनाथन् यांनी काढले. ७०-७५ वर्षांहून अधिक काळ भारतियांना त्यांच्यावर झालेला ऐतिहासिक अन्याय विसरायला शिकवले जात आहे. बाबरपूर ते भक्तीयारपूर, अलाहाबाद ते औरंगाबाद आणि सोमनाथ ते काशी विश्‍वनाथ अशी काही उदाहरणे आहेत. ही स्मारके सध्याच्या जनतेला त्यांच्यावर लादलेल्या अपमानाची केवळ एक आठवण म्हणून जपून ठेवली आहेत. ज्ञानवापी हे ऐतिहासिक अन्यायाचे स्पष्ट उदाहरण आहे; कारण मशिदीच्या घुमटाच्या मध्यभागी अर्धा तोडलेला काशी विश्‍वनाथ स्पष्टपणे दिसतो.

‘हिंदु आर्थिक दरवाढ’ म्हणून हिणवणार्‍यांना भारताने टाकले मागे! – आशिष चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, भारत

आशिष चौहान

१९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या प्रारंभीच्या काळात भारताचा आर्थिक दरवाढ हा केवळ २ टक्के एवढा होता. या आर्थिक दरवाढीची टर उडवतांना काही देश याला ‘हिंदु आर्थिक दरवाढ’ असे संबोधून अपमानास्पदरित्या हिणवत होते. हिंदूंमध्ये फूट पडून आपापसांत भांडत राहिल्याने भारताचा विकास खुंटला होता. गेल्या ३० वर्षांत उदारीकरणानंतर हिंदु आर्थिक दरवाढ ७.५० टक्क्यांवर पोचली असून भारत २०२७ पर्यंत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे, असे  आशिष चौहान म्हणाले.

सौजन्य वर्ल्ड हिंदु काँग्रेस

तंत्रज्ञान ‘भारताचा तारणहार’ म्हणून सिद्ध झाले ! – मोहनदास पै, उद्योगपती

मोहनदास पै

प्रसिद्ध उद्योगपती, समाजसेवक आणि ‘मणीपाल ग्लोबल एज्युकेशन’ या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष टी.व्ही. मोहनदास पै यांनी म्हटले की, भारतात सामाजिक स्तरावर करण्यात येणार्‍या खर्चातील ३० टक्के खर्च एकट्या मुसलमानांवरच करण्यात येतो. मुसलमानांना हिंदूंपेक्षा अधिक अधिकार देण्यात आले आहेत. हिंदूंवर अत्याचार होत असले, तरी त्यांच्यावरच ‘मुसलमानविरोधी’ म्हणून आरोप करण्यात येतात. पंतप्रधान मोदींनी थेट गरीब भारतियांच्या बँक खात्यांत एकूण ३२ लाख कोटी रुपये जमा केले. त्यांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अडीच लाख कोटी रुपये कर वाचवला. त्यामुळेच तंत्रज्ञान हे भारताचा तारणहार म्हणून सिद्ध झाले आहे. यातून सर्वसाधारण भारतियांना तंत्रज्ञानाची शक्ती प्राप्त झाली असून सर्वांचेच सशक्तीकरण झाले आहे.

पै पुढे म्हणाले की, भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी  समाजवाद, मूल्यांवर नियंत्रण आदी गोष्टी आणल्याने देशाचा घात झाला. त्यांनी भारतीय भांडवलदार आणि उद्योजक यांना दडपले. दुसरीकडे जर आपण चीनकडे पाहिले, तर माओच्या नेतृत्वाखाली त्याने वर्ष १९४९ पासून महिलांना शिक्षण देण्यास आरंभ केला. नेहरूंनी यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यांनी प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य यांसाठी पैसा खर्च केला नाही. महिला शिक्षित नसलेल्या समाजाचा विकास संभव नाही. त्यामुळेच भारत मागे राहिला. ‘कालीमातेसमोर भगवान शिवही उभे राहू शकले नाहीत’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

भारतभरातील थोर हिंदु राजांचा इतिहास प्रसारित करणे आवश्यक ! – विक्रम संपथ, इतिहासतज्ञ

प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ इतिहासतज्ञ आणि सावरकर अभ्यासक श्री. विक्रम संपथ यांनी ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करतांना म्हटले की, भारताला नेहमीच त्याच्यावर आक्रमण करणार्‍यांच्या दृष्टीकोनातून पहाण्यात आले आहे. आपल्या मुलांना भारत हरलेल्या युद्धांची मोठी सूचीच शिकवण्यास भाग पाडले गेले. यांत तिमुरीद, मोगल, ग्रीक, हूण, अरब, तुर्क, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटीश यांच्या हाती झालेला आपला पराजयच आपल्याला शिकवण्यात आला. असे असले, तरी आपण निश्‍चितच काही युद्धे जिंकली असणार; कारण आपण आक्रमणांमागून आक्रमणे पचवली आणि त्यानंतरही नवनवीन लुटेरे लोक आपल्याला लुटण्यासाठी पुन्हा येत राहिले. जे भारतीय राजे विजयी झाले आणि ज्यांनी आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, त्यांच्याविषयी आपल्याला आठवण का करू दिली जात नाही ? आपला इतिहास हा देहलीकेंद्रीत का ठेवण्यात आला ? मला देहलीवर प्रेम आहे आणि हे सुंदर शहर आहे; परंतु लोदी, खिलजी आणि तुघलक यांसारखे दुराग्रही अन् भयावह राजवंश ज्यांनी आपल्या वारशामध्ये कोणतेच योगदान दिले नाही, त्यांचा उल्लेख आपल्या इतिहासाच्या पुस्तकांत सापडतो. असे का ? दुसरीकडे भारतातील दक्षिण, उत्तर आणि दक्खन या क्षेत्रांतील रजपूत, मराठे, सातवाहन, राष्ट्रकूट, अहोम, पल्लव, चोल आदी साम्राज्यांविषयी आपल्या पुस्तकांत विशेष उल्लेख नसतो. यामुळेच आक्रमकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेला इतिहास हा शिकवणे थांवबून भारतभरातील थोर हिंदु राजांचा इतिहास प्रसारित करणे आवश्यक आहे.

सौजन्य वर्ल्ड हिंदु काँग्रेस

‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर सर्व ओटीटी माध्यमांवर बंदी ! – निर्माते विपुल शहा

लव्ह जिहादचे षड्यंत्र उघड करणार्‍या ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शहा या वेळी म्हणाले की, ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर सर्व ओटीटी माध्यमांनी बंदी घातली आहे. जरी हा चित्रपट पुष्कळ लोकप्रिय झाला असला, तसेच महिलाकेंद्रीत असला, तरीही कोणत्याही ओटीटीला तो विकत घेण्याची इच्छा नाही. असे असले, तरी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला जो आधार आणि मार्गदर्शन दिले, त्यामुळेच आम्ही हा चित्रपट चित्रित करू शकलो. त्यांनी संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला पुष्कळ साहाय्य केले.

सौजन्य वर्ल्ड हिंदु काँग्रेस

हिंदूंनी शक्तीप्रदर्शन केल्यास हिंदूविरोधक वटणीवर येतील ! – स्वामी मित्रानंद, चिन्मय मिशन

स्वामी मित्रानंद

हिंदु संघटनांनी एकमेकांच्या कार्याचे कौतुक केले पाहिजे, हे अनिवार्य आहे. जर आपण हे केले आणि आपले शक्तीप्रदर्शन केले, तर परिणाम पूर्णपणे भिन्न असतील. हिंदूविरोधक वठणीवर येतील. यासाठी आपण भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचे स्मरण केले पाहिजे, असे उद्गार चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानंद यांनी उपस्थितांना संबोधित करतांना काढले.

सौजन्य वर्ल्ड हिंदु काँग्रेस

भगवान नरसिंहाने पुन्हा अवतार घ्यावा; कारण त्या वेळी एकच हिरण्यकश्यिपु होता, आता अनेक आहेत. भगवान नरसिंहाला आवाहन करावे लागेल. त्यासाठी आपण संघटित असणे आवश्यक आहे. आपली प्रत्येक संस्था म्हणजे लहान बाळ प्रल्हाद. जेव्हा आपण एकत्र प्रदर्शन करू, तेव्हा नरसिंह प्रकट होईल.  माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे ‘‘शक्ती शक्तीचा आदर करते’’ यानुसार एकदा आपण संघटन सामर्थ्य दाखवू शकलो की, प्रत्येक जण वटणीवर येणार, असे स्वामी मित्रानंद म्हणाले.

डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे,
कथ्थक कलाकार पद्मश्री नलिनी अस्थाना, हिंदुत्वनिष्ठ मीनाक्षी शरण,
कथ्थक कलाकार पद्मश्री कमलिनी अस्थाना, शिवानी शरण आणि जर्मन लेखिका मारिया वर्थ

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *