Menu Close

प्रत्येक गावात मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

ओझर (जिल्हा पुणे) येथे राज्य मंदिर परिषदेच्या ‘मंदिर सुव्यस्थापन’ या विषयावर परिसंवाद

ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

ओझर (महाराष्ट्र) – पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संदर्भात भक्तांना ज्या अडचणी येतात, त्यांना वाचा फोडण्यासाठी ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रक्षण कृती समिती’च्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत. पंढरपूर येथील मंदिरात ‘पैसे’ देऊन श्री विठ्ठलाचे दर्शन आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर समितीला लागू करू दिले नाही. त्यासाठी लढा दिला. मंदिर समितीने भजन बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही आम्ही विरोध करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पडले. मंदिर महासंघ हे मंदिरांच्या अडचणी सोडवण्याचे एक सामूहिक व्यासपीठ झाले आहे. यापुढील काळात गाव तेथे मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी, असे मत वारकरी संप्रदाय पाईक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी व्यक्त केले. मंदिर सुव्यस्थापन याविषयावर सायंकाळच्या पहिल्या सत्रात मंदिर सुव्यस्थापन या विषयावर ‘वारकरी संप्रदाय पाईक संघा’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, तसेच मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले.

ह.भ.प. वीर महाराज पुढे म्हणाले, ‘‘ज्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे, त्यातून त्यांनी मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच ज्यांचे झाले नाही त्यांनी ते न होऊ देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता शासन पंढरपूर येथे विकासाच्या नावाखाली ‘कॉरिडॉर’ (सुसज्ज महामार्ग) बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून शासन तेथील आजूबाजूचा परिसरही बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, तरी याला आपण विरोध केला पाहिजे.’’

पुढील पिढीकडून मंदिरांचे सुलभ व्यवस्थापन होण्यासाठी मंदिराचे योग्य लेखा नोंदी आवश्यक !  श्री. दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त

श्री. दिलीप देशमुख

मंदिरांच्या लेखानोंदी योग्य असल्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयातून मंदिरांना कसलीच अडचण होणार नाही. लेखानोंदी, चल-अचल संपत्तीची नोंद करणे, जमा-खर्च नोंद करणे या सर्व कृती ताळेबंद करण्यासाठी आवश्यक असतात. ‘ट्रस्ट’च्या झालेल्या कार्यात्मक बैठकींचा इतिवृत्तांत नोंद असल्यास पुढे काही वर्षांत येणार्‍या विश्‍वस्तांना मागे झालेल्या बैठकींतील निर्णयांचे संदर्भ घेता येतात. दानपेटीमध्ये जमा झालेल्या रकमेची नोंद करायला हवी, तसेच ही रक्कम २४ घंट्यांत अधिकोषात जमा व्हायला हवी. परंपरागत मिळालेल्या वस्तू, राजे महाराजांनी दिलेल्या भूमी, ऐतिहासिक शिलालेख, नाणी अशा अनेक वस्तूंच्या नोंदी ठेवल्यास मंदिरांचा इतिहासही त्यातून कळतो. एकूणच मंदिराचे ‘रेकॉर्ड कीपींग’ (लेखानोंदी) योग्य ठेवल्यास मंदिर व्यवस्थापन करणार्‍या पुढच्या पिढीला मंदिराचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल.

सर्व मंदिर प्रतिनिधींच्या सहभागाने ‘मंदिरांचे सुव्यवस्थापना’च्या अभ्यासक्रमाच्या निर्मितीचा शिवधनुष्य उचलू ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

काही मासांपूर्वी ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट’(मुंबई)चे संचालक आणि त्यांच्या शैक्षणिक विभागातील काही मंडळी यांनी ‘टेम्पल मॅनेजमेंट’(मंदिर सुव्यवस्थापन) या विषयावर अभ्यासक्रम निर्मितीचा प्रस्ताव आमच्यापुढे ठेवला. मंदिरांच्या व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम व्हायला हवा, अशी मागणी जळगाव येथे झालेल्या मंदिर परिषदेतही झाली होती. याचे दायित्व मंदिर महासंघाने घेतले आहे. या अंतर्गत अभ्यासक्रमासाठी ‘मंदिरांमध्ये सामान्य वैदिक धार्मिक विधी’, ‘मंदिरांचे प्रशासन’, ‘मंदिरांच्या सांप्रदायिक परंपरा’, ‘मंदिरांतील पुजारी-कर्तव्ये आणि दायित्व’, ‘विश्‍वस्त आणि व्यवस्थापकीय सदस्यांचे उत्तरदायित्व आणि कर्तव्ये’, ‘मंदिर कार्यालय व्यवस्थापन’, ‘मंदिरांचे अर्थशास्त्र’, ‘मंदिरांशी संबंधित राज्यघटनात्मक कलमे आणि कायदे’, ‘मंदिरांना शासकीय योजनांचे लाभार्थी कसे व्हावे ?’, ‘मंदिरांचा जिर्णोद्धार’, ‘चरित्र व्यवस्थापन आणि साधना’ असे १२ विषय निवडले आहेत. यासाठी आम्हाला मंदिर विश्‍वस्तांकडून त्यांचे अनुभव हवे आहेत. सर्व मंदिर प्रतिनिधींकडून अनुभव, माहिती मिळाल्याविना हे शिवधनुष्य उचलले जाऊ शकत नाही. धार्मिक क्षेत्रांतील मंदिरांचे व्यवस्थापन करायचे असल्यास सात्त्विक बुद्धी, चारित्र्य आणि धर्मपालन आवश्यक आहे. मंदिराशी संबंधित प्रत्येक व्यक्ती – विश्‍वस्त, व्यवस्थापक, पुजारी हा भक्त असायला हवी, निष्काम कर्मयोग करणारा साधक असायला हवी. यावर्षी अभ्यासक्रम प्रायोगिक स्तरावर चालू करावा, असे ध्येय असून ही काळाची आवश्यकताच आहे.

१० डिसेंबरपर्यंत ५०० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा संकल्प करूया !  श्री. सुनील घनवट, समन्वयक, मंदिर महासंघ

श्री. सुनील घनवट

जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र मंदिर परिषदेत जिल्हास्तरावर मंदिरांमधून वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी मंदिरांनी संकल्प केला आणि २६६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू झाली. मंदिरातील सात्त्विक वातावरणाचा लाभ करून घेण्यासाठी सात्त्विक वेशभूषाही महत्त्वाची आहे. वस्त्रसंहिता लागू झाल्यानंतर ‘येणार्‍या लोकांचा विरोध होईल का ?’, ‘विरोधकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देता येतील का ? उपस्थिती अल्प होईल का ?’ अशा अनेक प्रश्‍नांना खिळ बसली. महाराष्ट्रात काही मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाल्यानंतर त्याचे पडसाद उत्तराखंडमध्ये उमटले आणि तेथील आखाडा परिषदेच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू झाली. तुळजापूर मंदिरात वस्त्रसंहितेचा फलक लागल्यानंतर प्रसारमाध्यमांनी केलेल्या विरोधाला बळी पडत मंदिर व्यवस्थापनाकडून वस्त्रसंहिता मागे घेतली गेली. मंदिरांमधील धार्मिक परंपरांचा निर्णय प्रसारमाध्यमांनी नव्हे, तर तेथील देवस्थान समितीने घ्यायला हवा. ‘सेक्युलर’ सरकारच्या कार्यालयात येतांना वस्त्रसंहिता असू शकते, तर मंदिरात का नाही ? १ जानेवारी २०१६ मध्ये तमिळनाडू येथील उच्च न्यायालयाने तमिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय दिला. आज भारतात अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू आहे. अनेक ढोंगी पुरोगामी नेते वस्त्रसंहिता लागू झाल्यावर असंबद्ध वक्तव्ये करून विरोध करतात; मात्र तेच नेते अन्य राज्यांत जाऊन हिजाबचे समर्थन करतात. या सर्व विरोधाला न घाबरता आपण सर्वांनी ५०० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा संकल्प करूया.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *