Menu Close

द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे यशस्वी समापन, अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाच्या आयोजनासह 7 ठराव एकमताने संमत

महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ !

द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठराव संमत करताना मान्यवर

श्री क्षेत्र ओझर (जिल्हा पुणे,महाराष्ट्र) – श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात आली. यात प्रामुख्याने राज्यातील 264 मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू करणे आणि 16 जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे सरकारमुक्त करून महाराष्ट्र सरकारने भक्तांच्या स्वाधीन करावीत, मंदिरातील संपत्ती विकासकामांसाठी वापरण्यात येऊ नये, महाराष्ट्रातील पौराणिक आणि ऐतिहासिक मंदिरांना अर्थसाहाय्य करून त्यांचा जीर्णोद्धार करावा, लेण्याद्री श्री गणेश मंदिरात येणार्‍या दर्शनार्थींना केंद्रीय पुरातत्व खात्याकडून आकारला जाणारा निधी आकारण्यात येऊ नये, तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले यांवरील अतिक्रमणे सरकारने तात्काळ हटवावीत, तीर्थक्षेत्रे आणि अन्य मंदिरे यांच्या परिसरात मद्य आणि मांस विक्रीला सरकारने बंदी घालावी, अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दीपोत्सवानिमित्त राज्यातील सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करून श्रीरामजपाचे आयोजन करण्यात यावे, असे महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले.

द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठराव संमत करताना उपस्थित विविध मंदिराचे विश्वस्त आणि प्रतिनिधी
द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठराव संमत करताना उपस्थित विविध मंदिराचे विश्वस्त आणि प्रतिनिधी

या परिषदेसाठी श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्‍वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्‍वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी, यासह देहूचे संत तुकाराम महाराज मंदिर, पैठणचे नाथ मंदिर, गोंदवले येथील श्रीराम मंदिर, रत्नागिरी येथील गणपतीपुळे मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिर, अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर, विश्‍व हिंदु परिषदेच्या मठ-मंदिराच्या प्रांत आयामाचे सहकार्यवाह श्री. जयप्रकाश खोत आणि श्री. महेश कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातून 650 हून अधिक मंदिर विश्‍वस्त प्रतिनिधी, उपस्थित होते. यापुढील काळात देशासाठी आदर्श असे मंदिरांचे संघटन महाराष्ट्रात उभे करण्याचे निश्‍चय सर्वांनी केला.

या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्य कार्यकारिणीची रचना घोषित करण्यात आली. यात प्रामुख्याने महासंघाचे मार्गदर्शक मंडळ घोषित करण्यात आले असून जिल्हास्तरासह तालुकास्तरावर ‘निमंत्रक’ घोषित करण्यात आले आहेत. यापुढील काळात गावस्तरावर मंदिर महासंघाचे कार्य पोचवण्याचा निर्धार सर्वांनी केला.

दोन दिवसांत विविध विषयांवर चर्चा, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि गटचर्चा !

दोन दिवस झालेल्या परिषदेत मंदिर सुव्यवस्थापन, देवस्थान जमिनी, कुळ कायदा आणि अतिक्रमण, मंदिरांचा जिर्णोद्धार करतांना द्यावयाची दक्षता, पुजार्‍यांच्या समस्या आणि उपाययोजना मंदिर हे सनातन धर्मप्रचाराचे केंद्र कसे बनवावे, मंदिरांमधील वस्रसंहिता, मंदिर विश्‍वस्त आणि पुरोहित विश्‍वस्त कार्यक्रम, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि मंदिरांचा समन्वय यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन झाले. मंदिरांचे व्यवस्थापन या संदर्भात माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी, मंदिराचे व्यवस्थापन करतांना भाविकांना केंद्रबिंदू ठेऊन केल्यास आदर्श व्यवस्थापन करता येऊ शकते, असे सांगितले, तर मुंबई येथील बाणगंगा तीर्थक्षेत्र टेम्पलचे ऋत्विक औरंगाबादकर यांनी महाराष्ट्र मंदिर परिषदेच्या माध्यमातून वाळकेश्‍वर महादेव मंदिराची पुर्नस्थापना आम्ही करू, असे या प्रसंगी सांगितले. ‘प्रत्येक मंदिर हे धर्मप्रसाराचे केंद्र व्हायला हवे’, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडे यांनी केले.

परिषदेच्या माध्यमातून धर्म, संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न करुया ! – श्री. गिरीश शाह, सदस्य, भारतीय जीवजंतु कल्याण मंडळ, भारत सरकार

मंदिर म्हणजे संपूर्ण हिंदू समाजाचे उत्थान होण्याचे माध्यम आहे. प्रत्येक मंदिरात सांस्कृतिक शिक्षण दिले गेले पाहिजे. सनातन परंपरा शिकवली गेली पाहिजे. एका मंदिराने दुसर्‍या मंदिरांना भेट देऊन एकमेकांना साहाय्य करावे. मंदिरातील पैसे म्हणजे धर्मद्रव्य आहे. आपण सर्वांनी मिळून आपला धर्म, संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून करायचा आहे.

कानिफनाथ देवस्थान वक्फच्या ताब्यात न जाण्यासाठी ग्रामस्थांचा प्राणपणाने लढा ! – अधिवक्ता श्री. प्रसाद कोळसे पाटील

कानिफनाथ देवस्थानच्या इनामी मिळकतीवर मुस्लिम समाजाने नियमबाह्म पद्धतीने ताबा मिळवला असून सर्व संपत्ती वक्फमध्ये विलीन केली, तसेच कानिफनाथ देवस्थानाचे नामकरण करून हजरत रमजान शहा दर्गा अस्तित्वात आला. धर्मांधांनी सातबारा उतार्‍यावरही या दर्ग्याचे नाव लावण्यासाठी अर्ज केला आहे. ही गोष्ट तेथील ग्रामस्थांच्या लक्षात येताच सर्वांनी संघटित होऊन मंदिर आणि इनामी मिळकतीवर कोणत्याही नोंदी घेऊ नयेत, असा ठराव ग्रामसभेत संमत आहे. कानिफनाथ देवस्थान वक्फच्या ताब्यात न जाण्यासाठी ग्रामस्थांचा प्राणपणाने लढा देत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *