Menu Close

जयपूर (राजस्थान) येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या

गुंड रोहित गोदारा याने घेतले हत्येचे दायित्व !

काँग्रेसच्या राज्यात राजस्थानचे ‘पाकिस्तान’ झाले होते. ही स्थिती भाजपने पालटणे आवश्यक झाले आहे, हेच ही घटना दर्शवते ! – संपादक 

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी

जयपूर (राजस्थान) – राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्या श्यामनगरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आक्रमण करणारे ३ जण दुचाकीवरून आले होते. त्यांनी सुखदेव सिंह यांच्यावर गोळीबार केल्यानंतर सुखदेव यांच्या सुरक्षारक्षकांनीही आक्रमण करणार्‍यांवर गोळीबार केला. यात १ आक्रमणकर्ता ठार झाला, तर सुरक्षारक्षक अजित सिंह घायाळ झाले. त्यानंतर २ आक्रमणकर्ते बाहेर एका महिलेची स्कुटी घेऊन पळून गेले. सुखदेव सिंह यांना २ गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र तेथे उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला. ठार झालेल्या आरोपीचे नाव नवीन शेखावत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. पोलीस अन्य २ गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे रोहित गोदारा याने या हत्येचे दायित्व स्वीकारले आहे; मात्र हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आक्रमणकर्ते दुपारी दीडच्या सुमारास सुखदेव सिंह यांच्या घराबाहेर आले होते. तेथील सुरक्षारक्षकांना त्यांनी ‘सुखदेव सिंह यांना भेटायचे आहे’, असे सांगितले. सुरक्षारक्षकांनी सुखदेव सिंह यांना सांगितल्यावर त्यांनी या ३ जणांना आता येऊ देण्यास सांगितले. ते आता आले आणि ते जवळपास १० मिनिटे त्यांच्याशी बोलले. त्यानंतर त्यांनी सुखदेव सिंह यांच्यावर गोळीबार केला. त्या वेळी सुखदेव सिंह यांच्या रक्षणासाठी आलेल्या सुरक्षारक्षकांवरही त्यांनी गोळीबार केला. या वेळी सुरक्षारक्षकांनी आक्रमणकर्त्यांवर गोळीबार केला. त्यात एका आक्रमणकर्त्याचा मृत्यू झाला, तर सुरक्षारक्षक घायाळ झाला. ठार झालेल्या आक्रमणकर्त्याकडे दुचाकीची चावी राहिल्याने अन्य दोघे आक्रमणकर्त्यांनी बाहेर स्कुटीवरून चाललेल्या महिलेला रोखले आणि तिची स्कुटी घेऊन ते पळून गेले. ठार झालेला आक्रमणकर्ता नवीनचंद शेखावत याचे कपड्याचे दुकान असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोळीचे उत्तर गोळीनेच द्यायला हवे ! – आमदार टी. राजा सिंह

आमदार टी. राजा सिंह

सुखदेव सिंह यांच्या हत्येवर भाग्यनगर येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, गोहत्याबंदीसाठी कार्य करणारे सुखदेव सिंह यांंची हत्या करणारे कोण आहेत ? त्यांचा उद्देश काय होता ? याचा शोध घेतला पाहिजे. माझ्या मते या गुन्हेगारांच्या गोळीला गोळीनेच उत्तर दिले पाहिजे.

हत्येमागे मोठी टोळी कारणीभूत असण्याची शक्यता ! – सूरज पाल अम्मू, प्रमुख, राजपूत करणी सेना

राजपूत करणी सेनेचे प्रमुख सूरज पाल अम्मू यांनी म्हटले की, यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. गुंड लॉरेन्स बिष्णोई याचा सहभाग असल्याचीही शक्यता आहे. ही हत्या राजकारणामुळेच झाली आहे. सुखदेव सिंह यांनी यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना २ दिवस सुरक्षा पुरवण्यात आली आणि नंतर काढून टाकण्यात आली होती.

‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधातून संजय लीला भन्साळी यांना मारली होती थप्पड !

लोकेंद्र सिंह कालवी यांनी वर्ष २०१२ मध्ये सुखदेव सिंह गोगामेडी यांना राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बनवले होते. गोगामेडी यांनी बहुजन समाज पक्षाकडून दोनदा निवडणूकही लढवली आहे. कालवी यांच्याशी वाद झाल्यानंतर गोगामेडी यांनी ‘राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेना’ या नावाने स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. वर्ष २०१८ मध्ये सुखदेव सिंह यांनी भाजपकडे निवडणुकीचे तिकीट मागितले होते; मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही. सुखदेव सिंह यांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी थप्पड मारली होती. त्यांनी ‘पद्मावती’ चित्रपटाला कडाडून विरोध केला होता. अंततः निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ केले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *