Menu Close

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती, हा देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना दणका – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

तुळजापूर (महाराष्ट्र) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने स्थगिती दिली. ही स्थगिती म्हणजे देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना दिलेला दणका आहे, असे प्रतिपादन या प्रकरणातील याचिकाकर्त्या आणि हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले. या प्रकरणी ज्येष्ठ अधिवक्ता संजीव देशपांडे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू. (श्री.) सुरेश कुलकर्णी, तसेच अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी बाजू मांडली.

कु. प्रियांका लोणे

या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

Tuljapur_melting_stay_HJS_PN_M

१. सरकारीकरण झालेल्या या मंदिरात यापूर्वी दानपेटी लिलाव घोटाळ्यात देवीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, रत्ने, तसेच भाविकांनी अर्पण केलेली रोख रक्कम यांचा ८ कोटी ५० लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झालेला आहे. कदाचित् ही रक्कम म्हणजे हिमनगाचे टोकही असू शकते.

२. विशेष म्हणजे या प्रकरणी अद्याप एकाही दोषीवर कारवाई झालेली नाही.

३. दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेद्वारे सोन्या-चांदीमध्ये घट दाखवून पूर्वी झालेला भ्रष्टाचार दडपून टाकला जाण्याचा धोका होता. नुकतेच देवीचा पाऊण किलोपेक्षा अधिक वजनाचा सोन्याचा मुकुट, तसेच मंगळसूत्र गायब झाल्याचे उघडकीला आले आहे. न्यायालयाच्या निर्णयाने या संभाव्य भ्रष्टाचाराला आळा बसला. पारदर्शक व्यवहार होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

४. मंदिरांतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समिती हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून वर्ष २०१५ पासून जनहित याचिकांद्वारे लढा देत आहे. या प्रकरणी नेमलेल्या पहिल्या चौकशी समितीने १५ जणांवर ठपका ठेवत ‘त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावेत’, असे म्हटले होते; पण या प्रकरणी दुसरी चौकशी समिती स्थापन करून पहिल्या समितीचा अहवाल पालटण्यात आला आणि पहिल्या चौकशी अहवालात दोषी ठरलेल्यांना ‘क्लीन चीट’ (निर्दोष) देण्यात आली. सर्वपक्षीय सरकारांना या प्रकरणात दोषींवर कारवाई होण्याविषयी रस नाही; किंबहुना त्यांच्याकडून अशा भ्रष्टाचार्‍यांना पाठीशीच घातले जात आहे, हे दुर्दैवी आहे. हा भाविकांच्या श्रद्धेला लाथाडण्याचा प्रकार आहे.

५. श्री तुळजाभवानीदेवीचा खजिना आणि जमादार खान्यातील अतीप्राचीन, ऐतिहासिक अन् पुरातन सोन्या चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार, प्राचीन नाणी यांचा अपहार झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणामध्ये राजे-महाराजांनी देवीला अर्पण केलेली ऐतिहासिक आणि पुरातन ७१ नाणी, देवीचे २ चांदीचे खडाव जोड आणि माणिक गायब आहेत. या प्रकरणी चौकशी समितीने ठपका ठेवलेल्या दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही.

भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होईपर्यंत आणि पै अन् पै देवनिधी वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू, भाविकांनी आम्हाला साथ द्यावी ! – प्रियांका लोणे

‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू. त्याला भाविकांनी साथ द्यावी’, असे आवाहनही कु. प्रियांका लोणे यांनी केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *