‘दक्षिण भारतातील द्रविडी राजकारणात सनातन द्वेष !’ या विषयावर विशेष संवाद !
डी.एम.के.चे विविध नेते सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करत आहेत, सनातन धर्मावर टीका करत आहेत, त्यांचा उद्देश नकारात्मक राजकारण करणे हा आहे. अल्पसंख्यकांची मते मिळवण्यासाठी, तसेच सनातन धर्मीयांमध्ये हीन भावना निर्माण करण्यासाठी हे सुरू आहे. सनातन धर्म नष्ट करायची भाषा करणाऱ्यांनी ‘सनातन धर्म’ म्हणजे काय, हे समजून घ्यायला पाहिजे. सनातन धर्म हा अनादी काळापासून आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव श्री. आर. वी. एस. मणि यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘दक्षिण भारतातील द्रविडी राजकारणात सनातन द्वेष !’ या विषयावर आयोजित विशेष संवादात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे देहली प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
डी.एम.के.चे खासदार डॉ. सेंथिलकुमार यांनी नुकतेच उत्तर भारतातील राज्यांना ‘गोमूत्र स्टेट’ म्हटले. हे वाक्य निंदनीय असून डॉ. सेंथिलकुमार यांना शिक्षा होण्यासाठी येथे दंडसहिता नाही का ? मेकॉले शिक्षणपद्धतीचे हे परिणाम आहेत. सनातन धर्मावर टीका करतात, त्यांना बुद्धीने परिपक्वता आणण्याची गरज आहे. सनातन धर्म नष्ट करणे किंवा त्याचे विभाजन करणे, असे बोलणारे मूर्ख आणि दुष्ट आहेत. भारतात भाषेनुसार वेगवेगळ्या राज्यांतील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात राज्य आणि भाषा जरी वेगळे असले, तरी आपण भारतीय आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही श्री. मणि म्हणाले.