४ दशकांपूर्वी होते ५ लाख शीख
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये वर्ष १९८० च्या दशकात सुमारे ५ लाख शीख होते; परंतु गेल्या ४० वर्षांच्या हिंसाचारामुळे शिखांना पलायन करावे लागले आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये केवळ ५० शीख उरले आहेत, तर हिंदूंची संख्या केवळ २० इतकी राहिली आहे.
१. काबुलमध्ये ८ गुरुद्वारा आहेत. ‘कर्ते परवान’ वगळता सर्व गुरुद्वारा बंद आहेत. या गुरुद्वाराचे सेवक मनमुन सिंह यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब देहलीमध्ये रहाते. त्यांनीही देहलीमध्ये रहावे, अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा आहे; पण त्यांना ते मान्य नाही. आम्ही नसलो, तर या पवित्र स्थळांची काळजी कोण घेणार ? पूर्वी हा संपूर्ण परिसर शिखांचा होता. मोठे साधू येथे कीर्तन करत असत. बैसाखीला (वैशाख पौर्णिमेला) तर पाय ठेवायला जागा मिळत नव्हती; पण आता केवळ ३-४ कुटुंबे आहेत. लोकांना घरे विकून पलायन करावे लागले. काहींची घरे तालिबान्यांकडून कह्यात घेण्यात आली आहेत.
२. काबुलमधील सर्वांत मोठे आसामाई मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. येथे पहिल्या मजल्यावर शाळिग्राम ठाकूरजींची प्राचीन मूर्ती आहे. मंदिरात अखंड ज्योत तेवत आहे. ८ व्या शतकातील हिंदु राजवटीपासून ते सध्या तालिबानपर्यंत अनेक चढ-उतारांना सामोरे जाऊनही ती कधीच विझली नाही. ३० वर्षीय राम सिंह ५ वर्षांपासून या मंदिराचे पुजारी आहेत. त्यांनी सांगितले की, एक काळ असा होता की, येथे पुष्कळ गर्दी असायची. मंगळवार आणि शुक्रवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते; परंतु आता प्रसाद ग्रहण करण्यासाठी लोक नाहीत, तरीही परंपरा पाळली जाते. सध्या अफगाणिस्तानमध्ये केवळ २० हिंदू उरले आहेत. पूर्वी येथे अनेक मूर्तींसह शिवलिंग होते; मात्र भीतीमुळे ते तळघरात ठेवले. पाकिस्तानातून हिंदु कुटुंबेही येथे दर्शनासाठी आली आहेत.
३. काबुलमधील रतननाथ दर्गा हे हिंदूंचे प्रमुख धार्मिक केंद्र आहे. रतननाथ हे गुरु गोरखनाथ यांचे अनुयायी होते, ज्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे नाथ संप्रदायाचा पाया रचला.
संदर्भ : सनातन प्रभात मराठी