Menu Close

पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्आयटी’मार्फत चौकशी करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

श्री विठ्ठलाच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी न करणे, हा मोठा घोटाळाच !

प्रसादाच्या लाडूपासून, गोशाळा, शौचालय, आगाऊ रक्कम सर्वत्रच अनागोंदी कारभार !

महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन आणि मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातही भूमी आणि दागिने यांत मोठा घोटाळा झाला होता. याचप्रमाणे आता कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात राजे, महाराजे, पेशवे, संस्थानिक आदींनी श्री विठ्ठल-रुख्मिणी यांना अर्पण केलेल्या 300 हून अधिक प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंद अन् मुल्यांकन नसल्याचे समोर आले आहे, हे अतिशय गंभीर आहे. हे विठुरायाचे दागिने हडप करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ? याची सखोल चौकशी ‘राज्य गुन्हे अन्वेषण विभागा’च्या ‘विशेष तपास पथका’द्वारे (एस्.आय.टी.द्वारे) करण्यात यावी, तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी आणि मंदिर समितीतील सदस्य यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये केली. या पत्रकार परिषदेला वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, तुळजापूर येथील पुजारी संघाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष श्री. गणेश लंके आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे उपस्थित होते.

विठ्ठल भक्तांच्या प्रसादासाठी निकृष्ट खाद्यतेल वापरणे, गोशाळेची दुरावस्था, शौचालय न बांधता लाखो रुपये वाया घालवणे, मंदिरातील सोन्याच्या वस्तूंचे मूल्यांकन न करणे, हे अतिशय गंभीर प्रकार आहेत. त्यामुळे वर्तमान समिती बरखास्त करून संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांचे निलंबन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने या वेळी केली.

नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्ष 2021-22 चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल’ सरकारला सादर करण्यात आला. या अहवालामध्ये लेखापरीक्षकांनी मंदिर समितीचा वरीलप्रमाणे अनागोंदी कारभार स्पष्टपणे नमूद केला आहे. मुळात वर्ष 1985 साली मंदिराचे सरकारीकरण होऊन 38 वर्षे उलटल्यावरही मंदिरातील प्राचीन अन् मौल्यवान सोन्या-चांदीच्या वस्तू, देवाचे मौल्यवान दागिने यांच्या ताळेबंदामध्ये नोंदी, तसेच त्याचे मूल्यांकन का करण्यात आले नाही ? या काळात मंदिरातील दागिन्यांची हेराफेरी वा चोरी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी अर्पण करण्यात येणार्‍या दागिन्यांना सील का केले जात नाही ? त्यामुळे मागील काही वर्षांत यांतील दागिने हडप केले गेले नसतील कशावरून ? याविषयी खात्री कोण देणार ? असे प्रश्न या वेळी सुनील घनवट यांनी उपस्थित केले.

सुलभ शौचालय न बांधता भाड्यापोटी श्री विठ्ठल मंदिराचे 22 लाख रुपये पाण्यात !

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 21 मार्च 2017 या दिवशी रेल्वेच्या जागेवर सुलभ शौचालय बांधण्यासाठी 1 कोटी 54 लाख 46 हजार 41 रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. 35 वर्षांसाठी हा करार करण्यात आला असून यासाठी रेल्वे प्रशासनाला भाड्यापोटी मंदिर समितीकडून वर्षाला 4 लाख 41 हजार 315 रुपये दिले जात आहेत. असे असूनही 5 वर्षांमध्ये सुलभ शौचालय बांधण्यात आले नाही. या नियोजनशून्य कारभारामुळे मंदिराचे 22 लाख 06 हजार 575 रुपये पाण्यात गेले आहेत. इतका अनावश्यक पैसा ज्यांच्या चुकीमुळे वाया गेला, त्यांच्याकडून हा पैसा सव्याज वसूल करण्यात यावा, अशी मागणीही महासंघाचे श्री. घनवट यांनी केली.

लाडूमध्ये भेसळ; गुन्हा नोंदवावा !

भाविकांना प्रसादासाठी देण्यात येणारे लाडू बनवण्याचा ठेका मंदिर समितीकडून बचत गटांना देण्यात आला आहे. लाडूमध्ये ‘ड्रायफूड, तसेच पौष्टिक पदार्थ, शेंगदाणा तेल वापरावेत’, असल्याचे वेष्टनावर लिहून प्रत्यक्षात त्याचा उपयोग न करणे हा सरळसरळ घोटाळा आहे. तसेच शेंगदाणा तेलाच्या जागी कमी प्रतीचे कॉटनसीड तेल वापरले आहे. विठ्ठलाच्या चरणी श्रद्धेने येणार्‍या भाविकांना निकृष्ट दर्जाचा प्रसाद देणे, हे पापच आहे. या प्रकरणी मंदिर समितीने केवळ बचत गटांचा ठेका काढून त्यांच्या ठेवी (डिपॉझिट) जप्त करण्याची थातूरमातूर कारवाई केली आहे. याकडे डोळेझाक करणारी मंदिर समितीही तितकीच दोषी आणि पापात सहभागी आहे. तिच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी श्री. रामकृष्ण वीर महाराज यांनी या वेळी केली.

12 वर्षांनंतरही ‘आगाऊ’ रकमेची वसूली नाही !

मंदिर समितीकडून कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या आगाऊ रकमेची (ॲडव्हान्स) वसूली वेळेत होत नाही. देवस्थानकडून वर्ष 2010 मध्ये 7 व्यक्तींना 1 लाख 80 हजार 540  रुपये आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आले आहेत; मात्र 12 वर्षांनंतरही त्याची वसूली झालेली नाही. या व्यतिरिक्तही अनेकांना दिलेल्या आगाऊ रकमांची वेळेत वसुली झालेली नाही. ही गोष्टही गंभीर आहे, असे मत श्री. किशोर गंगणे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र सरकारने सरकारीकरण केलेल्या सर्व मंदिरांतील सोन्या-चांदीच्या सर्व वस्तू, मंदिरांचे भाग आणि दागिने यांचे तातडीने आणि समयमर्यादेत मूल्यांकन करून ताळेबंदामध्ये त्यांच्या नोंदी कराव्यात. लाडू बनवणे, गोशाळेतील खतांची विक्री आदींची चौकशी करून केवळ ठेका रद्द करण्याचा सोपस्कार करण्याऐवजी दोषींवर गुन्हे नोंदवावेत. हे सर्व प्रकार शासकीय मंदिर समितीच्या दुर्लक्षामुळे घडले आहेत. मंदिराच्या देवनिधीचा प्रामाणिकपणे सांभाळ न करणार्‍या मंदिर समितीच्या सदस्यांवर कारवाई करून प्रामाणिक आणि पात्र अशा विठ्ठलभक्तांची ट्रस्टवर नियुक्ती करावी, अशी मागणीही श्री. घनवट यांनी शेवटी केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *