धर्मांतर आणि काळी जादू यांच्या प्रकरणी झालेल्या तक्रारीच्या आधारावर म्हापसा पोलिसांकडून कारवाई
म्हापसा : सडये, शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी १ जानेवारी या दिवशी पहाटे धर्मांतर करणे आणि काळी जादू करणे यांप्रकरणी अटक केली. अशाच प्रकरणामध्ये पास्टर डॉम्निक याला यापूर्वी २ वेळा अटक झालेली आहे. पास्टर डॉम्निक याच्या विरोधात आतापर्यंत धर्मांतर केल्याच्या प्रकरणी ३ गुन्हे, तर विविध अन्य कलमांखाली ५ गुन्हे मिळून एकूण ८ गुन्हे प्रविष्ट झालेले आहेत.
पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ तमिळनाडू येथील आणि सध्या फोंडा येथे वास्तव्यास असलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार प्रविष्ट केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पास्टर डॉम्निक याने धर्मांतर करण्यासाठी धमकावल्याचा, तसेच ‘बिलिव्हर्स’ पंथाचा स्वीकार करण्यासाठी आमीष दाखवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पोलिसांनी पास्टर डॉम्निक याच्यासमवेत त्याची पत्नी जोअन मास्कारेन्हास हिच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे. पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी यांच्या विरोधातील हा तिसरा गुन्हा आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम १५३ (अ), २९५ (अ), ५०६ (२), ३४, तसेच ‘ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडिज कायदा १९५४’ अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक सीताकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे.
Hindu Janajagruti Samiti demands Tadipaar to Siolim pastor Dominic#Goa #GoaNews #FivePillarChurch #Hindu #ReligiousConversion #Dominic pic.twitter.com/i8i47Aa0FC
— In Goa 24×7 (@InGoa24x7) January 1, 2024
पोलिसांनी कह्यात घेतल्यानंतर छातीत दुखत असल्याने पास्टर डॉम्निक रुग्णालयात भरती !
पोलिसांनी पहाटे कह्यात घेतल्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी नेत असतांना पास्टर डॉम्निक याने त्याच्या छातीत दुखत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
म्हापसा पोलीस आणि फारेन्सिक विभाग यांच्याकडून ‘फाईव्ह पिलर्स’ चर्च परिसरात अन्वेषण
म्हापसा पोलीस आणि गोवा पोलिसांचा फॉरेन्सिक विभाग यांनी १ जानेवारी या दिवशी सडये, शिवोली येथील ‘फाईव्ह पिलर्स’ चर्च परिसरात जाऊन अन्वेषण चालू केले आहे.
संदर्भ : सनातन प्रभात मराठी