मंदिरांशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन !
बोपगांव (जिल्हा पुणे) – मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगांव येथे ३१ डिसेंबर या दिवशी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील बहुसंख्य मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते. श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट बोपगांवच्या सर्व संचालक मंडळाने बैठकीचे नियोजन केले होते. सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील भ्रष्टाचार आणि व्यवस्थापनातील अनागोंदी कारभार, मंदिरांतील पावित्र्य जपले जावे यासाठी दर्शनाला येतांना पोशाख कसा असावा ? देवस्थानाच्या माध्यमातून भाविकांसाठी कशा सोयी सुविधा असाव्यात ? या संदर्भात चर्चा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. पुणे जिल्ह्यातील मंदिरांचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर महासंघाचे पुणे विभागाचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी या बैठकीचा उद्देश सांगून बैठकीला प्रारंभ केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी मंदिर सरकारीकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या भ्रष्टाचार आणि पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थापनातील दागिन्यांच्या नोंदी संदर्भातील अनागोंदी विषयी माहिती सांगितली.
सर्वश्री दत्तात्रय चोरघे, प्रसाद गुरुजी, महेश पाठक, रामनाथ येवले, दीपक आगवणे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. श्री. रामनाथ येवले महाराज यांनी मंदिर विश्वस्तांनी मंदिराचे उत्पन्न वाढावे आणि या उत्पन्नाच्या माध्यमातून मंदिर, गाव आणि समाजाचा विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, या संदर्भात मार्गदर्शन केले. कानिफनाथ देवस्थानाचे विश्वस्त श्री. सुरेश फडतरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून समारोपाच्या वेळी सर्वांचे आभार मानले.
बैठकीमध्ये चर्चा झालेली अन्य सूत्रे
१. लहान-मोठ्या मंदिरांचे एकीकरण करून मंदिरांच्या, तसेच मंदिर पुरोहित, विश्वस्त यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी आणि मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंदिर महासंघ प्रयत्न करणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले.
२. मंदिरांचे पावित्र्य राखले जावे यासाठी पुढील काही दिवसांत सर्व मंदिरांमध्ये वस्त्र संहितेचा फ्लेक्स लावणार, असा निर्णय सर्व मंदिर विश्वस्तांनी घेतला.
३. याच मासात पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थापनातील दागिन्यांच्या नोंदी संदर्भातील अनागोंदीविषयी आंदोलन करण्याचेही ठरले आहे. मंदिरांतून हलाल उत्पादनांचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करणार, असा ठरावही संमत केला गेला.