Menu Close

मंदिरांची संपत्ती लुटणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत हिंदु जनजागृती समितीचा लढा चालूच राहील – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत १५ सहस्र हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

दीपप्रज्वलन करतांना सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये मध्यभागी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे

सोलापूर – भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे, तसेच काही देवस्थाने भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत. सरकारने कह्यात घेतलेल्या काही मंदिरांमधील आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत. नुकतेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरातील दागिन्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी केल्या नसल्याचे समोर आले आहे. प्रसादाचा लाडू, गोशाळा आदींमध्ये अनागोंदी कारभार असल्याचे समोर आले.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन आणि मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातही भूमी आणि दागिने यांत मोठा घोटाळा झाला होता. मंदिरे हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्रे आणि हिंदूंना चैतन्य पुरवणारी असल्याने ती सरकारीकरणातून मुक्त करून पुन्हा भक्तांच्या कह्यात देण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आंदोलने, निवेदने, याचिका यांसह विविध माध्यमातून लढा देत आहे. यापुढील काळात मंदिरांची संपत्ती लुटणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत समितीचा लढा चालूच राहील, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते ३ जानेवारी या दिवशी भवानी पेठ येथील जयभवानी प्रशालेच्या मैदानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या वेळी १५ सहस्र हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवला.

या वेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती सचिन व्यंकटेश सवाई गुरुजी, श्री. शैलेंद्र जोशीगुरुजी, श्री. नंदकुमार शिरसीकरगुरुजी, श्री. प्रथमेश क्षीरसागर यांनी वेदमंत्रपठण केले. समितीच्या कार्याचा आढावा सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की,

१. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भूमी बळकावण्याचा भयंकर प्रकार देशभर चालू आहे. वक्फ कायद्यानुसार वक्फ बोर्डाला ‘कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता वक्फची आहे’, असे घोषित करण्याचा अमर्याद अधिकार आहे.

२. केवळ घरे किंवा मंदिरेच नव्हे, तर संपूर्ण गावच्या गावही ‘वक्फ बोर्ड’ कह्यात घेऊ शकते. देशातील अनुमाने ८ लाख एकर भूमी वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहे.

३. सोलापूर येथील उदाहरण घ्यायचे झाले, तर  साखरपेठ परिसरात ‘सात-बारा’ उतारा हिंदूंच्या नावावर आहे. असे असतांना वारंवार ‘वक्फ बोर्डा’च्या माध्यमातून हिंदूंना नोटीस देऊन घरे बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

४. वक्फ कायदा रहित करण्यासाठी आपण संघटितपणे संघर्ष केला पाहिजे.

वैचारिक आतंकवादास न फसता प्रश्न विचारा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

एका बाजूला डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी या कथित विचारवंतांच्या हत्येच्या प्रकरणात गळा काढून आरडाओरडा केला जातो, तर नक्षलवाद्यांनी आतापर्यंत ठार मारलेल्या निरपराध लोकांची संख्या १४ सहस्र असून त्यावर मात्र कुणीच बोलत नाही. ‘शहरी नक्षलवाद’ हे हिंदूंच्या समोर असलेले गंभीर आणि व्यापक संकट आहे, तसेच नक्षलवाद हा गडचिरोलीपुरता मर्यादित नसून त्याने शहरांतही हात-पाय पसरले आहेत. कोरेगाव-भीमा दंगलीनंतर ‘शहरी नक्षलवादा’चे स्वरूप अजून उघड झाले. पंतप्रधानांना मारण्याचा कट रचल्याप्रकरणी वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा वगैरेंना अटक झाली. यात उच्चशिक्षण घेतलेल्यांचाही समावेश आहे. ‘शहरी नक्षलवाद्यां’मधीलच कथित पर्यावरणवादी म्हणवून घेणारे कारखान्यांमधून होणार्‍या प्रदूषणाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून ‘गणेशोत्सवामुळे जलप्रदूषण होते’, असे सांगतात. अशा शहरी नक्षलवादाचे विविध चेहरे आपल्या अवतीभवती आहेत. ते हिंदु धर्म अाणि हिंदू यांना प्रत्येक वेळी लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हिंदु धर्म संपवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना वैध मार्गाने उत्तर दिले पाहिजे. हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील षड्यंत्रच आहे. विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे आणि हिंदूंनीही प्रत्त्युत्तरादाखल प्रश्न विचारण्यास शिकले पाहिजे.

उपस्थित पक्ष, संघटना, संप्रदाय : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, वारकरी संप्रदाय, हिंदु राष्ट्र सेना, विविध स्थानिक संघटना-संप्रदाय

राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी असणार्‍यांचा सत्कार !

राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सातत्याने सहभागी असणारे धर्मप्रेमी कु. श्रीविद्या पोगुल, श्री. रमेश झुंझा, श्री. नरेंद्र मेरगू, श्री. अविनाश जोशी, श्री. नागेश मासपत्री, श्री. लक्ष्मीनारायण बामणला यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभा पाहण्यासाठी क्लिक करा 👇

‘हिंदु आणि हिंदुत्व हे वेगळे आहे’ असे म्हणणे, हा हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे माता आणि मातृत्व यांत भेद करता येणार नाही, त्याप्रमाणे हिंदु आणि हिंदुत्व, हिंदु धर्म आणि सनातन धर्म यांमध्येही भेद करता येणार नाही. हिंदु धर्म हाच सनातन धर्म आहे आणि हाच वैदिक धर्म आहे. हिंदु आणि सनातन यांमध्ये भेद नाही. आज सनातन धर्म मानणार्‍या प्रत्येकाच्या मनात हिंदुत्व जागृत होऊ लागले आहे; पण सनातन धर्माचा उद्घोष काही जणांना सहन होत नाही.

ते सनातन धर्म नष्ट करणाच्या वल्गना करत आहेत; मात्र सनातन धर्म नष्ट होणार कि सनातन धर्माला विरोध करणारे नष्ट होणार ?, हे येणारा काळच दाखवून देईल. हिंदू जी प्रतिज्ञा करतात, ती पूर्ण केल्याविना रहात नाहीत. प्रभु श्रीरामांनी ठरवले आणि आदर्श रामराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतिज्ञा केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याचप्रमाणे श्रीराममंदिर अयोध्येत निर्माण करायचे ठरवले आणि तेही पूर्ण केले आहे. २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामाची होणारी स्थापना, म्हणजे सर्व हिंदूंना रोमांचित करणारा क्षण आहे. हा सुवर्णक्षण म्हणजे आदर्श रामराज्याची नांदी, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा आरंभ आहे.

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *